Sunday, 24 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.03.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४  मार्च २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. टी. बी. अर्थात क्षयरोगाला प्रतिबंध करून, या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २४ मार्चला क्षयरोग दिवस साजरा केला जातो. इट्स टाईम - असं या वर्षीचं घोषवाक्य असून, राष्र्टपती रामनाथ कोविंद यांनी, भारताला क्षयरोगापासून मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं आहे. क्षयरोग प्रतिबंधाचं जागतिक लक्ष्य २०३० आहे. मात्र आपण २०२५ पर्यंत आपला देश, क्षयरोग मुक्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न केले पाहिजेत, असंही ते म्हणाले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, क्षयरोग पिडीतांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.

****



 भ्रष्टाचार, भीती, भूक, भेदभाव, निरक्षरता, गरिबी आणि जातीयवादापासून मुक्त असलेला, शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात असमानता नसलेला नवा भारत बनवण्यासाठी, युवकांनी भरपूर प्रयत्न केले पाहिजेत, असं उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू यांनी म्हटलं आहे. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी उपराष्ट्रपतींनी काल आपल्या निवासस्थानी संवाद साधला. यावेळी बोलताना, युवकांनी पारंपरिक मूल्यांचं संरक्षण करावं आणि नकारात्मकता सोडून सकारात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोनाचा अंगिकार करावा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

****



 दिव्यांग मतदारांसाठी मतदान करणं सोयीचं व्हावं म्हणून, निवडणूक आयोगानं पी डब्ल्यू डी हे नवीन ॲप तयार केलं आहे. या ॲपद्वारे दिव्यांगांसाठी मतदार नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. या वर्षी राज्यात दिव्यांग मतदारांची संख्या दोन लाख २४ हजार इतकी आहे.

****



 काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेल्या प्रचंड हिमवर्षावामुळे श्रीनगर - लेह राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी अडकलेल्या १८७ प्रवाशांना वायुसेनेनं हवाई मार्गाने सुरक्षित स्थळी पोहोचवल्याचं कारगिल कुरियर सर्व्हिसेसच्या राज्य समन्वयकांनी सांगितलं. राष्ट्रीय महामार्गावरील बर्फ हटवण्याचं काम वेगात सुरू असलं, तरी रस्त्याची दुरुस्ती पुढच्या महिन्यातच होऊ शकेल, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरचा चरित्रपट, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित करणं, हा आदर्श आचार संहितेचा भंग असल्याचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं म्हटलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्याला मनसेचा विरोध असल्याचं, पक्षाच्या महासचिव शालिनी ठाकरे यांनी काल मुंबईत जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मनसे आपल्या पद्धतीनं हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून थांबवेल, असा इशारा, या पत्रकातून दिला आहे. हा चित्रपट येत्या पाच एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

****

 जातीय चौकटीच्या बाहेर येण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करावे लागतील, असं प्रतिपादन विचारवंत डॉ. संजय मून यांनी केलं. एकनाथ खिल्लारे लिखित 'उलगडलेल्या नव्या उजेडवाटा' या समीक्षा ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात काल सायंकाळी ते बोलत होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. नांदापूरकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला परिवर्तनवादी विचारवंत डॉ. अरुण कोळी, के. ओ. गिऱ्हे, डॉ. शिवाजी हुसे, प्रा. देवानंद पवार आणि टी. एस. चव्हाण यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

****



 औरंगाबाद कनेक्ट टीमच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आज 'इतिहास, वर्तमान अन भविष्याचं नवं पान' या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उस्मानपुऱ्यातल्या कलश लॉन्सवर सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ‘सांस्कृतिक वारसा- आशेचा कवडसा’ या सत्रात वास्तुविशारद अजय कुलकर्णी बोलणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात ‘औरंगाबादचा गुंता अन चिंता’ या विषयावर शहरातले ज्येष्ठ पत्रकार सहभागी होणार आहेत. यावेळी निवडक संस्था आणि व्यक्ती यांचा गौरवही करण्यात येणार आहे.

*****

***

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...