Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 July
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जुलै २०२० सायंकाळी ६.००
****
Ø
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड
संसर्गाचे नवे
दोनशे रुग्ण; जिल्ह्याची रुग्णसंख्या ५,७६५ ** जालन्यात २७ नवे रुग्ण, तर दोन रुग्णांचा मृत्यू; परभणीत तीन तर
नांदेड जिल्ह्यात नवीन चार जणांना विषाणू संसर्ग
Ø
पतंजलीचं
औषध कोविड उपचार नव्हे तर कोविड व्यवस्थापन - बाबा रामदेव
यांचा खुलासा
Ø यूपीएससीकडून पूर्व
परीक्षेच्या उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा
आणि
Ø
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव
नाईक यांना सर्वत्र अभिवादन
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या
पाच हजार
७६५ झाली आहे. आज
दिवसभरात जिल्ह्यात २०० नवे कोविडग्रस्त आढळले. यापैकी १२१ रुग्ण महानगरपालिका हद्दीतले तर
ग्रामीण भागातले ७९ रूग्ण आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ७४१ रुग्ण बरे झाले
आहेत. तर २६३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या दोन हजार ७६१ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत. वैजापूर तालुक्यातला पोखरी गावचा कोविड
संक्रमित परीसर सील करण्यात आला आहे. शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक. सत्यजीत
ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी गावात तैनात करणयात आले आहेत.
****
जालना शहरातल्या दोन कोरोना विषाणू बाधितांचा आज
मृत्यू झाला. यामध्ये दाणाबाजार परिसरातली ५५ वर्षीय महिला आणि बुऱ्हाननगर भागातल्या
६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गामुळे एकूण मृतांची संख्या
आता १७ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे नवीन २७ रुग्ण
आढळून आले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या आता ५८० झाली आहे. तर ३५१ रुग्ण
या आजारातून बरे झाले आहेत.
****
परभणी जिल्ह्यात नवे तीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले.
जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधितांची संख्या ११८ झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज ४ नवे कोरोना विषाणू बाधीत रुग्ण
आढळून आले. यात नांदेड शहरातल्या अनिकेतनगर भावसार चौक, आनंदनगर, एकम दर्गा इतवारा
इथल्या प्रत्येकी एका आणि कंधार तालुक्यातल्या सोमठाणा उमरज इथल्या एका रुग्णाचा समावेश
आहे. या चारही महिला रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ३९१ झाली
आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत २८३ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या ७९ रूग्ण रूग्णालयात
उपचार घेत असल्याचं आमच्य वार्ताहरानं सांगितलं.
****
अहमदनगर शहरातल्या एका ९० वर्षांच्या आजीबाईंसह पाच
जणांनी कोरोना विषाणू
संसर्गावर मात केली आहे या सर्वांना आज रूग्णालयातून घरी सोडण्यात
आलं. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात या संसर्गातून मुक्त
झालेल्या रुग्णांची संख्या आता ३१२ झाली आहे.
****
नंदूरबार जिल्ह्यात आज एका ४७ वर्षीय कोरोना बाधित
पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळं आता जिल्ह्यात कोरोनामुळे मृत पावलेल्यांची
संख्या सात झाली आहे. जिल्ह्यात सध्या १६३ कोरोनाबाधित रूग्ण असून सध्या ८२ जण उपचार
घेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात कोविड संसर्गामुळे मरण पावलेल्या पोलिसांची
संख्या ६० झाली आहे. यापैकी ३८ पोलीस मुंबईतले आहेत. आतापर्यंत ४ हजार ९०० पोलिसांना
या विषाणूची लागण झाली असून, त्यापैकी ३ हजार ७०० पोलीस संसर्गमुक्त झाले आहेत. सध्या
राज्यभरात १ हजार १५ पोलिसांवर उपचार सुरू असल्याची माहिती पीटीआयनं दिली आहे.
****
स्वामी रामदेव यांच्या पतंजली कंपनीने तयार केलेलं
औषध प्रतिकार क्षमतावर्धक म्हणून विकता येईल, कोरोना विषाणू संसर्गावरचं औषध म्हणून
विकलं जाणार नाही, असा खुलासा रामदेव यांनी केला आहे. पतंजलीने तयार केलेल्या या औषधावर
आक्षेप घेत, आयुष मंत्रालयानं या औषधाची जाहिरात करण्यात मनाई केली होती, त्यानंतर
रामदेव यांनी आज हरिद्वार इथं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. मंत्रालयाच्या सूचनेनुसार
या औषधावर कोविड उपचार ऐवजी कोविड व्यवस्थापन असं नमूद केलं असल्याची माहिती त्यांनी
दिली. श्वासारी आणि कोरोनील या औषधांच्या विक्रीवर कोणतीही बंदी नसून, देशभरात हे औषध
कुठेही मिळू शकेल, असं स्वामी रामदेव यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
मराठा आरक्षणाबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप आमदार
विनायक मेटे यांनी केला आहे. ते आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विद्यमान
सरकारला मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य नाही. गेल्या सहा महिन्यात मराठा आरक्षण, शिव स्मारक
आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाची एकही बैठक सरकारने घेतलेली नाही, याकडे मेटे यांनी
लक्ष वेधलं. मराठा आरक्षण आंदोलनात ज्यांनी बलिदान दिलं, त्यांच्या वारसांना दहा लाख
रुपये आणि शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन हवेत विरलं असून, कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे
कायम असल्याचं सांगत, हे सरकार मराठा समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप मेटे यांनी केला
आहे.
*****
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी संतांच्या पादुका पालख्यांसोबत
आलेल्या सर्व २० वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्यावं, तसंच सर्व पालख्यांना नेहमीप्रमाणे
पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संत एकनाथ महाराज संस्थान
पालखी प्रमुखांनी केली आहे. पालख्यांसोबत आलेल्या वारकऱ्यांपैकी फक्त पाच वारकऱ्यांना
दर्शनाची परवानगी तसंच दोन जुलैला सर्व पालख्यांना पंढरपुरातून परतीसाठी प्रस्थान करण्याच्या
सूचना प्रशासनाकडून सर्व पालखी प्रमुखांना देण्यात आल्या. यानंतर सर्व पालखी प्रमुखांनी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या मठात बैठक घेतली. विविध पालख्यांचे प्रमुख
या बैठकीला उपस्थित होते. या पालख्या सर्व नियम अटी पूर्ण करून आषाढी वारीसाठी पंढरपुरात
आल्या आहेत. त्यामुळे सर्व पालख्या पौर्णिमेपर्यंत पंढरीत राहू द्याव्या आणि सर्व पालखी
सोहळ्यासह आलेल्या वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी प्रशासनाकडे
करण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त
राज्यातल्या जनतेला शुभेच्छा देत, संपूर्ण जगाच्या आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना
केली आहे. समाजात सद्भावाची शिकवण रुजवणाऱ्या संतमंडळींना नमन करत असल्याचं, पंतप्रधानांनी
एका ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
जालना शहराचं आराध्य दैवत आणि प्रति पंढरपूर अशी
ओळख असलेल्या आनंदी स्वामी महाराजांचा यात्रा उत्सव तसंच धार्मिक कार्यक्रम यंदा कोरोना
संक्रमणामुळं रद्द करण्यात आले आहेत. आज पहाटे सजवलेल्या एका वाहनातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. सुरक्षित अंतर राखण्याच्या
नियमांचं पालन करत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा
साजरा झाला.
****
केंद्रीय नागरी सेवा आयोगानं पूर्व परीक्षेच्या उमेदवारांना
परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा दिली आहे. येत्या चार ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे.
येत्या ७ ते १३ जुलै दरम्यान तसंच २० ते २४ जुलै दरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावरून
उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येईल. प्रथम येणाऱ्या विनंतीस प्राधान्य या नियमाने
केंद्र बदल केला जाईल, असंही आयोगानं स्पष्ट केल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
****
शेतकऱ्यांनी हवामान, पाणी आणि कृषी तंत्रज्ञानाचा
वापर करून शेती उत्पादन वाढवण्याचं आवाहन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे राज्य
संचालक विकास रस्तोगी यांनी केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अंबेजवळगा इथं कृषी संजीवनी
सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. गावात पडणारा पाऊस, भूगर्भातून होणारा
पाणी उपसा, पीक पद्धती, पाणीवापर, बियांणांची निवड, दुर्मिळ वाणांचं जतन, तसंच तंत्रज्ञानाचा
वापर याबद्दल गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी जागरूक होण्याची गरज रस्तोगी यांनी व्यक्त
केली. शेतीशाळेत या विषयांवर चर्चा होण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. गावातल्या शेतकरी
गटाला आणि ग्राहक कृषी संजीवनी समितीला या प्रकल्पाअंतर्गत सक्षम बनवणार असल्याचंही
ते यावेळी म्हणाले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी सप्ताह जनजागृती रथाला हिरवा झेंडा
दाखवून जनजागृतीचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.
****
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव
नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाईक
यांना अभिवादन केलं आहे. वसंतराव नाईक यांनी कृषी आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या कार्याचा
ठाकरे यांनी एका अभिवादन संदेशातून गौरवपूर्ण उल्लेख केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे
अध्यक्ष नाना पटोले यांनीही मंत्रालायात आज नाईक यांना अभिवादन केलं.
नांदेड इथं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा
नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केलं. या वेळी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह उपस्थितांनी नाईक यांना आदरांजली
वाहिली.
औरंगाबाद इथं जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ कल्याण
काळे यांच्यासह
सर्व पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी वसंतराव
नाईक यांना आदरांजली वाहिली.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर यांनी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं घोषित
केलेलं पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान
मिळावं या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यानी
आज लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण केलं.
राज्यातल्या कोणत्याही कर्जफेडणाऱ्या शेतकऱ्याला
अद्याप एक रुपयाही अनुदान मिळालेलं नसून, घोषणेची अमंलबजावणी करावी अन्यथा आगमी काळात
टाळेबंदीचे नियम पाळतच राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला
आहे.
****
उत्तरप्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे
मध्यप्रदेशाच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. मध्यप्रदेश उच्च
न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजय कुमार मित्तल यांनी आनंदीबेन पटेल यांना आज राज्यपाल
पदाची शपथ दिली.
*****
No comments:
Post a Comment