Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 July 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ जुलै २०२० सायंकाळी ६.००
****
**
आरोग्य सुविधांच्या बाबतीत राज्याला सक्षम बनवण्यासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी
पुढे यावं - मुख्यमंत्र्यांचं आवाहन
**
औरंगाबाद जिल्ह्यात आज नऊ कोविडग्रस्तांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या १२ हजार १५१
**
वॉट्सअप वर आक्षेपार्ह छायाचित्र पाठवणारा बीड जिल्ह्यातला अधिकारी निलंबित; कायदेशीर
कारवाईची प्रक्रिया सुरू
आणि
**
सैन्यदलात महिला कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरुपी कमिशनला मंजुरीबाबतचं पत्र जारी
****
आरोग्य
सुविधांच्या बाबतीत राज्याला सक्षम बनवण्यासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढे
यावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उस्मानाबाद इथं डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड-19 तपासणी
आणि संशोधन प्रयोगशाळेचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. उस्मानाबादची ही प्रयोगशाळा जशी लोकसहभागातून
उभारण्यात आली, तशाच पद्धतीने राज्यात आणखी प्रयोगशाळा उभारल्या जाव्यात, असं मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं.
दरम्यान
उस्मानबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६०१ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, यापैकी
३५५ रुग्ण बरे झाले आहेत, आतापर्यंत ३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या २१२ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
यामध्ये बीड बायपास इथला ६४ वर्षीय पुरुष, वंजारवाडीतील ७० वर्षीय महिला आणि ८० वर्षीय
पुरूष, राम नगरातला ३२ वर्षीय, सिडको मुकुंदवाडीतला ५५ वर्षीय, सेव्हन हिल परिसरातला
५६ वर्षीय पुरुष, तर पैठण दरवाजा परिसरातल्या ५५ वर्षीय, मित्रनगरातली ६२ वर्षीय, आणि
मिसारवाडीतल्या ४० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२३ कोरोना
बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात १२६ नवीन
कोरोना बाधित रुग्ण आढळले. यामध्ये महापालिका हद्दीतल्या १००, ग्रामीण भागातल्या २२
आणि शहराच्या प्रवेश नाक्यावरील जलद चाचण्यात चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले
आहेत. जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता १२ हजार १५१ झाली आहे. त्यापैकी
सहा हजार ६९० रुग्ण उपचार घेवून बरे झाले आहेत. तर पाच हजार ३८ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
बीड
जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आज एका ९० वर्षीय कोविडग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला. स्वामी
रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत आलेल्या या व्यक्तीला कोरोना
विषाणूची लागण झाल्याचा अहवाल आजच प्राप्त झाला होता. जिल्ह्यात या संसर्गामुळे मृतांची
संख्या आता २४ झाली आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बरे
झालेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ३८४ इतकी झाली आहे. दरम्यान, काल संध्याकाळपासून
आज दुपारपर्यंत रुग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची
संख्या आता १२४२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २६७४ इतकी झाली आहे.
****
सांगली
पोलीस दलात आज आणखी तीन जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. एक पोलिस अधिकारी आणि
पोलिसांच्या वाहतूक शाखेतील दोन कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट कोरोना बाधित आले आहेत. दोनच
दिवसांपूर्वी मिरज इथल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यालाही कोरोना विषाणू लागण झाल्याचं
निष्पन्न झालं होतं.
****
रत्नागिरी
जिल्हातील राजापूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णाला आणण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या
पथकाला धक्काबुक्की केल्या प्रकरणी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी सात जणांना अटक केली
असून इतर २५० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. राजापूर तालुक्यातल्या साखरीनाटे इथं
काल ही घटना घडली होती. त्यामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि एक पोलीस जखमी झाला होता.
****
बीड
जिल्ह्यात महिला आणि बालविकास विभागातल्या एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे.
या अधिकाऱ्यानं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वॉट्सअप ग्रूपवर आक्षेपार्ह छायाचित्र पाठवल्यानं,
ही कारवाई करण्यात आल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं
आहे. या अधिकाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असून, त्याला सहकार्य करणाऱ्यांवरही
कारवाईचा इशारा ठाकूर यांनी दिला आहे.
****
सैन्यदलात
कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरुपी कमिशन नेमण्याला मंजुरी देण्याबाबतचं पत्र
केंद्र सरकारनं जारी केलं आहे. यामुळे आता सैन्यदलात महिलांची जबाबदारीच्या पदांवर
नियुक्ती शक्य होणार आहे. सैन्यदलाच्या विविध दहा शाखांमध्ये लघु सेवा कमिशनवर कार्यरत
महिला कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल, असं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****
अयोध्येत
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची
आज लखनौ इथं केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या विशेष न्यायालयात जबाब नोंदवण्यात
आला. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचाही याच प्रकरणी उद्या
शुक्रवारी जबाब नोंदवला जाणार आहे. दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे हे जबाब नोंदवले जात
आहेत.
****
उपराष्ट्रपती
व्यंकय्या नायडू यांनी काल राज्यसभा खासदारांच्या शपथविधीदरम्यान जय भवानी जय शिवाजी
या घोषणेबद्दल घेतलेल्या कथित आक्षेपाचा निषेध करण्यासाठी औरंगाबाद शहरातल्या क्रांती
चौक इथं शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. शिवसेना नेते चंद्रकातं खैरे, जिल्हाप्रमुख
अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह शिवसैनिकांनी यावेळी घोषणा देत निषेधाचे
फलक झळकावले.
परभणी
इथंही शिवसेनेकडून याबाबत राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत निवेदन देण्यात
आलं. या निवेदनावर खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या
सह्या आहेत.
दरम्यान,
असा काही प्रकार घडलाच नसल्याचा खुलासा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. राज्यसभा
सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर आपण दिलेल्या घोषणांना सभापती व्यंकय्या नायडू यांनी नव्हे,
तर काँग्रेसच्या काही खासदारांनी आक्षेप घेतला होता, असं उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांना
सांगितलं.
****
मराठा
क्रांती मोर्चाच्या वतीनं आज औरंगाबाद - पुणे महामार्गावर कायगाव टोका इथं ‘बलिदान
ते आत्मबलिदान’ आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना
दिलेली आश्वासनं राज्य सरकारनं पाळली नाही, त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचं
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी सांगितलं. संबंधित कुटुंबियांशी ३०
जुलै रोजी मंत्रालयात चर्चा करुन प्रश्न मार्गी लावणार असल्याचं राज्यशासनाचं पत्र
आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. ३० जुलै रोजी मंत्रालयात
होणाऱ्या बैठकीत शासनानं मागण्या पूर्ण केल्या नाही, तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं
नऊ ऑगस्टला तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही समन्वयक रमेश केरे यांनी यावेळी
दिला आहे.
****
नांदेड
जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे घोटी गावाजवळ
राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या बांधकामासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता वाहून गेला.
यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक बंद पडली आहे. किनवट शहराचा तेलंगणा राज्यातल्या
आदिलाबाद तसंच विदर्भातल्या जिल्ह्यांशी संपर्क तुटला आहे.
****
धुळे
जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनातर्फे लॉकडाऊनच्या काळात राबवलेल्या मोहिमेत तब्बल
६२ लाख ९५ हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. याबरोबरच ३८७ किलो भेसळयुक्त गोडतेल
देखील जप्त केलं असल्याची माहिती धुळ्याचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी दिली आहे.
****
उस्मानाबाद
इथं अर्चना श्रीमंत कदम या तलाठी महिलेला आज २५ हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात
आली. सातबारा नोंद घेण्यासाठी या महिलेनं ३४ हजार रुपये लाच मागितली होती. लाचलुचपत
प्रतिबंधक पथकानं आज तलाठी कार्यालयात सापळा रचून तिला रंगेहाथ अटक केली.
****
अन्नधान्याच्या
वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कृषी क्षेत्राचं आधुनिकीकरण आणि पाणी व्यवस्थापनाची
गरज असल्याचं, नवी दिल्ली इथल्या वनस्पतींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण समितीचे
अध्यक्ष डॉ. के.व्ही. प्रभू यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथं महात्मा
फुले कृषी विद्यापीठात बोलत होते. अनुवंशशास्त्राचे पितामह ग्रेगर जे. मेंडेल यांच्या
१९८ व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. अन्नसुरक्षेसाठी हवामानातील
बदलास प्रतिरोधक पिके या विषयावर हे एक दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार घेण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment