Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 02 July 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२
जुलै
२०२० सकाळी ७.१० मि.
****
·
महामार्गांच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये चीनच्या कंपन्यांना सहभाग नाही, सुक्ष्म,
लघू आणि मध्यम उद्योगांमधल्या गुंतवणुकीमध्येही बंदी.
·
कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी रुग्णवाहिका तसंच खासगी वाहनं अधिग्रहीत करण्याचा
निर्णय.
·
राज्यात काल आणखी पाच हजार ५३७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, १९८ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू.
·
औरंगाबाद जिल्ह्यात आठ रुग्णांचा मृत्यू तर २१७ नवे बाधित रुग्ण.
·
जालना शहरातही दोन बाधितांचा मृत्यू; लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, परभणी
आणि बीड जिल्ह्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ.
आणि
·
पैठणचं ‘संतपीठ’ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न.
****
भारतातल्या कोणत्याही महामार्गांच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये चीनच्या कंपन्यांना
सहभाग असणार नाही, तसंच सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांमधल्या गुंतवणुकीमध्येही त्यांच्यावर
बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी
काल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. चीनच्या कंपन्यांना या प्रकल्पांमध्ये
संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातूनही सगभागी होता येणार नाही, असं गडकरी यांनी सांगितलं.
स्वावलंबी भारत होण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं ते म्हणाले. चीनच्या
कंपन्यांवर प्रतिबंध घालण्याचं धोरण लवकरच जाहीर केलं जाणार असून, राष्ट्रीय महामार्ग
प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांना चांगल्या संधी मिळाव्या म्हणून नियम शिथिल करण्यात
येत असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, भारत संचार निगम लिमिटेड - बीएसएनएलनं फोर जी नेटवर्कमध्ये सुधारणा
आणि विस्तार करण्याची निविदा रद्द केली आहे. यावर्षी मार्च महिन्यात ही निविदा जारी
करण्यात आली होती.
****
राज्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यासाठी
रुग्णवाहिका तसंच खासगी वाहनं जिल्हा प्रशासनानं अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे. याबाबत काल आरोग्य विभागानं शासन निर्णय जारी केला. रुग्णवाहिका अधिग्रहीत
करण्याची प्रक्रिया संबंधित महापालिका आयुक्त आणि महापालिकेच्या हद्दीबाहेर जिल्हाधिकारी
राबवणार आहेत. अधिग्रहित केलेली या रुग्णवाहिका जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात
येतील. जिल्ह्यांतली रुग्णालयं, स्वयंसेवी संस्था यांच्याकडील रुग्णवाहिका प्राधान्यानं
अधिग्रहीत करण्यात येतील आणि त्यानंतरही गरज भासल्यास, खासगी वाहन पुरवठादारांची वाहनंदेखील
रुग्णवाहक वाहन म्हणून अधिग्रहीत केली जातील. खासगी रुग्णवाहिकांसाठी अवाजवी दर आकारण्यात
येत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर या वाहनांचा दरही निश्चित करण्यात येणार
आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण या वाहनांचा भाड्याचा दर निश्चित करील. अधिग्रहीत
केलेल्या या रुग्णवाहिका आणि वाहनं २४ तास उपलब्ध असतील, असंही शासनानं आदेशात स्पष्ट
केलं आहे.
****
कोविड संक्रमणासोबतच्या लढाईत पुढच्या फळीत असलेल्या डॉक्टरांचं संपूर्ण देश
कौतुक करत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल डॉक्टर दिनाच्या
निमित्ताने केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी, या संकट काळात डॉक्टर तसंच परिचारिका
भगवंताचं रूप असल्याचं म्हटलं आहे. देशासाठी सेवा देणाऱ्या सर्वांचा सन्मान करणं हे
प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही डॉक्टराचं अभिनंदन केलं आहे.
रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देत असलेल्या अमूल्य योगदानासाठी जावडेकर यांनी डॉक्टरांचे
तसंचं आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही डॉक्टरांच्या सेवा आणि समर्पणाला सलाम करत
असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी
रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या डॉक्टर्सना उद्देशून पत्राद्वारे संदेश दिला आहे. कोविड १९
च्या लढ्यात डॉक्टर देत असलेलं योगदान येणाऱ्या कित्येक पिढ्या विसरणार नाहीत, यातून
आपण कोरोना विषाणूला हरवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या पत्रातून
व्यक्त केला.
****
राज्यात काल आणखी पाच हजार ५३७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे
राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख ८० हजार २९८ इतकी झाली आहे. काल १९८ जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं आठ हजार ५३ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. तर काल दिवसभरात दोन हजार २४३ रुग्णांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. राज्यात
आतापर्यंत ९३ हजार १५४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या ७९ हजार ९१ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये
सिडको एन आठ, आरेफ कॉलनी, लोटाकारंजा, अहिंसा नगर, रशिदपुरा, आझाद चौक आणि रेहमानिया
मशिद परिसरातल्या रुग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर गंगापूर आणि जालना इथल्या प्रत्येकी
एका रुग्णाचाही काल औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात या आजारानं
आतापर्यंत २७१ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी २१७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या पाच हजार ७८२ झाली आहे. काल आढळलेल्या
रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रातले १३६, तर ग्रामीण भागातले ८१ रुग्ण आहेत. औरंगाबाद
जिल्ह्यात काल ११६ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत
जिल्ह्यात दोन हजार ८५७ रुग्ण बरे झाले असून, सध्या दोन हजार ६५४ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
जालना शहरातल्या दोन कोरोना विषाणू बाधितांचा काल मृत्यू झाला. यामध्ये दाणाबाजार
परिसरातली ५५ वर्षीय महिला आणि बुऱ्हाननगर भागातल्या ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गामुळे एकूण मृतांची संख्या आता १७ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल कोरोना विषाणूचे नवीन २७ रुग्ण आढळून आले आहेत. यातले
२२ रुग्ण जालना शहरातले तर पाच रुग्ण ग्रामीण भागातले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची
संख्या आता ५८० झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणुमुक्त झालेल्या नऊ रुग्णांना काल
सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातले ३६० रुग्ण या आजारातून बरे झाले असून, बाधित
१७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी ३४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात
एकूण रुग्णसंख्या ३८७ झाली आहे. तर काल पाच रुग्णांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं.
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत २०६ रुग्ण बरे झाले असून, १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. भांडेगाव
इथले दोन, तर वसमत, पिंपळखुटा, हिंगोली आणि औंढा नागनाथ इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे.
त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या २७६ झाली आहे. त्यापैकी २३८ रुग्ण बरे झाले
असून, सध्या ३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यातले प्रत्येकी दोन, तर परंडा आणि उमरगा तालुक्यातला
प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या २३५ झाली आहे.
त्यापैकी १७५ रुग्ण बरे झाले असून, १२ जणअंचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ४८ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल नव्याने पाच कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आले. यात
नांदेड शहरातले चार आणि कंधार तालुक्यातला एक रुग्ण आहे. जिल्ह्यात एकूण बाधितांची
संख्या ३९२ झाली आहे. तर जिल्ह्यात काल नऊ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून
सुटी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत २९२ रुग्ण बरे झाले असून, सध्या ८३ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल नवे तीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. यात परभणी शहरातले
दोन तर पाथरी तालुक्यातला एक रुग्ण आहे. जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधितांची एकूण
संख्या ११८ झाली आहे. यापैकी ९१ रुग्ण बरे झाले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात सध्या २३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड शहरात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे
जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १२७ झाली आहे.
दरम्यान, शहरात मंगळवारी कोरोना विषाणू बाधित आढळलेला रुग्ण एका खासगी रुग्णालयात
उपचार घेत होता. तसंच त्याने अनेकांसोबत संपर्कही साधला. या सर्वांचा शोध घेण्यासाठी
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी नऊ जुलैपर्यंत टाळेबंदीची घोषणा केली आहे. या दरम्यान
फक्त जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामीण
विकास, वीज मंडळ यांचेच कार्यालय सुरू राहतील तर बँका, खाजगी कार्यालय, इतर आस्थापना
ह्या पूर्णपणे बंद राहतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
मुंबईत काल आणखी एक हजार ५११ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ७५
जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात काल एका दिवसात सर्वाधिक एक हजार २५१ रुग्ण आढळले,
तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात १८३ रुग्ण, तर दोन मृत्यूंची नोंद झाली.
पालघर जिल्ह्यात २५७, जळगाव १३८, सोलापूर ४०, अहमदनगर ३५, सातारा १४ तर सिंधुदुर्ग
जिल्ह्यात काल आणखी ११ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता महसूल,
जिल्हा परिषद, आरोग्य आणि पोलीस विभागांनी एकमेकात समन्वय साधून खबरदारीचा उपाय म्हणून
प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार
यांनी दिले. औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावर
उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. कोविड योद्ध्यांना
सुरक्षा साहित्य आणि निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही सत्तार यांनी यावेळी दिली.
सोयगावच्या सावळदबारा, बनोटी, तसंच सिल्लोडच्या शिवना आमठाणा, अंधारी आणि इतर ठिकाणी
कोविड सेंटरचं नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी दिल्या.
****
केंद्रीय लोकसेवा सेवा आयोगानं पूर्व परीक्षेच्या उमेदवारांना परीक्षा केंद्र
बदलण्याची मुभा दिली आहे. येत्या चार ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे. येत्या ७ ते
१३ जुलै दरम्यान तसंच २० ते २४ जुलै दरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावरून उमेदवारांना
परीक्षा केंद्र बदलता येईल. प्रथम येणाऱ्या विनंतीस प्राधान्य या नियमाने केंद्र बदल
केला जाईल, असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे.
****
भारताची लोक सेवा प्रसारक असलेल्या प्रसार भारतीनं काल आपल्या पहिल्या निवड
मंडळाची स्थापना केली. केंद्र सरकारच्या सहसचिव पदापेक्षां कमी दर्जाच्या सर्व पदांची
भरती या मंडळामार्फत केली जाईल. १९९७ मध्ये स्वायत्त संस्था म्हणून प्रसार भारतीची
स्थापना झाल्यानंतर प्रथमच या मंडळाची नियुक्ती झाली आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी भारत
प्रकाशनचे संचालक जगदीश उपासने यांची नियुक्ती करण्यात आली असून या मंडळामध्ये माहिती
आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रसारण सहसचिव हे पदसिद्ध सदस्य असतील, याशिवाय अन्य चार
सदस्यांचा मंडळात समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथलं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गतचं
‘संतपीठ’ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं उच्च आणि
तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. आषाढी एकादशी निमित्त काल दूरदृश्य
संवाद प्रणालीच्या माध्यमातून ‘संतपीठ’ सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक झाली, त्यावेळी
ते बोलत होते. सध्या या संत विद्यापीठाच्या इमारतीमध्ये ५० वर्गखोल्या, ग्रंथालय आणि
१०० विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय असलेलं वसतिगृह आहे. संतपीठाची इमारत लवकरच डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्वाधीन करण्यात येईल आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून
संत वाङ्मयाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील, असंही सामंत
यावेळी म्हणाले. संत वाङमयाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या बचतगटांची उत्पादनं ही ॲमेझॉन आणि ‘गर्व्हमेंट इ मार्केट प्लेस
-जेम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आली असून त्यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि
ग्राहकांना त्यांच्या वस्तू सुलभरित्या घरपोच मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री
हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यांनी काल मंत्रालयात या उपक्रमाचा प्रारंभ केला. सध्या
अॅमेझॉनवर ३३ तर जीईएम पोर्टलवर ५० उत्पादनांची नोंद करण्यात आली असून, या उत्पादनांना
आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होत असल्याचं ते म्हणाले.
****
मराठा आरक्षणाबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला
आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विद्यमान सरकारला मराठा आरक्षणाबाबत
गांभीर्य नाही. गेल्या सहा महिन्यात मराठा आरक्षण, शिव स्मारक आणि अण्णासाहेब पाटील
महामंडळाची एकही बैठक सरकारने घेतलेली नाही, याकडे मेटे यांनी लक्ष वेधलं. मराठा आरक्षण
आंदोलनात ज्यांनी बलिदान दिलं, त्यांच्या वारसांना दहा लाख रुपये आणि शासकीय नोकरी
देण्याचे आश्वासन हवेत विरलं असून, कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे कायम असल्याचं सांगत,
हे सरकार मराठा समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप मेटे यांनी केला आहे.
****
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी संतांच्या पादुका पालख्यांसोबत आलेल्या सर्व २०
वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्यावं, तसंच सर्व पालख्यांना नेहमीप्रमाणे पौर्णिमेपर्यंत
पंढरपुरात राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संत एकनाथ महाराज संस्थान पालखी प्रमुखांनी
केली आहेत. पालख्यांसोबत आलेल्या वारकऱ्यांपैकी फक्त पाच वारकऱ्यांना दर्शनाची परवानगी
तसंच दोन जुलैला पंढरपुरातून परतीसाठी प्रस्थान करण्याच्या सूचना प्रशासनाकडून सर्व
पालखी प्रमुखांना देण्यात आल्या होत्या. यानंतर सर्व पालखी प्रमुखांनी श्री संत ज्ञानेश्वर
महाराज संस्थानच्या मठात बैठक घेतली. विविध पालख्यांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
या पालख्या सर्व नियम अटी पूर्ण करून आषाढी वारीसाठी पंढरपुरात आल्या आहेत. त्यामुळे
सर्व पालख्या पौर्णिमेपर्यंत पंढरीत राहू द्याव्या आणि सर्व पालखी सोहळ्यासह आलेल्या
वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात
आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त राज्यातल्या जनतेला
शुभेच्छा देत, संपूर्ण जगाच्या आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना केली आहे. समाजात सद्भावाची
शिकवण रुजवणाऱ्या संतमंडळींना नमन करत असल्याचं, त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
जालना शहराचं आराध्य दैवत आणि प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या आनंदी स्वामी
महाराजांचा यात्रा उत्सव तसंच सर्व धार्मिक कार्यक्रम यंदा कोरोना विषाणू संक्रमणामुळे
रद्द करण्यात आले आहेत. काल पहाटे सजवलेल्या एका वाहनातून आनंदी स्वामी महाराजांची
पालखी मिरवणूक काढण्यात आली. सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचं पालन करत मोजक्याच
भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला.
****
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाईक यांना अभिवादन केलं आहे. वसंतराव नाईक यांनी कृषी
आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या कार्याचा ठाकरे यांनी एका अभिवादन संदेशातून गौरवपूर्ण
उल्लेख केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही मंत्रालयात
नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं. या वेळी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह उपस्थितांनी नाईक यांना
आदरांजली वाहिली.
औरंगाबाद इथं जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे यांच्यासह सर्व पदाधिकारी
आणि कार्यकत्यांनी वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहिली.
****
कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं घोषित केलेलं पन्नास हजार रुपये
प्रोत्साहन अनुदान मिळावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बहुजन रयत परिषदेच्या
कार्यकर्त्यानी काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं. राज्यातल्या
कोणत्याही कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला अद्याप एक रुपयाही अनुदान मिळालेलं नसून, घोषणेची
अमंलबजावणी करावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं
दिला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात अंबेजवळगा इथं नानाजी देशमुख कृषी संजीवनी सप्ताहाचा काल
प्रकल्प राज्य संचालक विकास रस्तोगी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी नानाजी
देशमुख कृषी संजीवनी सप्ताह जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून जनजागृतीचा शुभारंभही
केला. या योजनेविषयी माहिती देताना ते म्हणाले –
या प्रकल्पामध्ये चांगल्या पध्दतीची शेती नवीन technology
सोबत काय करता येईल यासाठी आपण शेतीशाळा करतो आहे. त्याच्याशिवाय शेतकऱ्यांच्या गटांच्या
माध्यमातून त्यांचे काही business plan असेल, त्यांना आपण मदत करतो आहेत. चांगल्या
पध्दतीचे वाण आहेत, त्यांच्या production साठी सुध्दा या प्रकल्पातून मदत आहे. आणि
एकंदर गावाची जी ग्राम कृषी संजीवनी समिती आहे याचे माध्यमातून हा प्रकल्पाचा संदेश
आपण प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या जालना रोडवरच्या एका हॉटेलमधून पोलिसांनी काल चलनातून बाद
झालेल्या हजार आणि ५०० रुपयाच्या ९८ लाख ९२ हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या. याप्रकरणी
दोन महिलांसह चौघांना ताब्यात घेतलं आहे.
****
परभणी शहरात काल पोलिसांनी दोन लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त
केला. एका दुकानातून सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरु असल्याची माहिती
मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
औरंगाबाद शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या सात जणांविरुद्ध काल महानगरपालिका आयुक्त
आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वत: कारवाई केली. या नागरिकांकडून दंड वसूल करुन त्यांच्याविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
कोरोना विषाणू संक्रमणाच्या प्रार्श्वभूमीवर मुंबईतला लालबागच्या राजाचा सार्वजनिक
गणेशोत्सव या वर्षी रद्द करण्यात आला आहे. गणेशोत्सवा ऐवजी यंदा आरोग्य उत्सव साजरा
करण्याचं मंडळानं ठरवलं आहे. उत्सव काळात ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरं, फ्लाझमा संकलन,
यासारखे उपक्रम चालवले जाणार आहेत. मुख्यमंत्री मदत निधीला २५ लाख रूपये देण्यात येणार
असल्याचंही मंडळानं जाहीर केलं आहे.
****
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात पाच दशलक्ष
घनमीटरनं वाढ झाली आहे. धरणातला पाणीसाठा आता सुमारे २४ दशलक्ष घनमीटर झाला आहे. हे
प्रमाण धरणाच्या मृत साठ्याच्या पन्नास टक्के एवढं असलं, तरीही पुढचे सहा महिने लातूर
शहराचा पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला असल्याचं, महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी
सांगितलं.
****
उस्मानाबाद इथल्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान
मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागानं विज्ञान क्षेत्रात मानाचा असणारा स्टार कॉलेजचा
दर्जा प्रदान केला आहे. यासंदर्भात जैवतंत्रज्ञान विभाग आणि जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे,
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्यावर्षी
जून २०१९ मध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
****
लातूर जिल्हा पोलीस मुख्यालयातले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास शिंगडे यांनी
त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभावेळी जमा केलेली एक लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री
सहायता निधीला दिली आहे. या मदतीचा धनादेश काल त्यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र माने
यांच्याकडे सुपुर्द केला.
****
परभणी महानगरपालिकेचं विरोधी पक्षनेते पद भारतीय जनता पक्षाला देण्यात यावं,
अशी मागणी पक्षानं पालिका आयुक्त देविदास पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. यापूर्वी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी होती, मात्र राज्यात
महाविकास आघाडी स्थापन झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी पक्षांमध्ये सामील
झाली आहे, त्यामुळे सध्या महापालिकेत विरोधी पक्ष नसल्याचं भाजपनं आयुक्तांना दिलेल्या
निवेदनात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment