Friday, 24 July 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.07.2020....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 July 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जुलै २०२० सकाळी ७.१० मि.
****
·      चीन आणि सीमारेषेलगतच्या इतर देशातून होणाऱ्या खरेदीवर केंद्र सरकारचे निर्बंध घालणारे आदेश जारी.
·      कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरूवात; बालवाडी ते बारावीच्या वर्गापर्यंतचं वेळापत्रक जाहीर.
·      राज्यात काल आणखी नऊ हजार ८९५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, २९८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·      औरंगाबादमध्ये १२, नांदेड आणि लातूरमध्ये प्रत्येकी पाच, उस्मानाबाद आणि परभणीत प्रत्येकी तीन, जालना आणि बीडमध्ये प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू.
·      सोन्याच्या भावाचा नवा उच्चांक, ५१ हजार ४४३ रूपये प्रतितोळा.
आणि
·      मराठवाड्यात अनेक भागात जोरदार पाऊस.
****
लडाखमध्ये चीन सोबत सुरू असलेल्या सीमा रेषेच्या वादानंतर केंद्र सरकारनं चीन आणि सीमारेषेलगतच्या इतर देशांतून होणाऱ्या खरेदीवर निर्बंध घातले आहेत. यासाठी सामान्य वित्तीय नियम २०१७ मध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात अर्थमंत्रालयाच्या व्यय विभागानं सार्वजनिक खरेदीसंदर्भात एक सविस्तर आदेश जारी केला असून या आदेशानुसार आता देशाच्या सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्या शेजारील देशातल्या निविदाधारकांवर बंधन आली आहेत. शेजारील देशातला निविदाधारक जर सक्षम प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असेल तरच त्याला निविदा प्रक्रियेत सहभागी होता येईल आणि आपल्या मालाची विक्री किंवा सेवा देता येईल. उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचा प्रोत्साहन विभाग - डीपीआयआयटीने गठीत केलेली समिती सक्षम प्राधिकरण म्हणून काम करील. मंजुरीसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून राजकीय तसंच तर गृह मंत्रालयकडून सुरक्षाविषयक ना हरकत घेणे बंधनकारक असणार आहे, असं या आदेशात म्हटलं आहे. हे आदेश सर्व राज्यांनाही लागू असणार आहेत.
****
नांदेड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका पुढील तीन महिन्यांकरता पुढे ढकलण्यास आणि या दोन्ही पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत घेतला.
निसर्ग चक्रीवादळामुळे पुर्णत: नष्ट झालेल्या सुपारी आणि नारळाच्या झाडांना विशेष बाब म्हणून प्रति झाडाप्रमाणे वाढीव दरानं मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतला.
दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूची परिस्थिती तसंच पावसाला सुरुवात झाली असूनही पणन विभागानं विक्रमी २१८ लाख ७३ हजार क्विंटल कापसाची खरेदी केल्यामुळे मंत्रिमंडळानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच सहकार आणि पणन मंत्र्यांचं अभिनंदन केलं. गेल्या दहा वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचं पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली असून राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं आहे. बालवाडी ते बारावीच्या वर्गापर्यंतचं हे वेळापत्रक आहे. यामध्ये बालवाडीसाठी दररोज ३० मिनिटांचा सोमवार ते शुक्रवार असा ऑनलाईन वर्ग होईल, या वर्गांमध्ये पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केलं जाईल. पहिली आणि दुसरीसाठीही याच पाच दिवसात दरररोज ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहेत. यामध्ये १५ मिनिटं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर उर्वरित १५ मिनिटं विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण दिलं जाणार आहे. तिसरी ते आठवीसाठी दररोज ४५ मिनिटांचे दोन वर्ग तर नववी ते बारावीसाठी ४५ मिनिटांची चार वर्ग घेतले जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जाणार आहे.
****
अभियांत्रिकी प्रवेशासाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा - जेईई देणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि केंद्र सरकारच्या अन्य संस्थेत प्रवेशासाठीच्या पात्रतेची अट शिथिल करण्यात आली आहे. प्रवेशासाठीच्या जागा निश्चित करणाऱ्या केंद्रीय मंडळानं सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय घेतल्याचं, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. जेईई मुख्य परीक्षा २०२० उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त बारावीच्या परिक्षेचं उत्तीर्ण प्रमाणपत्र द्यावं लागेल, असं निशंक यांनी सांगितलं.
****
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी परवा राज्यसभा खासदारांच्या शपथविधीदरम्यान ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषणेला घेतलेल्या कथित आक्षेपाविरूद्ध औरंगाबादमध्ये क्रांती चौकात शिवसेनेनं निदर्शनं करून निषेध केला. शिवसेना नेते चंद्रकातं खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह शिवसैनिकांनी यावेळी घोषणा देत निषेधाचे फलक झळकावले.
परभणी इथंही शिवसेनेकडून याबाबत राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलं. या निवेदनावर खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहूल पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
मात्र असा काही प्रकार घडलाच नसल्याचा खुलासा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विट करून भूमिका आपली मांडली आहे. त्यांनी आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांचे खंदे प्रशंसक आहोत. तसंच देवी भवानीचा उपासक असल्याचं सांगत शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत, याची परंपरेनुसार सभासदांना आठवण करून दिली. यात अजिबात अनादर केलेला नाही, असं म्हटलं आहे.
****
राज्यात काल आणखी नऊ हजार ८९५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या तीन लाख ४७ हजार ५०२ झाली आहे. काल २९८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं १२ हजार ८५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल सहा हजार ४८४ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत एक लाख ९४ हजार २५३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या राज्यात एक लाख ४० हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यभरात आतापर्यंत १७ लाख ३७ हजार ७१६ नागरिकांनी कोरोना विषाणू चाचणी करण्यात आली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या बारा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये बीड बायपास इथल्या ६४ वर्षीय, राम नगरातल्या ३२ वर्षीय, सिडको मुकुंदवाडीतल्या ५५ वर्षीय, सेव्हन हिल परिसरातल्या ५६ वर्षीय पुरुष, लोटाकारंजा भागातल्या ४९ वर्षीय, शिवाजी नगरमधल्या ५२ वर्षीय आणि वंजारवाडीतल्या ८० वर्षीय पुरुष रुग्णासह, याच भागातल्या ७० वर्षीय, पैठण दरवाजा परिसरातल्या ५५ वर्षीय, मित्रनगर मधल्या ६२ वर्षीय, मिसारवाडीतल्या ४० वर्षीय आणि बालाजी नगर मधल्या ५७ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४२६ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी ३२२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. काल जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार हजार ९६६ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी १४० जण बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १२ हजार ३४७ झाली आहे. तर काल ४८८ जण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत सात हजार १७८ रुग्ण बरे झाले असून, सध्या चार हजार ७४३ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात मुखेड इथल्या ८५ वर्षीय आणि ५६ वर्षीय, बिलोली तालुक्यातल्या कोल्हे बोरगाव इथल्या ६० वर्षीय, देगलूर तालुक्यातल्या सुगाव इथल्या ५५ वर्षीय आणि नांदेड तालुक्यातल्या तुप्पा इथल्या ७५ वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ५६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये नांदेड शहरातले २३, उमरी ११, कंधार आणि देगलूर इथले प्रत्येकी चार, लिंबगाव आणि लोहा इथले प्रत्येकी दोन, तर तुप्पा, मुखेड, हदगाव, तामसा, पेवा, सुगाव, नायगाव, परभणी जिल्ह्यातल्या सेलू, गंगाखेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या एक हजार १३० झाली आहे. तर काल ३६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ६१० रुग्ण बरे झाले असून, सध्या ४५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या ११ दिवसांपासून सुरु असलेली संचारबंदी काल मागे मध्यरात्री मागे घेण्यात आली. आजपासून सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत काही नियम आणि अटींवर व्यवहार सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांनी परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या सुचनेनुसार तसंच यापूर्वीच्या आदेशात नमूद निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळून सूट देण्यात आली आहे.
****
लातूर जिल्ह्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये देवणी तालुक्यातल्या ६६ वर्षीय, अहमदपूर तालुक्यातल्या ६० वर्षीय, आणि पिंपळगाव इथल्या ७२ वर्षीय पुरुष रुग्णासह शिरुर अनंतपाळ इथल्या ६५ वर्षीय आणि लातूर इथल्या ५२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात काल आणखी ३२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या एक हजार ३५३ झाली आहे. त्यापैकी ७६१ रुग्ण बरे झाले असून, सध्या ५२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये उस्मानाबाद शहरातल्या ६५ वर्षीय आणि टाकळी इथल्या ७० वर्षीय पुरुष रुग्णासह तुळजापूर इथल्या ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात या आजारानं मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३४ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी १८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद इथले नऊ, उमरगा तालुक्यातले पाच, तर कळंब आणि तुळजापूर इथले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ६०१ झाली आहे. त्यापैकी ३५५ रुग्ण बरे झाले असून, सध्या २१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
****
परभणी जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर काल आणखी १६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ४५८ झाली आहे. काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत २१६ रुग्ण बरे झाले असून, सध्या २२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये जालना शहरातल्या राजेंद्र प्रसाद रोडवरील ७४ वर्षीय आणि गौतमनगर मधल्या ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे या विषाणू संसर्गानं जिल्ह्यात झालेल्या मृतांची संख्या ५८ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ३६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक हजार ६१५ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ४५ रुग्णांना काल सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातले ९८५ रुग्ण बरे झाले असून, बाधित ४९६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानं जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या २३ झाली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात काल आणखी १६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये परळी इथले सात, बीड सहा, अंबाजोगाई आणि गेवराई इथं प्रत्येकी दोन, तर धारुरु इथला एक रुग्ण आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी ५४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यापैकी हिंगोली शहरातले ४३ रुग्ण हे अँटिजेन चाचणीतून बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ५०६ झाली आहे. तर काल सात रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ३३४ रुग्ण बरे झाले असून, सध्या १६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
****
मुंबईत काल आणखी एक हजार २५७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ५५ रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात काल आणखी दोन हजार ३६८ नवे रुग्ण आणि ५८ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात काल ५७५ बाधित रुग्ण आढळले, तर १३ जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात ४२२, सातारा ९२, सांगली ७० तर वाशिम जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
****
राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच घेण्यात याव्यात, अशी सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे केली आहे. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करु शकणार नसल्याचं देशमुख यांनी विद्यापीठाचे कुलगुरु दिलीप म्हैसेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. वैद्यकीय विद्यापीठात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने त्यांची इंटर्नशिप सुरु करण्यात यावी, तसंच प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातल्या विद्यार्थ्यांचा पुढील वर्षाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात यावा आणि सर्व अप्रमाणित परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्या, असं देशमुख यांनी सूचित केलं आहे.
****
सोन्याच्या भावानं काल नवा विक्रम नोंदवला. दिल्लीत काल सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम दरात ५०२ रुपयांनी वाढ होऊन, सोन्याचा दर ५१ हजार ४४३ रुपयांवर पोहोचला. चांदीच्या दरात मात्र किलोमागे ६९ रुपयांनी घट झाली. काल चांदीचा दर प्रति किलो ६२ हजार ७६० रुपये एवढा होता.
****
मराठवाड्यात काल अनेक भागात जोरदार पाऊस झाला.
औरंगाबाद शहरात काल रात्री तासभर मुसळधार पाऊस झाला. सखल भागातले रस्ते, चौकात पाणी साचलं, अनेक लोकांच्या घरामध्येही पाणी शिरलं. सिल्लोड, सोयगाव, कन्नड तालुक्यातही गेले दोन दिवस चांगला पाऊस झाला.
जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागातही काल सायंकाळी चांगला पाऊस पडला. भोकरदन तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. परभणी जिल्ह्यात बुधवारी रात्री आणि काल सकाळी झालेल्या दमदार पावसामुळे ढालेगाव, तारुगव्हाण बंधारे पूर्ण भरुन वाहत आहेत. लातूर शहरासह परिसरात काल जोरदार पाऊस झाला. यामुळे मांजरा प्रकल्पात २७ पूर्णांक ९० दशलक्ष घनमीटर पाण्याची वाढ झाली आहे. हिंगोली आणि बीड मध्येही मुसळधार पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात परवा मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे घोटी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलाच्या बांधकामासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता वाहून गेला. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. यामुळे किनवट शहराचा तेलंगणा राज्यातल्या आदिलाबाद तसंच विदर्भातल्या जिल्ह्यांशी संपर्क तुटला आहे.
दरम्यान, नांदेडमधला शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे काल त्याचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत चांगला पाऊस झाल्यामुळे ते भरले आहे. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना पुराचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
आरोग्य सुविधांच्या बाबतीत राज्याला सक्षम बनवण्यासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढे यावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उस्मानाबाद इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड-१९ तपासणी आणि संशोधन प्रयोगशाळेचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. उस्मानाबादची ही प्रयोगशाळा जशी लोकसहभागातून उभारण्यात आली, तशाच पद्धतीने राज्यात आणखी प्रयोगशाळा उभारल्या जाव्यात, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तसंच अपरिहार्य कारणांसाठी इतर जिल्ह्यात ये-जा करण्यासाठीच यापुढे ई-पास देण्यात येणार आहे. याशिवाय इतर कारणांसाठी नागरिकांनी ई-पासची मागणी करु नये, प्रशासनाकडून अशा मागण्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितलं आहे. वैद्यकीय कारणासाठी ई-पासच्या मागणीसाठी यापुढे आता केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, तालुका शासकीय रुग्णालय किंवा जिल्हा शासकीय, रुग्णालय इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं वैद्यकीय प्रमाणपत्रच ग्राह्य धरलं जाईल, असंही या आदेशात म्हटलं आहे.
****
वंदे भारत अभियानांतर्गत जगातल्या विविध देशात अडकलेले ३४२ प्रवासी औरंगाबादेत आतापर्यंत परतले आहेत. यापैकी २० प्रवाशांना कोरोना विषाणू आजाराची लक्षणे असल्याचं तपासणीअंती समोर आलं आहे. त्या सर्वांना पुढील उपचार देण्यात आले आहेत. कंपनीच्या कामानिमित्त सिंगापूरला गेलेल्या रघुनाथनंदन काबरा यांनी औरंगाबाद पर्यंतच्या प्रवासापर्यंत प्रशासनातल्या सर्वांचं उत्तम सहकार्य लाभल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
AIR India चे flights होते. आणि Bombay through आम्हाला separate cabs दिल्या होत्या. आणि औरंगाबादपर्यंत येईपर्यंत त्यांचा constant track होता आमच्यावर. कुठे आहेत? कुठपर्यंत पोहोचले? त्यानंतर आम्हाला त्या हॉटेलमधे १५ दिवस quarantine व्हायला लागलं. तिथं पण त्यांनी आमचे check-ups वगैरे केले. आणि जेव्हापर्यंत आमचे results नाही येत तेव्हापर्यंत आम्हाला सोडलं नव्हतं. 15 days आमचा quarantine होता. Test केल्यानंतर जेव्हा negative आला त्यानंतर त्यांनी आम्हाला घरी जायची permission दिली.
****
परभणी जिल्ह्यातल्या पालम नगरपंचायत क्षेत्र आणि तीन किलोमीटरच्या परिसरात कालपासून २६ जुलै पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गंगाखेड शहर आणि परिसरात संचारबंदी लागू असल्यानं गंगाखेड जवळचे नागरिक मोठ्या प्रमाणात पालम इथं खरेदीसाठी येऊन गर्दी करत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पालम इथंही संचारबंदीची घोषणा केली.
***
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल औरंगाबाद - पुणे महामार्गावर कायगाव टोका इथं ‘बलिदान ते आत्मबलिदान’ आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलेली आश्वासनं राज्य सरकारनं पाळली नाही, त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी सांगितलं. संबंधित कुटुंबियांशी ३० जुलै रोजी मंत्रालयात चर्चा करुन प्रश्न मार्गी लावणार असल्याचं राज्य शासनाचं पत्र आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरासह ग्रामीण भागात अशिक्षित नागरिकांना पैशाचं अमिष दाखवून सक्तीनं धर्मांतर करणाऱ्या दोन महिलांसह तीन जणांविरुद्ध जिंतूर पोलिय ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीनं धर्म प्रसार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.
****
वाशिम जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्र, माजी सैनिक संघटना, राष्ट्रीय सेवा योजना आणि राजरत्न अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेच्या मदतीनं “कोविड - पासून दादा - दादी, नाना - नानी सुरक्षीत अभियान” राबवण्यात येत आहे. या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
जिल्ह्यातील एक लाख २५ हजार ज्येष्ठ नागरिकांच्या तब्येतिविषयी फोनवरून चौकशी करण्यात येऊन त्यांना कोरोनाच्या काळात विविध आजारांवरील औषधी, स्वस्त धान्य दुकानावरील शिधा, निराधार योजनेची मदत मिळते का याची चौकशी करून त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे यासोबत ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाच्या काळात स्वतःची काळजी कशी घ्यावी अथवा नातेवाईकांनी ज्येष्ठ नागरिकांची कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
    आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहून सुनील कांबळे
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या सुमारे २० कोटी रुपयांच्या रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी काल ही माहिती दिली. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण भागातले शहराला जोडणारे रस्ते महत्वाचे असून त्या दृष्टीकोनातून आमदार गुट्टे यांनी पुढाकार घेतला आहे.
****
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र शासनानं त्वरित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भातला भारतरत्न पुरस्कारसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होईल, असं खासदार श्रृंगारे यांनी म्हटलं आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...