Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 July 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३
जुलै
२०२० सकाळी ७.१० मि.
****
·
राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू केली जाणार नाही, व्यायाम शाळा, शॉपिंग मॉल सुरू
करण्याबाबत विचार सुरू- आरोग्यमंत्री राजेश टोपे.
·
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर स्थानिक प्राधिकरणातील सरकारी अधिकारी किंवा
कर्मचाऱ्यांना नेमण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश.
·
डॉक्टर भागवत कराड, राजीव सातव, यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाची शपथ.
·
राज्यात दहा हजार ५७६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण, २८० जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू.
·
औरंगाबादमध्ये सात, बीड आणि नांदेडमध्ये प्रत्येकी चार तर जालना, परभणी, हिंगोली,
लातूर, आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू.
आणि
·
मका खरेदीसाठी येत्या ३१ तारखेपर्यंत मुदतवाढ.
****
राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू केली जाणार नाही तसंच, सध्या बंद असलेले व्यायाम
शाळा, खरेदी बाजार-शॉपिंग मॉल यासह अन्य व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्याबाबत विचार
केला जात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
मात्र मुंबईतली उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे घेतील, असं टोपे म्हणाले. विलगीकरण केंद्रांसंदर्भात मार्गदर्शक सूचना लवकरच
जारी करण्यात येणार आहेत, यामध्ये महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र कक्ष किंवा वॉर्ड
असणार आहेत, त्याचबरोबर राज्यात चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलं असून ते आणखी वाढवलं
जाईल, असं टोपे म्हणाले.
****
राज्यातल्या १९ जिल्ह्यातल्या मुदत संपलेल्या एक हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक
म्हणून स्थानिक प्राधिकरणातील सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना नेमा असा अंतरिम
आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य शासनाला दिला. जर सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी
उपलब्ध नसतील तरच खासगी व्यक्तीच्या नेमणुकीचा विचार करा, तत्पूर्वी याबाबतची सविस्तर
कारणे नोंदवावीत आणि त्यानंतरच खासगी व्यक्तीच्या नेमणुकीचे आदेश काढावेत असं न्यायालयानं
स्पष्ट केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची अनिश्चितता लक्षात
घेता, शासनानं ग्राम पंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने खासगी व्यक्तींची नेमणूक
करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सरकारने दिला होता,
यासंदर्भात उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांची सुनावणी करताना
न्यायालयाने हे अंतरिम आदेश दिले आहेत.
****
राज्यसभेच्या नवनिर्वाचित ६२ खासदारांनी काल राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी या सदस्यांना शपथ दिली. शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये
महाराष्ट्रातील सदस्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार,
काँग्रेसचे राजीव सातव, भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर भागवत कराड, उदयनराजे भोसले, शिवसेनेच्या
प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. परभणीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोना विषाणूची
बाधा झाल्यामुळे त्या काल शपथ घेऊ शकल्या नाहीत.
****
राज्यात काल दिवसभरात दहा हजार ५७६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
आतापर्यंत एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा उच्चांक आहे. त्यामुळे राज्यातली एकूण बाधितांची
संख्या तीन लाख ३७ हजार ६०७ इतकी झाली आहे. काल २८० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. राज्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजार ५५६
झाली आहे. तर काल पाच हजार ५५२ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
राज्यात आतापर्यंत एक लाख ८७ हजात ७६९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या
एक लाख ३७ हजार २८२ रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यभरात आतापर्यंत १६ लाख ८७ हजार २१३
लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये
बालाजी नगरमधल्या ७२ वर्षीय, जुना बाजार इथल्या ६४ वर्षीय, रामनगर मधल्या ४२ वर्षीय,
शिवनेरी कॉलनीतल्या ६५ वर्षीय, कन्नड इथल्या ७८ वर्षीय पुरुष रुग्णांसह, उमाजी कॉलनीतल्या
६५ वर्षीय आणि पडेगाव इथल्या ५५ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात या विषाणू
संसर्गानं मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४१४ झाली आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं १२ हजाराचा
टप्पा पार केला आहे. काल आणखी ३५९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या १२ हजार २५ झाली आहे. औरंगाबाद शहरात काल प्रवेश करणाऱ्या तपासणी
नाक्यांसह विविध ठिकाणी केलेल्या एकूण पाच हजार ४६४ अँटिजेन चाचणीतून १५३ जण बाधित
आढळले. तर काल १९३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात
आतापर्यंत सहा हजार ६९० रुग्ण बरे झाले असून, सध्या चार हजार ९२१ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये
गेवराईत दोन तर बीड आणि अंबाजोगाई इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी २७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये बीड
आणि अंबाजोगाई इथले प्रत्येकी सात, परळी सहा, आष्टी चार, गेवराई दोन तर धारूर तालुक्यातला
एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या ४४८ झाली आहे. त्यापैकी
१९३ जण बरे झाले असून, सध्या २३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत
****
नांदेड जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
यात नांदेड शहरातल्या हडको इथल्या ६२ वर्षीय, मुखेड तालुक्यातल्या आंबुलगा इथल्या ८०
वर्षीय पुरुष रुग्णासह, लोहा इथल्या ८० वर्षीय आणि माळाकोळी इथल्या ६३ वर्षीय महिलेचा
समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल ५६ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये मुखेड
तालुक्यातले १४, नांदेड शहरातले १३, देगलूर तालुक्यातले दहा, नायगाव सात, कंधार पाच,
तर अर्धापूर, भोकर, हिमायतनगर, लोहा, हिंगोली जिल्ह्यातल्या शेलगाव, वसमत, यवतमाळ जिल्ह्यातल्या
मोतीनगर पुसद इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या
एक हजार ७४ झाली आहे. तर काल १९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. नांदेड
जिल्ह्यात आतापर्यंत ५७४ रुग्ण बरे झाले असून, सध्या ४४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये
संभाजीनगर भागातल्या ६९ वर्षीय आणि विनकार कॉलनीतल्या ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या ५६ झाली आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात काल आणखी ३२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
यामध्ये जालना शहरातल्या वेगवेगळ्या भागातल्या १२, ग्रामीण भागतल्या १९ तर बुलडाणा
जिल्ह्यातल्या पळसखेडा इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण
रुग्णांची संख्या एक हजार ५८० झाली आहे. तर काल उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या
२८ रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातले ९४० रुग्ण बरे झाले असून, सध्या
५१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये
परभणी शहरातल्या इकबाल नगरातल्या ७५ वर्षीय तसंच पूर्णा शहरातल्या ६१ वर्षीय पुरुषाचा
समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सोळा रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात काल आणखी १४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये
मानवत शहरातले सात, परभणी शहरातले सहा, तर परभणी तालुक्यातल्या दैठणा इथला एक रुग्ण
आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ४४५ झाली आहे. तर काल सहा रुग्ण बरे झाल्यानं
त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत २१० रुग्ण बरे झाले असून, सध्या २८१
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
इतर जिल्ह्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागातून परभणी जिल्ह्यामध्ये येण्यासाठी दैनंदिन
किंवा इतर स्वरूपातल्या प्रवाशांचे कोणतेही इ-परवाने, इतर परवानगी ३१ जुलैपर्यंत देऊ
नयेत असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. केवळ वैद्यकीय कारणास्तव
तातडीची खात्री झाल्यास परवानगी द्यावी, मालवाहतूक आणि अत्यावश्यक सेवांना सूट राहील,
असं त्यांनी सांगितलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. हिंगोली
शहरातल्या आझम कॉलनी इथल्या ३५ वर्षीय आणि मंगळवारा इथल्या ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा
यात समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात काल आणखी १२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये
हिंगोली शहरातले आणि वसमत इथले प्रत्येकी सहा रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण
बाधितांची संख्या ४५२ झाली आहे. तर काल चार रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात
आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ३२७ रुग्ण बरे झाले असून, सध्या १२० रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
लातूर जिल्ह्यातही काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये
देवणी तालुक्यातल्या संगम इथल्या ६६ वर्षीय आणि अहमदपूर तालुक्यातल्या शिरुर ताजबंद
इथल्या ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत
६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात काल आणखी ६० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
यामध्ये लातूर शहरातले २०, उदगीर सात, चाकूर दोन तर निलंगा इथला एक रुग्ण आहे. त्यामुळे
लातूर जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या एक हजार ३१५ झाली आहे. त्यापैकी ७०१ रुग्ण बरे
झाले असून, सध्या ५३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये
उमरगा तालुक्यातल्या डाळींब इथल्या ६० वर्षीय आणि केसर जवळगा इथल्या ४८ वर्षीय पुरुषाचा
समावेश आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ५८३ झाली आहे. त्यापैकी ३५५ रुग्ण बरे झाले असून,
सध्या १९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, उमरगा शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शनिवार २५ जुलैपासून एक
ऑगस्टपर्यंत जनता संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. या काळात उमरगा शहरात तालुक्यातल्या
किंवा बाहेरगावच्या कोणत्याही व्यक्तीस येण्यास परवानगी असणार नाही.
****
मुंबईत काल आणखी एक हजार ३१० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ५८ जणांचा
मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात काल तीन हजार २१८ नवे रुग्ण आणि ६२ मृत्यूंची नोंद झाली.
नाशिक जिल्ह्यात काल २६९ रुग्ण आढळले, तर आठ जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात ४३९,
जळगाव ४१८, अहमदनगर ४२८, नवी मुंबईत ३०३, पालघर २१५, सातारा १२१, सांगली १०६, यवतमाळ
५४ तर वाशिम जिल्ह्यात काल आणखी १२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर शहरात उद्यापासून ३१ जुलैपर्यंत शंभर टक्के टाळेबंदी
लागू करण्यात येणार आहे. या दरम्यान फक्त रुग्णालयालगतची औषधी दुकानं आणि काही अटींवर
दूध विक्री सुरू राहणार आहे
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवाशियांसी
संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी श्रोत्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून
आणण्यासाठी प्रेरणादायी सामूहिक प्रयत्नांचे अनुभव पाठवावेत असं आवाहन पंतप्रधानांनी
केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाचा हा ६७ वा भाग असेल.
****
काही लोक कारोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाल्याचं बनावट प्रमाणपत्र तयार
करून आर्थिक लालसेपोटी प्लाझ्मा दान करण्याचा प्रयत्न करून कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या
नातेवाईकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत, यापासून जनतेनं सावध राहावं
अस आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.
बाधित रुग्णांच्या उपचारामध्ये हा प्लाझ्मा उपचार पद्धती उपयुक्त ठरत आहे, यामध्ये
रुग्णाची प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. यासाठी काही रुग्णालयांनी
प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा डोनेशन मोहीमही सुरू केली आहे. सायबर गुन्हेगार यासाठी समाजमाध्यमांवर
विविध पातळीवर काम करत आहेत. त्यामुळे संबंधित लोकांनी या प्लाझ्मा थेरपीबाबत अधिक
सजग राहण्याची आवश्यकता असून, प्लाझ्मा दाता ऑनलाईन शोधतानाही काळजी घेण्याची आवश्यकता
असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या मृत्यू प्रकरणाची
चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्या
अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले
आहेत. जिल्हा रुग्णालयातल्या कोविड संक्रमीत कक्षात ३५ वर्षीय पुरूषाचा प्राणवायूअभावी
मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी या तरुणानं आपल्याला प्राणवायू मिळत नसल्याचं सामाजिक माध्यमावर
सांगितलं होतं. त्यानंतर रुग्णालय आणि जिल्ह्याच्या यंत्रणेवर झालेल्या टीकेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी
या तरुणानं केलेल्या आरोपाचं खंडन केलं. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे
यांच्या अहवालाच्या आधारे त्या रुग्णाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं स्पष्ट
झाल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले.
****
औरंगाबाद शहरातल्या ओरीयन दवाखान्यातल्या कोविड केंद्राची महापालिका आयुक्त
आस्तिक कुमार पाण्डेय यांनी काल पाहणी केली. इथल्या डॉक्टर, कर्मचारी तसंच उपचार घेणाऱ्या
रूग्णांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. तसंच उपलब्ध खाटा आणि दाखल करण्यात आलेल्या
रूग्णांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी
गावनिहाय सर्वेक्षण, तपासण्या वाढवण्यात येणार असून, जनतेने तपासणीसाठी पुढे येऊन सहकार्य
करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केलं आहे. गावपातळीवर कोरोना विषाणू
सर्वेक्षण करण्यासाठी ज्यांना जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत, त्यांनी काटेकोरपणे
आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
****
राज्यातल्या मका खरेदीसाठी केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा खात्यानं येत्या
३१ तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
केंद्रानं राज्य सरकारला अतिरिक्त २५ हजार टनापर्यंत मका खरेदी करण्याची परवानगी दिल्यानं
शेतकऱ्यांना फायदा होईल, असं मत भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष
अनिल बोंडे यांनी व्यक्त केलं. मका खरेदीसाठी यापूर्वी १५ जुलैपर्यंत मिळालेल्या मुदतवाढीनंतरही
शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असल्यामुळे केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली आहे. मका उत्पादकांना
दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत मका खरेदीसाठी १२५
कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
****
उस्मानाबाद इथं कालपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रात
कोविड-19 विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या
या प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रात कोविड विषाणू तपासणी सोबतच स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू
आणि इतरही विषाणूजन्य आजारांची तपासणी आणि संशोधनास मदत होणार आहे. याविषयी अधिक माहिती
देत आहेत आमचे वार्ताहर –
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पनेतून
आणि पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी एक कोटी २० लाख रूपये
खर्च आला असून, हा सर्व निधी उस्मानाबादकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं
उभारला आहे. लोकसहभागातून कोविड-19 सारख्या असाध्य आजारावर संशोधन आणि तपासणीसाठी प्रयोगशाळा
उभी करून उस्मानाबाद आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या संशोधकीय वृत्तीस उस्मानाबादकरांनी
सामाजिक बांधिलकीतून लावलेला हा हातभार हा उस्मानाबादचे मागासलेपण दूर करून गुणवत्ता
वाढवण्यासाठी निश्चितच महत्वपूर्ण ठरणार आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी “कौटुंबिक आर्थिक
व्यवस्थापनाचा” आराखडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रातल्या
व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्रातल्या व्यवस्थापन संकुलाचे डॉ. हनुमंत पाटील यांनी तयार
केला आहे. हा आराखडा कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असून पेटेंटसाठी
मुंबई इथल्या भारतीय पेटेंट कार्यालयात सादर करण्यात आला असल्याचं विद्यापीठाच्या जनसंपर्क
विभागानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथल्या शासकीय रुग्णालयातून काल कोरोना विषाणू बाधित
रुग्णालाच घरी सोडल्याप्रकरणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
सदर महिला रुग्णाचा अहवाल बाधित आढळल्यानंतर तीनच दिवसांत तिला घरी पाठवण्यात आलं.
त्याच कक्षात आडनावात साम्य असणारी गंगाखेड इथली एक महिला उपचार घेत होती. आणि त्या
महिलेचा अहवाल नकारात्मक आला. त्या महिलेस घरी सोडण्याऐवजी पूर्णा इथल्या या महिलेस
घरी सोडलं असावं, अशी माहिती मिळाली आहे.
****
जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्रता यादीत
नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण विनाविलंब पूर्ण करून घ्यावं, असं आवाहन
जालन्याचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या १६ हजार
९८७ शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अद्याप अपूर्ण आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या
एक लाख २४ हजार ६२७ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची ८५३ कोटी ४८ लाख रुपयांची लाभ
रक्कम जमा झाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळालेल्या
शेतकऱ्यांनीही आधार प्रमाणिकरण करण्याचं आवाहन जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधकांनी केलं
आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार २१७ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
****
बीड जिल्ह्यातले प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात किरकोळ मद्य विक्री,
वाईन शॉप, परमिट रुम, बिअर शॉपी, आणि देशी दारु किरकोळ विक्री दुकानांना सकाळी नऊ वाजेपासून
सायंकाळी सात वाजेपर्यंत सीलबंद बाटलीतून मद्याची विक्री करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी
परवानगी दिली आहे. मद्याची विक्री करतांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या
सर्व नियमांचं पालन करण्याची जबाबदारी संबंधित परवाना धारकाची राहील, असं यासंदर्भातल्या
आदेशात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड इथल्या विवाह सोहळ्यानिमित्त बेकायदेशीररित्या स्वागत
समारंभ आयोजित करत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरल्या बद्दल महसूल विभागाने
गंगाखेड इथले प्रतिष्ठित व्यापारी राधेश्याम भंडारी यांच्याकडून दोन लाख ५० हजार रुपयांचा
दंड वसूल केला.
****
जालना पोलिसांनी काल गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या चार जणांना अटक केली. परमेश्वर
अंभोरे, गणेश काकडे, कृष्णा सलामपुरे आणि रामदास मिसाळ अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे
गावठी पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे, एक कार असा एकूण सात लाख दहा हजारांचा मुद्देमाल
सापडला. त्यांच्याविरुध्द चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
लातूर जिल्ह्यात टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी अडचण येऊ
नये म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक थेट शेतकऱ्यांच्या गावात जाऊन पिक विमा भरुन
घेत आहे. आतापर्यंत एक लाख ६६ हजार ४०६ खातेदारांनी १४ कोटी ३९ लाख ३३ हजार रुपयांचा
विमा हप्ता भरला आहे. प्रत्येक गावातल्या सोसायटीचे अध्यक्ष आणि गटसचिव यांच्यामार्फत
विमा हप्ता स्विकारला जात आहे.
****
लातूर इथल्या केंद्र आणि राज्य शासनाकडून समर्पित कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता
प्राप्त असलेल्या विवेकानंद रुग्णालयात आता कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरू
करण्यात आले आहेत. रुग्णांवर उपचार आणि त्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र
कृती दलाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती विवेकानंद रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या
अध्यक्षा डॉ अरुणा देवधर यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment