Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 22 July 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२
जुलै
२०२० सकाळी ७.१० मि.
****
·
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची लवकरच एक नवीन योजना; राज्यात ठिकठिकाणी
दूध आंदोलन.
·
इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन.
·
झडप असणारे एन 95 मास्क कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नसल्याचं केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं स्पष्टीकरण.
·
कोरोना विषाणूचं संक्रमण रोखण्यासाठी मराठवाड्यातल्या सर्व नगरपालिकांनी शहरांमध्ये
निर्जंतूक औषधीची फवारणी करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश.
·
राज्यात आणखी आठ हजार ३६९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, उपचारादरम्यान
२४६ रुग्णांचा मृत्यू.
·
औरंगाबादमध्ये नऊ, बीड, नांदेड आणि हिंगोलीत प्रत्येकी दोन तर लातूर आणि परभणीमध्ये
प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू.
·
महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि परभणीच्या खासदार फौजिया
खान कोरोना विषाणू बाधित.
आणि
·
ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचं
ग्रामविकास मंत्र्यांचं स्पष्टीकरण.
****
दूध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक नवीन
योजना राबवणार असल्याचं पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी
काल सांगितलं. राज्यातल्या विविध सरकारी आणि खाजगी दूध संघांचे पदाधिकारी आणि दूध उत्पादक
शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोरोना विषाणूच्या
पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांकरता नवीन योजना तयार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा
करून मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल,
असं केदार यांनी सांगितलं. या बैठकीस राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी विधानसभा अध्यक्ष
हरीभाऊ बागडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार राजू शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे
प्रधान सचिव अनुप कुमार, वरिष्ठ अधिकारी, शेतकरी संघटनेचे प्रमुख, तसंच राज्यभरातले
विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
उपस्थित होते. दूधदराच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारनं
तातडीनं दिलासादायक निर्णय घ्यायला हवा, दूध उत्पादकांच्या खात्यात थेट अनुदानाची रक्कम
जमा करण्यासोबतच दूध भुकटीच्या आयातीवर तातडीने अनुदान जाहीर करण्याची मागणी शेतकरी
संघटनांसह विरोधकांनी यावेळी लावून धरली.
दरम्यान, बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना केदार यांनी, दूध दराच्या मागणीबाबत
भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला कोणतंही निवेदन मिळालेलं नाही, असं सांगितलं. रस्त्यावर
दूध ओतून देणं योग्य नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.
****
दरम्यान, कोविड-19 च्या संसर्गामुळे नुकसान सहन करावं लागत असलेल्या दूध उत्पादकांनी
राज्यात काल ठिकठिकाणी दूध आंदोलन केलं. औरंगाबाद, जालना, बीडसह सांगली, सोलापूर, कोल्हापूर,
नाशिक, अहमदनगर आणि अन्य इतर जिल्ह्यात काल हे आंदोलन झालं.
लातूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं दूध आंदोलनाचा भाग म्हणून
तांदुळजा इथल्या ग्रामदैवतेला दुधाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष
अरुण कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल उपस्थित होते.
परभणी जिल्ह्यातल्या सर्व शासकीय आणि खासगी दूध डेअरी चालकांनी आणि शेतकऱ्यांनी
कडकडीत बंद पाळून आंदोलनात सहभाग घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे
जिल्ह्यात काल एकही लिटर दुधाचं संकलन झालं नाही.
****
मराठा समाजाच्या आरक्षणामुळे इतर मागासवर्गीय - ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही
धक्का बसणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. ओबीसी आणि
भटके विमुक्त समाजाच्या मागण्यांसंदर्भात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या
बैठकीत ते काल बोलत होते. मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत शंका-कुशंका
आणि भीती दूर करण्यासाठी महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी
सांगितलं. ओबीसी समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, ओबीसी महामंडळांसाठी
आर्थिक तरतूद करुन जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येईल,
असं मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.
****
झडप असणारे N95 मास्क कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही, असं केंद्रीय आरोग्य
मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ.राजीव गर्ग यांनी सर्व राज्यांच्या
आरोग्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. झडप असणारे N95 मास्क कोरोना विषाणूचा
प्रसार रोखू शकत नाही, असा प्रयत्न करण्यामध्ये हे मास्क अडथळा निर्माण करत असल्याचं
गर्ग यांनी म्हटलं आहे. राज्यांनी तोंड आणि नाक पूर्णपणे झाकण्याच्या नियमांचं पालन
करावं, आणि श्वसनासाठी झडप असणारे एन ९५ मास्क वापरण्यावर आपापल्या राज्यात बंदी घालावी,
असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
****
कोरोना विषाणूचं संक्रमण रोखण्यासाठी मराठवाड्यातील सर्व नगरपालिकांनी आपापल्या
शहरांमध्ये निर्जंतुक औषधीची फवारणी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठानं दिले आहेत. एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान खंडपीठानं हे आदेश दिले.
खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात हे आदेश लागू आहेत. तसेच जळगाव शहरातील कोविड रुग्णालय
आणि विलगीकरण केंद्रांमध्ये रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रसिध्द बातम्यांची
दखल घेत न्यायालयानं स्वतः याचिका दाखल करून घेतली आहे. तसेच या संदर्भात जळगावचे जिल्हाधिकारी,
पोलीस अधीक्षक, अंमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावण्यात
आली आहे.
****
राज्यात काल आणखी आठ हजार ३६९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे
राज्यातली एकूण रुग्णसंख्या तीन लाख २७ हजार ३१ इतकी झाली आहे. काल २४६ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजार २७६ झाली
आहे. तर काल सात हजार १८८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
राज्यात आतापर्यंत एक लाख ८२ हजार २१७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या
एक लाख ३२ हजार २३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये
न्याय नगरात इथली ५१ वर्षीय, चेतना नगरातली ७० वर्षीय, कन्नड तालुक्यातल्या देवगाव
रंगारी इथली ६५ वर्षीय स्त्री रुग्णांसह पडेगावातला ८३ वर्षीय, श्रेय नगर इथला ४८ वर्षीय,
सादात नगरमधल्या ४५ वर्षीय, आणि जैन नगरमधल्या ६२ वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
त्याचबरोबर परभणी आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा काल औरंगाबाद इथं
उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४०७ जणांचा मृत्यू
झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ४२५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ३३७ तर ग्रामीण भागातले ८८ रुग्ण आहेत. औरंगाबाद
शहरात काल अँटिजेन आणि आरटीपीसीआर द्वारे सहा हजार ९५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी
१९० जण बाधित आढळून आले. यामध्ये १०७ व्यापाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबाद
जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या ११ हजार ६६६ झाली आहे. तर काल १९७ रुग्णांना बरे
झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत सहा हजार ४९७ रुग्ण कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, सध्या चार हजार ७६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्हा रुग्णालयात काल दोन कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. यात रुग्णालयात
कार्यरत परिचारिकेचा समावेश असून गेल्या दहा दिवसांपासून त्या कोरोना विषाणू बाधित
रुग्णांवर उपचार करत होत्या. काल त्यांच्यात लक्षणं आढळून आल्यामुळं त्यांच्या लाळेचे
नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, मात्र तपासणी अहवाल येण्यापूर्वीच या परिचारिकेचा
मृत्यू झाला.
दरम्यान, बीड जिल्ह्यात काल आणखी ४४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
यामध्ये बीड तालुक्यातले २३, गेवराई आठ, परळी पाच, केज तीन, शिरुर दोन, तर अंबाजोगाई,
पाटोदा आणि माजलगाव इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या
३९८ झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. शहरातल्या
आंबेडकर नगर इथल्या २७ वर्षीय तरुणासह रहेमत नगरमधल्या ६९ वर्षीय पुरुषाचा यात समावेश
आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या ५१ झाली आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात काल आणखी ३२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली. यामध्ये नांदेड शहरातले ११, देगलूर १४, मुखेड तीन, तर बिलोली, नायगाव, हिंगोली
जिल्ह्यातल्या वसमत आणि परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे
नांदेड जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या एक हजार १८ झाली आहे. तर काल ४० रुग्ण बरे
झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ५५५ रुग्ण बरे झाले
असून, सध्या ४११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये
सेनगाव इथल्या ५८ वर्षीय आणि हिंगोली इथल्या ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
यामध्ये हिंगोली आणि वसमत इथले प्रत्येकी तीन तर सेनगाव इथला एक रुग्ण आहे. जिल्ह्यातली
एकूण बाधितांची संख्या ४४० झाली आहे. तर काल चार रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात
आलं. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ३२३ रुग्ण बरे झाले असून, सध्या ११४ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं काल ८० वर्षीय महिलेचा कोरोना विषाणू संसर्गानं
मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात काल आणखी ६८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये
लातूर शहरातले ३३, निलंगा तालुक्यातले १२, उदगीर तालुक्यातले दहा, औसा पाच, तर चाकूर
आणि देवणी तालुक्यातले प्रत्येकी तीन रुग्ण आहेत. काल आढळलेल्या ६८ रुग्णांपैकी २५
रुग्णांचे अहवाल हे १७ जुलै प्रलंबित होते, ते काल प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या एक हजार २२७ झाली आहे. त्यापैकी ६७० रुग्ण बरे झाले असून, सध्या ४९१
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू
झाला. मृत्यूपूर्वी या रुग्णानं आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याचं सामाजिक संपर्क
माध्यमावरुन सांगितलं होतं. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू
झाला आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात काल आणखी ४३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे
जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ४४८ झाली आहे. तर काल २० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना
घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत २०४ रुग्ण बरे झाले असून, सध्या २१३ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
जालना शहरात काल आणखी ४८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये ४७ रुग्ण
जालना शहरातल्या वेगवेगळ्या भागातले तर एक रुग्ण भोकरदन तालुक्यातल्या बोरखेडी इथला
आहे. जिल्ह्यातल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या आता एक हजार ५४९ झाली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी २० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे
जिल्ह्यातली रुग्णसंख्या ५७३ झाली आहे. त्यापैकी ३३८ जण या आजारातून बरे झाले असून
२८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि परभणीच्या राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान यांचे कोरोना विषाणू तपासणी अहवाल बाधित आले
आहेत. सत्तार यांनी ट्विटरच्या माध्यमातून काल ही माहिती दिली. आपण गृह विलगीकरणात
असून, आपल्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करुन घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. खासदार
फौजिया खान यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोना विषाणू तपासणी करून घ्यावी,
असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
मुंबईत काल आणखी ९९५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ६२ जणांचा मृत्यू
झाला. पुण्यात काल दोन हजार ४०३ नवे रुग्ण, तर ५५ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात
काल ४१२ रुग्ण आढळले, तर १२ जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात एक हजार ३२३, पालघर
३०९, रायगड २९९, अहमदनगर १६५, सोलापूर १५३, सातारा ८६, सांगली ३४, धुळे ३७, तर यवतमाळ
जिल्ह्यात काल आणखी १४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
त्र्याहत्तरावी घटनादुरूस्ती, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, निवडणुका
घेता येत नाहीत अशी कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती या सर्व बाबींचा विचार
करूनच या महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातल्या योग्य व्यक्तिची
प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला करावा लागला असल्याचं ग्रामविकास मंत्री
हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी, राज्यातल्या
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर केल्या जाणाऱ्या प्रशासकाच्या नियुक्तीबाबत हसन मुश्रीफ
यांना पत्र लिहीलं होतं, त्याच्या उत्तरादाखल मुश्रीफ यांनी ही बाब स्पष्ट केली. ग्रामपंचायतींवर
प्रशासक नियुक्तीच्या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नसून लोकशाही मार्गाने, पालकमंत्र्यांच्या
सल्ल्याने योग्य कार्यक्षम व्यक्तीची नियुक्ती व्हावी हीच अपेक्षा असल्याचं त्यांनी
नमूद केलं. सन १९९२ साली झालेल्या ७३ व्या घटनादुरूस्तीनुसार ग्रामपंचायतीचा कालावधी
पाच वर्षे निश्चित करण्यात आला आहे. सन २००५ साली कार्यकाळ संपलेल्या १३ जिल्ह्यातल्या
ग्रामपंचायतींना मुदतवाढ दिली होती, मात्र राज्य निवडणूक आयोगानं हा निर्णय रद्द केला
होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय मान्य केला होता, असं मुश्रीफ यांनी
नमूद केलं.
****
एक ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या ईद-उल अजहा-बकरी ईद निमित्त काल औरंगाबादचे
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात मुस्लिम धर्मगुरु आणि खासदार
इम्तियाज जलील यांच्यासोबत बैठक घेतली. राज्य शासनानं बकरी ईदसंदर्भात जारी केलेल्या
मार्गदर्शक सूचनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. बकरी ईदच्या दिवशी शहरातल्या मशिदींमध्ये
नमाज पठण करु द्यावे, शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित अंतराच्या नियमाचं पालन
करत ईदसाठी जनावरांचे बाजार भरवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही खासदार जलील यांनी
यावेळी केली. पैठण पोलीस ठाण्यातही बकरी ईद निमित्त काल पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख
यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक झाली. नगराध्यक्ष सूरज लोळगे, यांच्यासह अनेक
मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरमध्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं
आजपासून २६ जुलैपर्यंत पाच दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. नगराध्यक्ष सचिन रोचकरी
यांनी नागरिकांनी प्रशासनाला आणि नगरपालिकेला या संचारबंदी दरम्यान सहकार्य करण्याचं
आवाहन केलं आहे. ते म्हणाले –
तुळजापूर शहराच्या सर्व लोकांना विनंती आहे की, या जनता कफ्यूमधे
कोणीही घराबाहेर पडू नये. दवाखाने, मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. तरी
जनता कर्फ्यूला सर्वांनी सहकार्य करावं. या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमधे आनंददादा कंदे
मित्रपरिवाराच्या वतीने दवाखान्यामधे जाण्यासाठी जर आवश्यकता असेल तर त्यांच्यासाठी
रिक्षाची व्यवस्था केली आहे.
****
मराठवाड्यात काल अनेक भागात काल पाऊस झाला.
जालना शहरासह जिल्ह्यात अंबड तसंच बदनापूर तालुक्यातल्या बहुतांश भागात चांगला
पाऊस झाला.
बीड जिल्ह्यात सहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्याने पावसाची पन्नास
टक्के सरासरी ओलांडली आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं असून लघु-मध्यम आणि
मोठ्या प्रकल्पातल्या पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे.
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या वडी शिवारात सोमेश्वर नदीला पूर आल्यानं
अनेक गांवाचा काही काळासाठी संपर्क तुटला होता.
औरंगाबाद परिसरातही काल सकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यात
परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून शेतातल्या मका,
कपाशी, उडीद, मूग या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
हिंगोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पाणी आलं असून काल हिमायतनगर
भागातल्या हरडप पुलाजवळ एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. गुरख्यांनी ही घटना
तहसील कार्यालयाला कळवली असून प्रशासन याबाबतची माहिती घेत आहे.
****
औरंगाबाद शहर सायबर पोलिसांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेल्या तीन जणांचे एक
लाख ३९ हजार ९८० रुपये परत मिळवून दिले आहेत. दूरध्वनी करुन आणि ऑनलाईन लिंकद्वारे
फसवणूक झाल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस आयुक्त कार्यालयाच्या
सायबर शाखेशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
प्रसिद्ध शायर शम्स जालनवी यांचं काल जालना इथं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते.
फाळणीपूर्वी लाहोर इथल्या महाविद्यालयातून शायरीची पदवी संपादन केलेले जालनवी यांनी
देशभरात अनेक मुशायरे तसंच साहित्य संमेलनांमधून आपल्या गजल सादर करून रसिकांची मनं
जिंकली होती. चरितार्थासाठी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे जालनवी यांना जालना
शहरातल्या विविध सामाजिक संस्थांसह नामवंत शायर आणि समीक्षकांनी त्यांना अनेक पुरस्कार
आणि पदव्यांनी सन्मानित केलं होतं. आपल्या रचनांमधून जीवनाचं वास्तव सादर करणाऱ्या
जालनवी यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातून दुःख व्यक्त होत आहे.
****
आकाशवाणी नांदेड केंद्राचे सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी भीमराव शेळके यांचं
काल दुपारी नांदेड इथं निधन झालं, ते ६३ वर्षांचे होते. नांदेड आकाशवाणी केंद्रावर
वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची आखणी करून त्यांनी मोठा श्रोतावर्ग निर्माण केला आहे.
****
परभणी महानगरपालिका हद्दीत आढळणाऱ्या कोरोना विषाणू बाधितच्या संपर्कातल्या
व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महानगरपालिका आणि महसूल प्रशासनानं काल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली
पथकं स्थापन केली आहेत. या पथकांमधून विविध विभागातंर्गत शासकीय कर्मचारी बाधित व्यक्तींच्या
संपर्कातले कुटुंबिय, अन्य नातेवाईक, मित्र किंवा शेजारी व्यक्तींचा तातडीने शोध घेणार
आहेत.
दरम्यान, परजिल्ह्यातून तसंच प्रतिबंधीत क्षेत्रातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून
जिल्हा शासकीय रुग्णालयात किंवा अन्य रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी,
असं आवाहन माहनगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
लातूर महानगरपालिकेचे आठ कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून मृत कोरोना विषाणू
बाधित रुग्ण आणि संशयितांवर त्या-त्या धर्माच्या चालीरीतीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचं
काम करत आहेत. महापालिकेच्यावतीनं आतापर्यंत ७५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले
आहेत.
दरम्यान, कोरोना विषाणू बाधित व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी खासगी संस्थेच्या
अखत्यारीत असलेली गॅस दाहिनी कार्यान्वित करण्यात आली असल्याचं महापौर विक्रांत गोजमगुंडे
यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या संचारबंदीचा पहिला टप्पा संपल्यानंतर जिल्हा
प्रशासनानं कालपासून चार दिवस संचारबंदीच्या काही अटी शिथिल केल्या आहेत. किराणा दुकानं
दुपारी बारा वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे, मात्र किराणा किंवा भाजीपाला,
फळे खरेदीला जाण्यासाठी मोटारसायकल, स्कुटरचा वापर करण्यावर बंदी आहे. नियम मोडणाऱ्या
अंदाजे शंभर पेक्षा अधिक वाहनधारकांची वाहनं पोलीसांनी काल जप्त केली.
****
पिक विमा भरण्यास कमी कालावधी असल्यानं परभणी जिल्ह्यातले सर्व महा ई सेवा केंद्र
आणि ग्राहक सेवा केंद्र रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
यांनी परवानगी दिली आहे. जिल्ह्यातला शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहू नये याकरता
ही परवानगी देण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment