Friday, 18 December 2020

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १८ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१८ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

शेतकऱ्यांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र फक्त आंदोलनातून काहीही तोडगा निघणार नाही, सरकारसोबत चर्चा करावी लागेल, असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटलं आहे. सुधारित कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात दाखल याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी सरन्यायाधीशांनी हे मत व्यक्त केलं. यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यावर विचार करत असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेश राज्य सरकारच्या शेतकरी कल्याण कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. रायसेन इथं आयोजित या कार्यक्रमाला पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक हजार सहाशे कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत.

****

संरक्षण मंत्रालयानं तिन्ही सैन्य दलांसाठी २८ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्रीच्या खरेदीला काल मान्यता दिली. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन एकमेकांसमोर उभे ठाकलेले असल्याच्या पार्श्वभूमीवर या खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्थानिक क्षेत्रातूनच ही खरेदी केली जाणार आहे. या संदर्भातील एकूण सात प्रस्ताव संरक्षण खरेदी परिषदेनं मंजूर केले आहेत. ही सर्व सामग्री ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेंतर्गत खरेदी केली जाणार आहे.

****

भारताच्या सी एम एस - एक, या दूरसंवाद उपग्रहाचं प्रक्षेपण काल दुपारी तीन वाजून ४१ मिनिटांनी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या, सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून यशस्वीपणे करण्यात आलं. पीएसएलव्ही यानाद्वारे केलं जाणारं हे ५२ वं प्रक्षेपण असून इस्रोची, ही ७७ वी, प्रक्षेपण मोहिम आहे. भारताबरोबरच अंदमान, निकोबार आणि दूरच्या बेटांवर संवाद साधण्यासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान ॲडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या दुसर्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या  पहिल्याडावात १० षटकात बिनबाद १३ धावा झाल्या होत्या.  तत्पूर्वी आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भारतीय संघ पहिल्या डावात २४४ धावांवर सर्वबाद झाला.

**//**

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...