Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
**
राज्यात शाळा सुरू करण्याबाबत घाई करणार नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
**
देशात कोरोना विषाणुचे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ५१ शतांश टक्के
**
कोरोना विषाणू संसर्गाचे औरंगाबादमध्ये सात तर जालन्यामध्ये २६ नवे रुग्ण
आणि
**
राज्य ॲथलेटिक्स संघटनेवर श्रीकांत जोशी तसंच पंकज भारसाखळे, फुलचंद सलामपुरे यांची निवड
****
राज्य
सरकार शाळा सुरू करण्याबाबत घाई करणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
दिली आहे. युरोपमध्ये शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्याचं
त्यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमांतून राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना सांगितलं.
जगभर टाळेबंदीमुळे विकास प्रक्रिया थंडावली असताना राज्यानं औद्योगिक क्षेत्रात ६५
हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले असून अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी
राज्यात गुंतवणुकीला पसंती दिली असल्याचं ते म्हणाले. जुलै महिन्यात करण्यात आलेल्या
सामंजस्य करारातली ७० टक्के कामं पूर्ण झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र
सरकारकडून राज्याची हक्काची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणं बाकी असताना राज्यानं
आत्मविश्वासानं एकेक पाऊल पुढे टाकत जनता आणि शेतकऱ्यांना मदत केल्याची माहिती त्यांनी
दिली. जनतेचे सेवक म्हणून काम करताना विकास प्रकल्पावरून वाद घालणं योग्य नसून राज्य
आणि राष्ट्र विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं एकत्र येऊन विकास कामांना गती दिली
पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गावरील लस आल्यानंतरही पुढचे
सहा महिने मास्क लावणं सुरू ठेवावं तसंच संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यात
रात्रीची संचारबंदी लावण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातले
सत्तर ते पंच्च्याहत्तर टक्के लोक मास्क घालत आहेत पण अजुनही जे नियमांचं पालन करत
नाहीत, त्यांनी मास्क लावून समाज आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केलं. येत्या महाराष्ट्र दिनी हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचं मुख्यमंत्री
ठाकरे यांनी सांगितलं.
****
देशात
काल २९ हजार रुग्ण कोरोना विषाणू संसर्ग मुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत एकूण ९५
लाख ८० हजार रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर ९५
पूर्णांक ५१ शतांश टक्के इतका झाला आहे. देशात गेल्या चोविस तासात २६ हजार ६२४ नवीन
रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातली एकूण रुग्ण संख्या १ कोटी ३१ हजारावर गेली आहे.
सध्या ३ लाख ५ हजार रुग्ण देशभरात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. काल देशात ३४१ रुग्णांच्या
मृत्यूची नोंद झाली असून या आजारामुळे देशात १ लाख ४५ हजार ४७७ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. देशाचा मृत्यू दर १ पूर्णांक ४५ शतांश टक्क्यांवर स्थिर आहे, अशी माहिती आरोग्य
मंत्रालयानं आज सकाळी दिली. आतापर्यंत १६ कोटींपेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्यात
आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.
****
नियंत्रक
संस्थानी सुरक्षितता आणि गुणवत्ता या निकषांवर कोरोना विषाणू संसर्गावरील लसीकरणाला मान्यता दिल्यानंतरच देशात ही लस उपलब्ध करून देण्यात
येईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आरोग्य मंत्रालयानं या लसीकरणाबाबत सातत्यानं
विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना हे स्पष्ट केलं आहे. देशात या लसीकरणाचं
वेळापत्रक ठरवण्यात आलं असून, एकच लस वापरण्यात येणार आहे. वेगवेगळ्या लसी एकाचवेळी
वापरल्या जाणार नाहीत; असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूर
जिल्ह्यातल्या निलंगा इथले आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद
शहरात कोरोना विषाणू संसर्गाचे सात नवे रुग्ण आज आढळले असून न्यायनगर इथल्या एका ६०
वर्षीय महिलेचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं
मृत्यू झालेल्यांची संख्या आता एक हजार १८४ झाली आहे. आज सहा रुग्णांना उपचार घेऊन
बरे झाल्यानं सुटी देण्यात आली. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४४ हजार ८५८
झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार १०९ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली
असून ५६५ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
****
जालना
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे २६ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातली एकूण रुग्ण
संख्या बारा हजार ९०४ झाली आहे. एक रुग्णाचा या संसर्गानं मृत्यू झाला असून मृत्यूमुखी
पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ३३८ झाली आहे.
****
केंद्र
सरकारनं चालू खरीप विपणन हंगामात केलेल्या भात खरेदीचा आतापर्यंत ४८ लाख २८ हजार शेतकऱ्यांना
लाभ झाला असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्रालयानं दिली आहे. या हंगामात सरकारनं महाराष्ट्रासह
१६ राज्यांमधुन हमी भावानुसार ७७ हजार ६०८ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. सरकारनं आतापर्यंत
खरेदी केलेल्या भातापैकी ४९ टक्क्यांहून अधिक म्हणजेच २०२ लाख टनाहून अधिक भात खरेदी
पंजाबमधून केली असल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
मालेगावमध्ये
२००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबईतल्या विशेष
न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह
अनुपस्थीत राहिल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. या नंतर या प्रकारणातल्या
सर्व आरोपींनी येत्या चार जानेवारीला न्यायालयात हजर राहावं असे निर्देश न्यायमुर्ती
पी. आर. सीत्रे यांनी दिले आहेत. आपण आजारी असल्यानं शुक्रवारी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात
दाखल झालो असल्यानं सुनावणीवेळी उपस्थीत राहू शकत नसल्याचं प्रज्ञासिंह यांनी न्यायालयाला
कळवलं होतं.
****
परभणी
जिल्ह्यात थंडीत वाढ होत असून शहरात आज सात अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली आहे.
तापमानात अचानक झालेल्या या बदलामुळे नागरिकांनी घरातच राहणं पसंत केलं. दरम्यान, रब्बी
पिकांसाठी हे तापमान पोषक असून पुढील काही दिवस तापमानात घट राहिल, अशी शक्यता वसंतराव
नाईक कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे.
****
परभणी
जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात एका घरातून काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जमा करून
ठेवलेले गहू, तांदूळ, दाळ आणि साखर हा स्वस्त धान्य दुकानातला १ लाख २० हजार रुपयांचा
मुद्देमाल काल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पूर्णा
शहरात स्वस्त धान्य मालाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याची माहिती विशेष पथकाला
मिळाली होती, त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
****
बुलडाणा
जिल्हयातले हुतात्मा वीर जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर आज दुपारी सिंदखेडराजा
तालुक्यातल्या पळसखेड चक्का या त्यांच्या मूळ गावी अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी
राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह जिल्ह्यातले सर्व
राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातले नागरिक उपस्थित होते.
****
औरंगाबाद
जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी यांची महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या
उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. पुणे इथं महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या २०२० ते २०२४
या वर्षासाठी झालेल्या निवडणूकीत सहसचिवपदी पंकज भारसाखळे यांची आणि प्राध्यापक फुलचंद सलामपुरे
यांची राज्य कार्यकारिणीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद
शहरातल्या सातारा इथल्या खंडोबा मंदिरात आजपासून खंडोबा उत्सवाला सुरूवात झाली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली असून
मंदिरात कोरोना विषाणुचे नियम पाळूनच भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात येत आहे.
****////****
No comments:
Post a Comment