Friday, 11 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.12.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

११ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

पुढील महिन्यात होणाऱ्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाची पूर्वतयारी म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालय दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आज दोन परिचर्चांचं आयोजन करणार आहे. परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री वी. मुरलीधरन यामध्ये संबोधन करणार आहेत. या चर्चांमधून जानेवारीतल्या मुख्य संमेलनातील अनिवार्य सत्रांसाठी विषयांची आखणी होणार आहे. यापैकी पहिल्या चर्चेमध्ये पाच ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्देशानं स्वयंपूर्ण भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी, लोकांदरम्यानचे ऐतिहासिक, राजकीय आणि आर्थिक संबंधांचा वापर करण्यावर भर राहील. तर दुसऱ्या चर्चेत, आखाती प्रदेशातील तंत्रशास्त्रीय विकास आणि आर्थिक बदलांच्या गतीनुसार, आपल्या कर्मचारी बलाची कौशल्यं एकत्रित करण्यावर प्रामुख्याने भर असेल. विशेषतः आखातामधल्या भारतीय कामगारांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी, भारत सरकारनं केलेल्या विविध उपायांवर देखील यात चर्चा होणं अपेक्षित आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा दुसऱ्या टप्प्यातला हा एकोणिसावा भाग असेल.

****

परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तातडीनं सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री अजित पवार, वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांच्याकडे केली आहे. पक्षाच्या वतीनं या मागणीचं निवेदन काल देण्यात आलं.

****

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात ड्रेस कोड संदर्भात संस्थाननं लावलेला फलक हटवला नाही, तर ३१ डिसेंबरला आंदोलन करण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे. काल त्या शिर्डीला जाण्यासाठी अहमदनगर हद्दीत प्रवेश करताच त्यांना सुपा इथं अडवण्यात आलं होतं.

****

सांगली जिल्ह्यात यंदा सहकारी आणि खासगी अशा १२ कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. दिवाळीनंतर उसाचे अधिकाधिक गाळप करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तीन आठवड्यात साडे चौदा लाख टन उसाचं गाळप करून १४ लाख ७० हजार क्विंटल साखरेचं उत्पादन घेतलं आहे. तर सरासरी साखर उतारा दहा पूर्णांक १७ इतका आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...