Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात
कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ३० हजार २५४ रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या ९८ लाख
५७ हजार २९ झाली आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ३९१ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे तर ३३ हजार १३६ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. बरे झालेल्या एकूण रुग्णांची
संख्या ९३ लाख ५७ हजार ४६४ आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. सध्या
तीन लाख ५६ हजार ५४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या संसर्गामुळे आतापर्यंत एक लाख ४३
हजार १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं कोरोना विषाणू
संसर्गासाठी काल दिवसभरात दहा लाख १४ हजार ४३४ नमुन्यांची तपासणी केली. देशात आतापर्यंत
पंधरा कोटी ३७ लाख अकरा हजार ८३३ नमुन्यांची या संसर्गासाठी तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या सहा आठवड्यात कोरोना संसर्गामुळं मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत ६०
टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्ग प्रादुर्भावामुळे २७ राज्यांसाठी नऊ हजार ८७९ कोटी ६१ लाख रुपयांच्या
भांडवली खर्चाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. यातला पहिला टप्पा म्हणून चार हजार
९३९ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी आतापर्यंत राज्यांना देण्यात आला आहे. राज्यांना कर
महसुलात येत असलेल्या तुटीमुळे या आर्थिक वर्षात येणाऱ्या संभाव्य समस्या लक्षात घेऊन
राज्यांच्या भांडवली खर्चात हातभार लावण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून तामिळनाडू
वगळता इतर सर्व राज्यांना याचा लाभ मिळणार आहे. अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर योजनेचा
भाग म्हणून गेल्या १२ ऑक्टोबरला ही योजना जाहीर केली होती. भांडवली खर्चाचा परिणाम
गुणाकार श्रेणीत होतो, त्यामुळे अर्थव्यवस्थेची भविष्यातली उत्पादन क्षमता वाढेल आणि
परिणामी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दरही वाढणार असल्यानं केंद्र सरकारची आर्थिक परिस्थिती
बिकट असताना राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य या योजनेला २०२०-२१ वर्षासाठी
मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
राज्यात
काल कोरोना विषाणू संसर्गाचे चार हजार दोनशे एकोणसाठ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली
एकूण रुग्णसंख्या १८ लाख शहात्तर हजार सहाशे नव्व्याण्णव झाली आहे.
****
मराठवाड्यात
काल कोरोना विषाणू संसर्गामुळे आठ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २७४ रुग्णांची नोंद
झाली. नांदेड जिल्ह्यातले तीन, औरंगाबाद जिल्ह्यातले दोन, तर जालना, लातूर आणि परभणी
इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा मृतांमधे समावेश आहे.
****
राज्य
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होत आहे. अधिवेशनात दोन दिवस कामकाज होणार
आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही सदनांचे विरोधी पक्षनेते,
गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना आज संध्याकाळी चहापानासाठी आमंत्रित केलं आहे.
****
राज्याच्या
काही भागांमध्ये आज पाऊस झाला. पालघर जिल्ह्यात सकाळपासून रिमझिम पाऊस होत असून नाशिकमध्ये
सलग तिसऱ्या दिवशी आज अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वाशिम जिल्ह्यातही
काही ठिकाणी हलका पाऊस झाला. या वातावरणाचा गहू, तूर आणि हरभरा या पिकांवर दुष्परिणाम
होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
****
नाशिक
जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातल्या आस्तेगावाचे मूळ रहिवासी मेजर सुरेश रघुनाथ घुगे
यांना जम्मू काश्मीरमधील नवसेरा भागात देशसेवा करत असताना वीरमरण आलं. त्यांच्या निधनाच्या
वृत्तानं मनमाडसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. मेजर घुगे २००६ साली सैन्यदलात
दाखल झाल्यानंतर मराठा `ई बटालियन`मध्ये कार्यरत होते. मेजर सुरेश घुगे यांचा पार्थिव
देह पुणे इथं आणि तिथून नाशिक जिल्ह्यातल्या आस्तेगाव या त्यांच्या मूळ गावी आणला जाणार
असून उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
परभणी
इथं जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या वतीनं काल घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालती
मध्ये ७२१ प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. यात आठ कोटी ८६ लाख २ हजार ९८६ इतक्या
रक्कमेच्या प्रकरणांची तडजोड यात झाली. नांदेड जिल्ह्यातही काल राष्ट्रीय लोकअदालतीमधे
२ हजार ८१ प्रकरणं सामोपचारानं निकाली काढण्यात आली. यात ९ कोटी ३२ लाख ६ हजार ५५१
एवढ्या रक्कमेच्या प्रकरणांची तडजोड झाली.
****
No comments:
Post a Comment