Sunday, 20 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.12.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चारशेव्या प्रकाश पर्वानिमित्त नवी दिल्ली इथल्या गुरूद्वाराला भेट दिली. यावेळी मोदी यांनी शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादुर यांना त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी श्रद्धांजली अर्पण केली. काल पंतप्रधानांनी हुतात्मा दिनानिमित्त गुरूतेग बहादुर यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचं स्मरण केलं.

****

देशात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू संसर्गाचे नवे २६ हजार ६२४ रूग्ण आढळले तर २९ हजार रूग्ण उपचार घेऊन बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या देशात या संसर्गाचे सुमारे तीन लाख पाच हजार रूग्ण विविध रूग्णालयांत उपचार घेत आहेत.

****

नियंत्रक संस्थानी सुरक्षितता आणि गुणवत्ता या निकषांवर कोरोना विषाणू संसर्गावरील लसीकरणाला मान्यता दिल्यानंतरच देशात ही लस उपलब्ध करून देण्यात येईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आरोग्य मंत्रालयानं या लसीकरणाबाबत सातत्यानं विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देतांना हे स्पष्ट केलं आहे. देशात या लसीकरणाचं वेळापत्रक ठरवण्यात आलं असून, एकच लस वापरण्यात येणार आहे. वेगवेगळ्या लसी एकाचवेळी वापरल्या जाणार नाहीत; असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

****

राज्यात काल कोरोना विषाणू संसर्गाचे तीन हजार ९४० नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ९२ हजार ७०७ झाली आहे. काल ७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४८ हजार ६४८ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका झाला आहे. काल तीन हजार १११ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.

****

मराठवाड्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या अडीचशे रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन तर, बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काल ६२ नवे रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ५५, लातूर ४८, बीड २८,  उस्मानाबाद २०, परभणी १६, जालना १४, तर हिंगोली जिल्ह्यात काल संसर्ग झालेले सात नवे रुग्ण आढळले.

****

गेल्या महिन्यापासून देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ६३ लाख ५४ हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या ५१ टक्यांनी घटली आहे. दरम्यान, ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत आतापर्यंत ३९ लाखांपेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी आणण्यात आलं आहे.

****

वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं मुंबईत उद्यापासून दोन दिवस नववं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. उद्या आणि परवा होत असलेल्या या संमेलनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. उद्या सकाळी ८ वाजता दिंडी सोहळ्यानं संमेलनाची सुरूवात होईल. उद्घाटन सोहळ्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष अमृतमहाराज जोशी यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष चकोरमहाराज बावीसकर हे संमेलनाची सूत्रं स्विकारतील. संमेलनात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आजपासून दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे. आज दुपारी तीन वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात या पथकासमोर नुकसानासंदर्भातलं सादरीकरण करण्यात येणार आहे. उद्या हे पथक औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या सातारा इथल्या खंडोबा मंदिरात आजपासून खंडोबा उत्सवास सुरूवात होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मंदिरातही कोरोना विषाणूचे नियम पाळूनच भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठात अत्याधुनिक टेक्निकल एक्सलन्स केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पदवी घेवून बाहेर पडणाऱ्या अभियंत्यांना आजच्या औद्योगिक विश्वात सामील होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्यं यावीत या उद्देश्यानं हे केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. या केंद्राचं उद्धाटन आज संध्याकांळी सहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं होणार आहे. या केंद्रात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे कौशल्याधारित अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.

****

नाशिक जिल्ह्यात दिवाळी नंतर कोरोना बाधितांचे प्रमाण वाढलं असलं तरी स्थिती पुन्हा नियंत्रणात येत आहे. सद्य स्थितीत २ हजार ८६५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात आता पर्यंत १ लाख ६ हजार ९०९ रुग्ण आढळले आहेत त्यापैकी १ लाख २ हजार १४० रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५ पूर्णांक ५४ शतांश टक्के इतके आहे तर आतापर्यंत एकूण कोरोना बळींची संख्या १ हजार ९०४ इतकी झाली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...