आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जानेवारी २०२१ सकाळी
११.०० वाजता
****
कोविड
पार्श्वभूमीवर नव्या वर्षाचं
सर्वत्र साधेपणानं मात्र उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद,
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नागरीकांना
नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
देशात सर्व राज्यांत काही प्रमुख शहरांमध्ये कोविड लसीकरणाची
रंगीत तालीम उद्या दोन जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातल्या
पुणे, नागपूर, नंदूरबार आणि जालना या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. जालना
जिल्ह्यात जालना शहरातलं जिल्हा रुग्णालय, अंबड इथलं उप जिल्हा रुग्णालय, तसंच बदनापूर
तालुक्यातल्या शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे.
****
सोलापूर नागरी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल २१० महिलांना कोरोना
विषाणू संसर्गाची लागण झाली होती तरीही १९७ बालकं जन्मजात सुदृढ होती. या ठिकाणी कार्यरत
डॉक्टर आणि परिचारिकांचं कौशल्य यात तितकच महत्त्वाचं ठरल्याची माहिती प्रशासनानं दिली
आहे. विषाणू संपर्कातून फैलावत असल्यानं जन्मलेली बाळं आईच्या संपर्कात न ठेवता, सुरक्षितपणे
संगोपन केलं जात होतं. नऊ महिन्यांच्या काळात केवळ १३ बालकांना हा संसर्ग झाला, ती
बालकंही सुरक्षितपणे घरी गेली. रुग्णालय अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली
गरोदर महिलांसाठी कोरोना विषाणू संसर्ग कक्षात स्वतंत्र प्रसूती कक्ष तयार करण्यात
आला आहे.
****
रिलायन्स जिओनं ग्राहकांसाठी नव वर्षानिमित्त खास भेट आणली असून,
या अंतर्गत `इंटरकनेक्ट` वापर शुल्क रद्द करण्याची घोषणा केली आहे. भारतीय दूरसंचार
नियामक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार कंपनीनं काल सादर केलेल्या एका निवेदनानुसार कंपनीच्या
ग्राहकांना सर्व नेटवर्कवर घरगुती `व्हॉईस कॉलचा` आनंद घेता येणार आहे. यापूर्वी ग्राहकांना
योजनेच्या काही मिनिटांनंतर, दुसऱ्या नेटवर्कवर दूरध्वनी करण्यासाठी शुल्क भरावं लागत
होतं.
****
बीड इथं पोलिस आधिकारी-कर्मचाऱ्यांनी सामाजिक जाणिवेतून उपेक्षित,
वंचित गरजूंना थंडी पासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट वाटप केलं आहे. हा अनोखा उपक्रम
सुंदरबन, आधार माणुसकीचा, या वाट्सॲप ग्रूपच्या माध्यमातून राबवण्यात आला.
//**************//
No comments:
Post a Comment