Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 07 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** आरोग्य क्षेत्रात केंद्र सरकार भरीव काम करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन
** यापुढे फक्त धोरणात्मक आणि सामरिक क्षेत्रातच सरकारची गुंतवणूक - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्पष्टोक्ती
** नवापूर तालुक्यात बर्ड फ्यूची लागण झालेल्या सुमारे आठ हजार कोंबड्या आतापर्यंत नष्ट
** औरंगाबाद मनपा शाळेतल्या १० विद्यार्थ्यांच्या उपग्रहांचं अवकाशात प्रक्षेपण
आणि
** टेनिसपटू अंकिता रैना हिला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत थेट प्रवेश
****
आरोग्य क्षेत्रात केंद्र
सरकार भरीव काम करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडवे इथं खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या एस एस पी एम वैद्यकीय
महाविद्यालयाचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या
प्रत्येक गावापर्यंत आरोग्यसेवेत सुधारणा करण्यासाठी आयुष्यमान भारत ही योजना सुरू
केली आहे. देशात २२ एम्स रुग्णालयं उभारली जात असून यातली १८ पूर्ण झाली आहेत. वैद्यकीय
अभ्यासक्रमाचा जागा वाढवल्या जात आहेत. स्थानीय भाषेत प्रवेश परीक्षा देऊन मुलं वैद्यकीय
अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात, असं शहा यांनी नमूद केलं. कोविड काळात भारतातला मृत्यू
दर संपूर्ण जगात कमी होता, हे मोठं यश असल्याचंही शाह म्हणाले.
****
यापुढे फक्त धोरणात्मक
आणि सामरिक क्षेत्रातच सरकारी उद्योग असतील, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
यांनी स्पष्ट केलं आहे. आज मुंबईत केंद्रीय अर्थसंकल्प विषद करण्यासाठी मुंबई भाजपने
घेतलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आजवरच्या प्रत्येक सरकारांनी विविध सरकारी
कंपन्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता, मात्र, त्यात सुसूत्रता नव्हती. जनतेचा
पैसा अधिकाधिक परतावा मिळेल अशाच पद्धतीने गुंतवला पाहिजे. त्यासाठीच केंद्र सरकारनं
निर्गुंतवणुकीकरणाचं स्पष्ट धोरण देशासमोर मांडलं असल्याचं, सीतारामन यांनी नमूद केलं.
गरिबांना सुरक्षा, युवा
वर्गाच्या कौशल्याला वाव आणि उद्योजकांना नवं अवकाश देत, देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी
नागरिकांचा पैसा वापरला गेला पाहिजे असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. यंदाचा केंद्रीय
अर्थसंकल्प हा समाजवादाचं जोखड झुगारून देणारा अनेक अर्थांनी दिशादर्शक, आणि करदात्यांवर
विश्वास ठेवणारा अर्थसंकल्प असल्याचं त्या म्हणाल्या.
****
मराठा समाजाला आरक्षण
देण्यासाठी राज्यशासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास
महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. ते आज सोलापुरात मराठा समाजाच्या
बैठकीत बोलत होते. ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण करुन सत्ता टिकविण्याचा प्रयत्न
हे सरकार करत आहे, मात्र मराठा समाजाने आता पुन्हा एकजूट होवून सरकारवरती दबाव निर्माण
केल्या शिवाय आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक गावात आता उपोषणाला
बसण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली. सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
बरखास्त करुन समाजावर अन्याय केला आहे, सारथी संस्था ही बंद पाडण्याच्या विचारात सरकार
असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
****
नंदुरबार जिल्ह्याच्या
नवापूर तालुक्यात बर्ड फ्यूची लागण झालेल्या सुमारे आठ हजार कोंबड्या आतापर्यंत नष्ट
करण्यात आल्या आहेत. नवापूर तालुक्यातील विविध पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे ८ लाख ७४
हजार ५९८ कोंबड्या आहेत, यापैकी ३१ हजार ८३३ कोंबड्या आतापर्यंत दगावल्या आहेत. न्यायालयाच्या
आदेशानुसार पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या कोंबड्याच नष्ट करण्यात येत आहेत. कोंबड्या नष्ट
करण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाची १२ पथकं कार्यरत आहेत, प्रत्येक पथकात ५ जणांचा समावेश
आहे. संसर्ग केंद्रापासून १ किलोमीटर त्रिज्येत
क्षेत्र बाधित क्षेत्र आणि १० किलोमीटर त्रिज्येत क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषीत
करण्यात आलं आहे.
****
जगातील हवामान बदलामुळे
पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहन आता बंद करावी लागतील, यापुढे फक्त इथेनॉल आणि सीएनजी वर चालणारी वाहने वापरात आणावी लागतील, असं मत कृषि मूल्य आयोगाचे
माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं आहे. सांगली जिल्ह्यात मीरज इथं बांबू लागवड
चर्चासत्रात ते बोलत होते. वातावरणात कार्बन वाढवणाऱ्या बाबी आपण टाळल्या पाहिजेत,
असं पटेल यांनी नमूद केलं.
****
महाराष्ट्र राज्य उच्च
शिक्षण आणि विकास आयोगावर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची सदस्यपदी
नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही नियुक्ती
केली. विद्यापीठाने सादर केलेल्या सर्वसमावेशक सम्यक योजनेला मान्यता देणं, राष्ट्रीय
तसंच जागतिक पातळीवर होत असलेला शैक्षणिक विकास जाणून घेणं तसंच त्याचा मागोवा घेणं
आणि त्या बदलानुरूप राज्यात शिक्षण पध्दतीमध्ये यथोचित धोरण आणि कार्यतंत्र विकसित
करणं, या आणि इतर कार्यांसाठी हा आयोग कार्यरत असेल
****
मातोश्री रमाबाई आंबेडकर
यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं. अर्धांगिनी म्हणून डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांना भक्कम साथ दिली, ‘महामानव’ म्हणून बाबासाहेबांच्या जडणघडणीत माता रमाईंचं
योगदान सर्वाधिक असल्याचं, उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे.
****
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे दिवंगत सरचिटणीस र.ग.कर्णिक
यांना औरंगाबाद इथं कामगार कर्मचारी संघटनेतर्फे श्रध्दांजली
अर्पण करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालय परिसरात कंत्राटी कामगारांच्या उपोषण स्थळी झालेल्या
या श्रद्धांजली सभेत, संघटनेचे महासचिव विधीज्ञ अभय टाकसाळ यांनी कर्णिक यांच्या कार्याला
उजाळा दिला. कर्णिक यांच्या काळात
सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागल्याचं टाकसाळ यांनी सांगितलं
****
भारतीय कामगार सेनेच्या
अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. सूर्यकांत महाडिक यांच्या
निधनानंतर हे पद रिक्त झालं होतं. शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांपैकी भारतीय कामगार सेना
प्रमुख संघटना आहे.
****
भारतरत्न डॉक्टर एपीजे
अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंजअंतर्गत औरंगाबाद
महानगरपालिकेच्या शाळेतल्या १० विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह आज अवकाशात झेपावले.
रामेश्वरम् इथल्या प्रक्षेपण केंद्रातून या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं. औरंगाबाद
इथं प्रियदर्शिनी इंदिरा नगर इथल्या शाळेत विद्यार्थ्यांनी हे प्रक्षेपण थेट पाहिलं.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, भारतीय बुक रेकॉर्ड, एशियन
बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आणि
असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थांकडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं जाणार आहे.
****
जालना जिल्ह्यात आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे
जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या
रुग्णांची संख्या आता ३७० झाली आहे. दरम्यान, आज
दिवसभरात कोविड संसर्ग झालेले नवे
२९ रुग्ण आढळले. जिल्ह्यात कोविड बाधितांची एकूण संख्या आता १३ हजार ८८०
झाली आहे. दरम्यान, कोविडमुक्त झालेल्या २६ रुग्णांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले
१३ हजार ३५६ रुग्ण या संसर्गातून बरे
झाले आहेत. बाधित असलेल्या १५४ रुग्णांवर सध्या
उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात आज कोविड बाधित चार नवे रुग्ण आढळले, तर २ जण कोविड संसर्गातून मुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आता कोविड बाधितांची संख्या ३ हजार ७७६ झाली असून, आतापर्यंत ३ हजार ६७३ रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या ४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या
अपघात विभागात लागलेल्या आगीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
यांनी चौकशी समिती गठित केली आहे. या समितीने तीन दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अपघात विभागाच्या वरच्या मजल्यावर ठेवलेल्या लाकडी सामानास
६ फेब्रुवारीच्या रात्री अचानक आग लागल्यानंतर दवाखान्यात मोठा हलकल्लोळ उडाला होता.
****
भारताची महिला टेनिसपटू
अंकिता रैना हिला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळाला
आहे. उद्यापासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेत अंकिता आपल्या रुमानियन साथीदारासोबत,
महिला दुहेरीच्या मुख्य फेरीत खेळेल. कुठल्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत
थेट खेळण्याचा मान मिळवणारी अंकिता, तिसरी
भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे. या आधी निरुपमा वैद्यनाथन आणि सानिया मिर्झा यांना
हा मान मिळाला आहे. अंकिताची महिला एकेरीच्या मुख्य स्पर्धेत प्रवेश करण्याची प्राथमिक
संधी थोडक्यात हुकली असून, स्पर्धेच्या पहिल्या फेरीत एखाद्या खेळाडूनं माघार घेतली
तर त्या जागी खेळण्याची संधी अंकिताला मिळू शकते.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान चेन्नई इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ५७८ धावांवर संपुष्टात आला. आज दुसऱ्या दिवसअखेर
भारताच्या पहिल्या डावात, सहा बाद २५७
धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत ९१, चेतेश्वर
पुजारा ७३, शुभमन गिल २९, कर्णधार विराट कोहली ११ तर अजिंक्य रहाणे अवघ्या एका धावेवर
बाद झाला. आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वॉशिंग्टन सुंदर ३३ तर रविचंद्रन अश्विन
८ धावांवर खेळत होते. भारत सध्या ३२१ धावांनी पिछाडीवर आहे.
****
भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. सुर्यकांत महाडिक यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झालं होतं. शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांपैकी भारतीय कामगार सेना ही एक प्रमुख संघटना आहे.
****////****
No comments:
Post a Comment