Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07
February 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ फेब्रुवारी २०१९ दुपारी १.०० वा.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो,
पुणे महाराष्ट्र आणि गोवा राज्य च्या वतीनं व्होकल फॉर लोकल ही कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर
भारत जनजागृती मोहीम आजपासून सुरू झाली आहे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच पर्यावरण
मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेचा शुभारंभ केला.
यावेळी पत्र सूचना कार्यालय, पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई, संचालक भूपेंद्र
कँथोला, संचालक प्रकाश मकदुम आदी उपस्थित होते. देशात कोरोना लसीकरण संदर्भात गैरसमज
आहेत ते दूर करण्यासाठी १६ जनजागृती रथ तयार करण्यात आहे आहेत. लोककलांच्या माध्यमातून
शहरात आणि गावांमध्ये जाऊन हे चित्ररथ गैरसमज दूर करण्याचं काम करणार आहेत. या मोहिमेत
८०० कलावंत, ११ हजार ४०० कार्यक्रम सादर करणार आहेत.
****
देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १९ शतांश टक्के
झाला आहे. गेल्या २४ तासांत १२ हजार ८०५ रुग्ण कोविड संसर्गमुक्त झाले असून आतापर्यंत
१ कोटी ५ लाखांहून अधिक रुग्ण कोविड संसर्गमुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत १२ हजारांवर
रुग्णांचा अहवाल बाधित आला असून, ७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाची कोविडबाधितांची
एकूण संख्या १ कोटी ८ लाख झाली असून आतापर्यंत १ लाख ५४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. सध्या देशात १ लाख ४८ हजार ७६६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. देशात आतापर्यंत ५७
लाख ७५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत
३ लाख ५८ हजाराहून अधिक नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.
दरम्यान, कोविड १९ लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवावा असं
केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव
राजेश भूषण यांनी काल राज्यांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय
संचालकांसोबत लसीकरणाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली, त्या बैठकीत ही
सूचना करण्यात आली.
****
सुरक्षित रस्ते आणि रस्त्यांवरील अपघातप्रवण स्थळं तसंच वळणं
यांमध्ये येत्या एका वर्षात, सुधारणा करण्यासाठीची योजना, या विषयावर, केंद्रीय रस्ते
वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात
विविध सरकारी विभाग, शैक्षणिक संस्था आणि सल्लागार संस्थांचे नऊ वक्ते सहभागी झाले.
यावर्षी मंत्रालयातर्फे, सुरक्षा सप्ताहाऐवजी सुरक्षा महिना साजरा केला जात आहे. १८
जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान या महिनाभरात, अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित
केले जात आहेत.
****
वृत्तपत्रांना मूल्यवर्धन करण्याची गरज आहे, असे मत माहिती आणि
जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी व्यक्त केलं
आहे. बीड इथं वसंतराव काळे पत्रकारीता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय तसंच महाराष्ट्र
राज्य पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मासिक व्याख्यानमालेत
‘कोविडोत्तर वृत्तपत्रे’ या विषयावर ते काल बोलत होते. या क्षेत्रातील दर्जाहीनता थांबवून
शुद्धीकरण होणं आवश्यक असून यासाठी शिक्षणाचा नियम आणि दर्जा हवा आहे असं रामदासी यांनी
यावेळी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यात आज १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर
जिल्ह्यातल्या निफाड इथं ७ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
येत्या काही दिवसांत नाशिकचं तापमान ९ ते १२ अंश सेल्सिअस इतकं निच्चांकी राहणार असल्याचं
नाशिकच्या हवामान विभागानं सांगितलं आहे.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला
पहिला सामना चेन्नई इथं सुरु आहे. आज तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात इंग्लंडच्या संघानं
सर्वबाद ५७८ धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतीय संघानं आपल्या पहिल्या
डावात २ बाद ७० धावा झाल्या होत्या.
****
नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात येत असून जिल्ह्यात
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ पूर्णांक २४ शतांश टक्के झालं आहे. सध्या १ हजार १६३
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
धुळे जिल्ह्यात मौजे मेहेरगाव इथं बर्ड फ्ल्यू या आजारानं कोंबड्या
दगावल्या आहेत. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात अन्य ठिकाणी होण्याची शक्यता असल्यानं मेहेरगाव
मधील कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश
धुळे जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालूक्यात
चार पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्ल्यूचे अहवाल बाधित आले आहेत. या फार्मच्या परिसरातील
१२ अन्य पोल्ट्री फार्ममधील तीन लाख कोंबड्यांचा देखील धोकादायक क्षेत्रात समावेश झाला
आहे. प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून नवापूर तालुक्यातील कोंबडी मांस विक्रीवर बंदी
जाहीर केली आहे.
****
No comments:
Post a Comment