Sunday, 7 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.02.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 February 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

·      शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात करण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद.

·      प्रस्तावित जुनी वाहनं बाद करण्याचं धोरण वाहन उद्योग तसंच रोजगार निर्मितीला चालना देणारं - केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी.

·      राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते र. ग. कर्णिक यांचं निधन.

·      राज्यात दोन हजार ७६८ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात चार बाधितांचा मृत्यू.

·      औरंगाबाद शहरातल्या ऐतिहासिक खाम नदी स्वच्छता मोहीम राबवून नदीकिनारी सहाशे वृक्षांची लागवड.

आणि

·      भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या, आठ बाद ५५५ धावा.

****

सुधारीत कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड इथं संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.

लातूर इथं शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण जाधव, शेतकरी कामगार पक्षाचे उदय गवारे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात विविध समविचारी राजकीय पक्षांतले मान्यवर सहभागी झाले. या चक्काजाम आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावरची वाहतूक चार तास ठप्प झाली होती.

हिंगोलीत स्थापन झालेल्या किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. किसान सभा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, आम आदमी पार्टी आदी समविचारी पक्ष तसंच संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.

परभणी इथं कृषी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने परभणी तालुक्यात पोखर्णी इथं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहरासह, फुलंब्री, सिल्लोड, गंगापूर इथं रास्तारोको करुन केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. औरंगाबाद इथं आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन, नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

****

कृषी कायद्याबाबत दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकार गंभीर नाही, असं मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे, ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. केंद्रात भाजप सरकारचे बहुमत आहे मात्र, बहुमताचा अहंकार करता कामा नये. शेतकरी आंदोलन हिंसक झाल्यास त्यास केंद्र सरकार जबाबदार राहील असेही राऊत म्हणाले.

****

केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित असलेलं जुनी वाहनं बाद करण्याचं धोरण वाहन उद्योग तसंच रोजगार निर्मितीला चालना देणारं असल्याचं, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल वर्धा इथं वार्ताहरांशी बोलत होते. येत्या पाच वर्षात भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या १२ तारखेला बायो सीएनजी वर संचालित ट्रॅक्‍टरचं दिल्लीत लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात ‘ग्राम स्वराजची आधारशिला’ या विषयावरच्या दोन दिवसीय राष्‍ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटनही गडकरी यांच्या हस्ते काल झालं.

****

अस्तित्वात असणारी अनुदानं बंद करून उद्योजकांना वेठीस धरणं चुकीचं असल्याचं, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर, सीएमआयएचे अध्यक्ष कमलेश धूत यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारनं मराठवाडा, विदर्भ तसंच खानदेशातल्या औद्योगिक वीज ग्राहकांना दिलेलं अनुदान, निधी संपल्यामुळे जानेवारी महिन्यात देण्यात आलं नाही, त्या पार्श्वभूमीवर धूत यांनी हे मत व्यक्त केलं. सरकारनं औद्योगिक वीज ग्राहकांना अनुदानापोटी १२०० कोटी रुपये निधी जाहीर केला होता, तो संपल्यानं, जानेवारी महिन्यात वीज देयकात अनुदान मिळालं नाही, याकडे धूत यांनी लक्ष वेधलं. याबाबत मुख्यमंत्री तसंच ऊर्जा मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचं, सीएमआयएकडून सांगण्यात आलं.

****

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस आणि कामगार नेते रमाकांत गणेश उर्फ र. ग. कर्णिक यांचं काल मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. कर्णिक यांच्या निधनामुळे आधारवड हरपल्याची भावना कामगार क्षेत्रात व्यक्त होत आहे. कर्णिक यांनी तब्बल ५२ वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम पाहिलं. कर्णिक यांच्या नेतृत्वात १९७० साली ३७ दिवसांचा आणि १९७७ मध्ये ५४ दिवसांचा कर्मचारी संप झाला होता. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन तसंच महागाईसकट अन्य भत्ते मिळण्याचा मार्गही कर्णिक यांच्याच काळात सुकर झाला. कामगार, कर्मचारी चळवळीत न्याय हक्कांसाठी लढतानाही सामाजिक भान राखण्याचा धडा घालून देणारा नेता हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

****

राज्यात काल दोन हजार ७६८ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ४१ हजार ३९८ झाली आहे. काल २५ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार २८० झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५१ शतांश टक्के झाला आहे. तर काल एक हजार ७३९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ९२६ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ७२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ३४ हजार ९३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १६३ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातला प्रत्येकी एक आणि लातूर जिल्ह्यातल्या दोन रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ४४ नवे रुग्ण आढळले. बीड १८, लातूर ४०, जालना २१, उस्मानाबाद १३, नांदेड १२, परभणी ९, तर हिंगोली जिल्ह्यात काल ६ नवे रुग्ण आढळून आले.

****

हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी काल कोविड लस घेतली. हिंगोली जिल्ह्यात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झालेला असून महसूल तसंच पोलिस विभागातले अधिकारी तसंच कर्मचारी यांना लस देण्यात येत आहे. ही लस सुरक्षित असून, सर्वांनी लसीकरण करून घ्यावं, असा संदेश या पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे.

****

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोविड लस घेतली आहे, ही लस सुरक्षित असून, सर्वांनी लस घेण्याचं आवाहन मुगळीकर यांनी केलं. ते म्हणाले –

ही लस घेत असतांना मला कोणताही त्रास झालेला नाही. आणि लस संपूर्णतः सुरक्षित आहे आणि अत्यंत हलक्या पद्धतीची ही लस आहे. टोचल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि माझी सगळ्या नागरिकांना अशी नम्र विनंती आहे किंवा नम्र आवाहन आहे की ही लस ज्या ज्या वेळी त्यांना उपलब्ध आहे, त्या त्या वेळी त्या सर्वांनी लसीकरण करून घ्यावं, आणि जे हेल्थ वर्कर्स लस घ्यायचे राहिलेल आहेत त्या सर्वांनी ही लस टोचून घ्यावी.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल औरंगाबाद इथं क्रांती चौक परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणाचा निकाल लागे पर्यंत महाराष्ट्रात एकही नोकरभरती तसंच परीक्षा होऊ देणार नाही या तसंच अन्य विविध मागण्यांचे फलक घेऊन तरुण तरुणी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते.

****

इंधन आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं क्रांतीचौक परिसरात चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन करण्यात आलं.

****

आपापसातील सगळे मतभेद बाजूला ठेवून आपलं गाव सुंदर गाव करण्यासाठी सर्व लहान थोरांनी संकल्प करावा, असं आवाहन नांदेड जिल्ह्यातल्या हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केलं आहे. माझं गाव सुंदर गाव या मोहिमे अंतर्गत काल हदगाव तालुक्यात साप्ती इथं एका मेळाव्यात जवळगावकर बोलत होते. काल जिल्ह्यातल्या ३२ गावांमध्ये असे मेळावे घेण्यात आले. सर्व तालुक्यांना संपर्क अधिकाऱ्यांनी भेटी देऊन या कार्यक्रमास गती देण्यासाठी स्थानिक पातळीवर काल कार्यक्रम घेतले.

****

औरंगाबाद शहरातल्या ऐतिहासिक खाम नदी स्वच्छता मोहीम राबवून नदीकिनारी सहाशे वृक्षांची लागवड करण्यात आली. शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत या नदीच्या पुनरुज्जीवन तसंच संवर्धनासाठी महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यापुढे दर शनिवारी सकाळी साडेसात ते साडेदहापर्यंत लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचं पाण्डेय यांनी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना सरसकट विम्याचा लाभ वितरित करण्यात यावा अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. जिल्ह्यात यंदा खरीप पिकांचं विशेषत: सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं केलेल्या पंचनाम्यात जिल्ह्यातील जवळपास सर्वच शेतकरी नुकसानभरपाई मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत मग विमा वितरणासाठी वेगळे निकष का, असा प्रश्नही पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विचारला आहे.

****

उस्मानाबाद जिल्हा परिषदेतले जे कर्मचारी वृद्ध माता पित्यांचा सांभाळ करत नसतील, त्यांच्या वेतनातून ३० टक्के रक्कम कपात करून त्यांच्या आईवडलांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी ही माहिती दिली. याबाबतचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने ९ डिसेंबर २०२० रोजी घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ४४५ फेरीवाल्यांना ४४ लाख ५५ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –

फेरीवाल्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सुरू केलेल्या पी.एम. स्वनिधी योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील ४४५ फेरीवाल्यांना लाभ मिळाला आहे. त्यांना ४४ लाख ५५ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४ हजार ३९८ जणांनी अर्ज केले होते. त्यातील ९९५ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील विविध बँकांमधून ४४५ लाभार्थ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. पी. एम. स्वनिधी योजनेअंतर्गत अर्जदारांना वेळेवर कर्ज वितरित करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत.

आकाशवाणी बातम्यांसाठी, रमेश कदम, हिंगोली.

****

भारतीय स्टेट बँकेचं महाराष्ट्र मंडळ आणि मदुराई इथल्या धन फाउंडेशन यांच्यात काल नांदेड इथं महिला बचत गट सक्षमीकरणासाठी सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र मंडळाचे उपमहाव्यवस्थापक संतोष कुमार मोहपात्रा यांनी महिला बचत गटांना कर्ज वाटपा विषयी आणि कर्ज परत फेडी विषयी मार्गदर्शन केलं. यावेळी ११७ महिला बचत गटांना एक कोटी ४३ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील जरुळ इथले जेष्ठ स्वांतत्र्यसेनानी  रंगनाथ रामचंद्र पाटील मतसागर यांचं काल निधन झालं. ते ९८ वर्षांचे होतं. जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंद भाई श्रॉफ यांच्या सोबत मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात त्यांचा सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजीत जरुळ या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यातला पन्नगेश्वर साखर कारखाना अडचणीत असतानाही, शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं आमदार रमेश कराड यांनी म्हटलं आहे. कारखान्याचे सरव्यवस्थापक दिलीप बरुळे यांचा शेतकऱ्यांच्या वतीनं कराड यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.  आमदार कराड यांनी बरुळे यांच्याशी कारखान्याच्या गळीत हंगाम आणि ऊस गाळपाची यंत्रणा बाबत सविस्तर चर्चा करून माहिती घेतली.

****

हिंगोली इथं काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा स्वस्त धान्य दुकानातला ३४१ क्विंटल गहू पोलिसांनी काल हस्तगत केला. लिंबाळा औद्योगिक वसाहत परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत ट्रकसह एकूण २७ लाख ३५ हजार ५९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर ट्रकचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

****

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील रूई या गावात सुरू असलेल्या विकास कामांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काल पाहणी केली. यावेळी अमोल कदम यांनी घुगे यांना बायोगॅस प्रकल्पाविषयी माहिती दिली. घुगे यांनी शिवार फेरी करून पीक पाहणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

भारत आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नई इथं सुरु आहे. काल दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या, आठ बाद ५५५ धावा झाल्या आहेत. जसप्रित बुमराह, रविचंद्रन अश्विनन, ईशांत शर्मा आणि शाहबाज नदीम या चौघांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 20 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...