Sunday, 7 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.02.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०७ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत काल एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं. सूरनार आणि तेताम गावांच्या दरम्यान असलेल्या एका जंगलात ही चकमक झाली, त्यात ह्या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. मुचाकी मसा असं या दहशतवाद्याचं नाव आहे.

****

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी एस. एन. सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुब्रमण्यम हे एल अँड टी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक असून तसंच ते प्रख्यात अभियंता आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून एल अँड टी च्या पायाभूत सुविधांच्या व्यवसायाचे नेतृत्व केलं आहे. पुढील तीन वर्षांसाठी सुब्रमण्यम यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

****

आकाशवाणीचे संगीत संमेलन यापुढे ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन’ या नावाने ओळखले जाईल असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘मोनोग्राम’ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. आकाशवाणीने संगीताला घरोघरी पोहचवलं असल्याची आठवण करून देत आकाशवाणीने संगीत प्रसारणाची धुरा समर्थपणे सांभाळली असल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल ४४ रुग्णांना कोविड संसर्ग झाला असून जिल्ह्याची एकूण कोविड बाधित रुग्णांची संख्या ४७ हजार २०४ झाली आहे. जिल्ह्यातील ४५ हजार ८०१ रुग्ण कोविड संसर्गमुक्त होवून घरी परतले असून आतापर्यंत १ हजार २४१ रुग्णांचा या संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. सध्या १६२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. 

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल औरंगाबाद इथं क्रांती चौक परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रात एकही नोकरभरती तसंच परीक्षा होऊ देणार नाही या तसंच अन्य विविध मागण्यांचे फलक घेऊन तरुण तरुणी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. इंधन आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं क्रांती चौक परिसरात चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन करण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...