Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08
February 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
सुधारीत कृषी कायदे देशातल्या लहान शेतकऱ्यांच्या विकासाला सुरुवात
करतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या
अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. १२ कोटींहून
अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण करणं, हे या कायद्यांचं उद्दीष्ट असल्याचं
ते म्हणाले. सभागृहात शेतकरी आंदोलनाची भरपूर चर्चा झाली, जास्तीत जास्त वेळ जे मुद्दे
मांडले गेले, ते आंदोलनासंदर्भातले आहेत. पण, कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन आहे, यावर
मात्र सगळे गप्प आहेत. आंदोलन कसं आहे, आंदोलकांसोबत काय होतंय, मात्र मूळ मुद्यांवर
चर्चा झाली असती, तर चांगलं झालं असतं, असं पंतप्रधान म्हणाले. कोविड महामारीचा सामना
करण्यात भारतानं अनन्यसाधारण यश संपादन केलं असून, कठीण परिस्थितीत देशाची एकता दिसून
आल्याचं, त्यांनी नमूद केलं. पंतप्रधान विमा योजना, किसान रेल्वे, किसान उडान योजना
यासह केंद्र सरकारच्या विविध योजनांचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला.
****
महाविकास आघाडी सरकारनं एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली तयार
केली असून, राज्यातल्या उत्तुंग इमारतींच्या परवानगीसाठी आता जास्त नियम लागू नसतील.
या नियमावलीत आता १२० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींसाठी उच्चस्तरीय समितीची मंजुरी
घेण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. मात्र मुंबईसाठी हे निर्बंध कायम ठेवण्यात आले
आहेत. नव्या नियमावलीमुळे चटई क्षेत्र वापरावरील निर्बंध शिथिल झाल्यामुळे उत्तुंग
इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
देशात काल ११ हजार ८३१ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली, तर ८४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची
संख्या एक कोटी आठ लाख ३८ हजार १९४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५५ हजार
८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ११ हजार ९०४ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत
एक कोटी पाच लाख ३४ हजार ५०५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ४८
हजार ६०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, देशभरात आतापर्यंत ५८ लाख १२ हजार ३६२ नागरिकांचं कोविड
लसीकरण करण्यात आलं.
****
पंतपधान नरेंद मोदी येत्या २८ तारखेला आकाशवाणीवरच्या ‘मन की
बात’ या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेतला हा ७४ वा
भाग असेल, यासाठी नागरिक येत्या २६ तारखेपर्यंत माय गोव्ह आणि नमो अप्लिकेशन किंवा
एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य क्रमांकाच्या माध्यमातून सूचना, अभिनव
कल्पना आणि नवनवीन उपक्रमांबद्दल माहिती पाठवू शकतात.
****
वृत्तपत्रांना मूल्यवर्धन करण्याची गरज असल्याचं, माहिती आणि
जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक, गणेश रामदासी यांनी म्हटलं आहे.
बीड इथं वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, तसंच महाराष्ट्र राज्य
पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या, मासिक व्याख्यानमालेत ‘कोविडोत्तर
वृत्तपत्रे’ या विषयावर ते बोलत होते. या क्षेत्रातली दर्जाहीनता थांबवून शुद्धीकरण
होणं आवश्यक असून, यासाठी शिक्षणाचा नियम आणि दर्जा आवश्यक असल्याचं, रामदासी यांनी
नमूद केलं.
****
नाशिक मध्ये मार्च महिन्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबरोबरच
विद्रोही साहित्य संमेलन देखील भरवण्यात येणार आहे. पुढील महिन्यात २० ते २५ मार्च
दरम्यान भरवण्यात येणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उदघाटन येत्या
१४ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
देणाऱ्या वादग्रस्त पर्यावरण नेत्या ग्रेटा थनबर्ग यांना निमंत्रित करण्याचा निर्णय
आयोजकांनी घेतला आहे.
****
महाविकास आघाडी राज्यात चांगलं काम करत असून, ते भरभक्कम असल्याचं
जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं
आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद
यात्रेचा काल बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते.
महाविकास आघाडीचं सरकार वर्षानुवर्षे उत्तम कार्य करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या
कसोटी क्रिकेट सामन्यात, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात दोन
४४ धावा झाल्या होत्या. रविंचंद्रन अश्विननं हे दोन गडी बाद केला. तत्पूर्वी भारताचा
डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. ॠषभ पंतनं ९१, चेतेश्वर पुजारानं ७३, रविचंद्रन अश्विननं
३१, शुभमन गीलनं २९, विराट कोहली ११, तर अजिंक्य रहाणे अवघ्या एका धावेवर बाद झाला.
वॉशिंग्टन सुंदर ८५ धावांवर नाबाद राहीला. इंग्लडनं पहिल्या डावात ५७८ धावा केल्या
होत्या. इंग्लंडचा संघ २८५ धावांनी आघाडीवर आहे.
****
राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, आज धुळे इथं पाच पूर्णांक
पाच अंश, निफाड इथं सहा अंश, तर नाशिक इथं नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली. मराठवाड्यातही तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
****
No comments:
Post a Comment