Monday, 8 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.02.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 February 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

·      सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी शिवसेनेची हातमिळवणी - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका.

·      यापुढे फक्त धोरणात्मक आणि सामरिक क्षेत्रातच सरकारी उद्योग - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन.

·      येत्या अर्थसंकल्पात पेट्रोलवरील करात कपात करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत.

·      नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण झालेल्या आठ हजार कोंबड्या नष्ट.

·      राज्यात दोन हजार ६७३ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात १४५ रुग्ण.

·      परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागात लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी समिती गठीत.

·      परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रूपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी.

आणि

·      चेन्नई क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात सहा बाद २५७ धावा.

****

शिवसेनेनं जनादेशाचा अनादर करत फक्त सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली अशी टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडवे इथं खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या, एस एस पी एम वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन बंद दाराआड दिलं होतं, हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा त्यांनी फेटाळून लावला. असं आश्वासन द्यायचं असतं तर आपण ते उघडपणे दिलं असतं. निवडणूक प्रचारादरम्यान, देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं जाहीर सांगितलं जात होतं, त्याचवेळी शिवसेनेनं त्यावर आक्षेप का घेतला नाही, असा सवाल त्यांनी केला. आरोग्य क्षेत्रात केंद्र सरकार भरीव काम करत असल्याचं शाह यांनी नमूद केलं. देशात २२ एम्स रुग्णालयं उभारली जात असून, यातली १८ पूर्ण झाली आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढवल्या जात आहेत, स्थानीय भाषेत प्रवेश परीक्षा देऊन मुलं वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

****

यापुढे फक्त धोरणात्मक आणि सामरिक क्षेत्रातच सरकारी उद्योग असतील, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विशद करण्यासाठी काल मुंबई भाजपनं मुंबईत घेतलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आजवरच्या प्रत्येक सरकारांनी विविध सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता, मात्र त्यात सुसूत्रता नव्हती, असं त्यांनी सांगितलं. जनतेचा पैसा अधिकाधिक परतावा मिळेल अशाच पद्धतीनं गुंतवला पाहिजे, त्यासाठीच केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीकरणाचं स्पष्ट धोरण देशासमोर मांडलं असल्याचं, सीतारामन यांनी नमूद केलं. गरिबांना सुरक्षा, युवा वर्गाच्या कौशल्याला वाव आणि उद्योजकांना नवं अवकाश देत, देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी नागरिकांचा पैसा वापरला गेला पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प, हा समाजवादाचं जोखड झुगारून देणारा, अनेक अर्थांनी दिशादर्शक आणि करदात्यांवर विश्वास ठेवणारा अर्थसंकल्प असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या.

****

राज्यात पेट्रोलचे दर कमी करण्याचा सरकारचा मानस असून, यासाठी येत्या अर्थसंकल्पात पेट्रोलवरील करात कपात करण्याचे संकेत, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. करकपातीचा निर्णय आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून घेतला जाईल, मात्र किती कर घटवणार याबाबत आत्ताच बोलणं योग्य होणार नसल्याचं, पवार यांनी सांगितलं. राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प ७५ हजार कोटी रुपये तुटीचा असण्याची शक्यता आहे. केंद्राकडून थकीत असलेला २५ हजार कोटी रुपये जीएसटी परतावा न मिळाल्यास, हा अर्थसंकल्प एक लाख कोटी रुपये तुटीचा असण्याची शक्यता, पवार यांनी व्यक्त केली.

****

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, नरेंद्र पाटील यांनी केला आहे. ते काल सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत बोलत होते. ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण करुन सत्ता टिकवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, मात्र मराठा समाजानं आता पुन्हा एकजूट होवून सरकारवरती दबाव निर्माण केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक गावात आता उपोषणाला बसण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली. सरकारनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बरखास्त करुन समाजावर अन्याय केला आहे, सारथी संस्था ही बंद पाडण्याच्या विचारात सरकार असल्याचा आरोप, त्यांनी केला.

****

भारतीय जनता पक्षाच्या वतीनं समाज माध्यमातून काँग्रेस विषयी गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. नांदेड इथं काँग्रेस मीडिया सेलच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते काल बोलत होते. गैरसमजांना सडेतोड उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस मीडिया सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण झालेल्या सुमारे आठ हजार कोंबड्या आतापर्यंत नष्ट करण्यात आल्या आहेत. नवापूर तालुक्यातल्या विविध पोल्ट्री फार्ममध्ये, सुमारे आठ लाख ७४ हजार ५९८ कोंबड्या आहेत, यापैकी ३१ हजार ८३३ कोंबड्या आतापर्यंत दगावल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या कोंबड्याच नष्ट करण्यात येत आहेत. कोंबड्या नष्ट करण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाची १२ पथकं कार्यरत आहेत, प्रत्येक पथकात पाच जणांचा समावेश आहे. संसर्ग केंद्रापासून १ किलोमीटर त्रिज्येतलं क्षेत्र बाधित क्षेत्र आणि १० किलोमीटर त्रिज्येतलं क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आलं आहे.

धुळे जिल्ह्यात मौजे मेहेरगाव इथं बर्ड फ्ल्यू या आजारानं कोंबड्या दगावल्या आहेत. मेहेरगाव मधील कोंबड्या शास्त्रोक्त पदधतीनं नष्ट करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश, धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालय, प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो, तसंच महाराष्ट्र आणि गोवा राज्य च्या वतीनं व्होकल फॉर लोकल, ही कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहीम, कालपासून सुरू झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोहिमेच्या चित्ररथाला, हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेचा शुभारंभ केला. देशात कोरोना लसीकरण संदर्भात गैरसमज आहेत, ते दूर करण्यासाठी, या मोहिमेअंतर्गत १६ जनजागृती रथ तयार करण्यात आहे आहेत, शहरात आणि गावांमध्ये जाऊन हे चित्ररथ लोककलांच्या माध्यमातून गैरसमज दूर करण्याचं काम करणार आहेत, या मोहिमेत ८०० कलावंत, ११ हजार ४०० कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.

****

राज्यात काल दोन हजार ६७३ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ४४ हजार ७१ झाली आहे. काल ३० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ३१० झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५१ शतांश टक्के झाला आहे. तर काल एक हजार ६२२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ५५ हजार ५४८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ३५ हजार ९४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल जालना आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १४५ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात ३३ नवे रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात २९, नांदेड २५, बीड २३, लातूर १७, उस्मानाबाद आठ, परभणी सहा, तर हिंगोली जिल्ह्यात काल चार नवे रुग्ण आढळून आले.

****

भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंजअंतर्गत औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळेतल्या १० विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह काल अवकाशात झेपावले. रामेश्वरम् इथल्या प्रक्षेपण केंद्रातून या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं. औरंगाबाद इथं प्रियदर्शिनी इंदिरा नगर इथल्या शाळेत विद्यार्थ्यांनी हे प्रक्षेपण थेट पाहिलं. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, भारतीय बुक रेकॉर्ड, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थांकडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं जाणार आहे

****

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगावर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही नियुक्ती केली आहे.

****

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागात लागलेल्या आगीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीने तीन दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अपघात विभागाच्या वरच्या मजल्यावर ठेवलेल्या लाकडी सामानास ६ फेब्रुवारीच्या रात्री अचानक आग लागली होती.

दरम्यान, काल सायंकाळीही या रुग्णालयातल्या लाँड्री विभागास आग लागली, या आगीत विभागातलं काही साहित्य खाक झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

****

अतिवृष्टीग्रस्तांना हक्काची नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकारनं पीक विमा कंपनीला भाग पाडावं, अन्यथा स्वत: द्यावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. ते काल उस्मानाबाद इथं यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या मागणीसाठी १५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

****

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रूपयांच्या विकास आराखड्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काल ही माहिती दिली. ते काल वैद्यनाथ मंदिर विकास आराखड्याच्या बैठकीत बोलत होते, यावेळी या आराखड्याचं डिजिटल सादरीकरण करण्यात आलं. या आराखड्यात दर्शन बारीमधील प्रतिक्षागृह, धर्मशाळा, मेरू पर्वतावरील  कॉटेज, उद्यान यासह इतर विकास कामांचा समावेश आहे.

****

नांदेडचे जेष्ठ पत्रकार तथा प्राचार्य देवदत्त तुंगार यांचं आज पहाटे पुणे इथं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वृतपत्र अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून ते कार्यरत होते. तुंगार यांनी आचार्य आत्रे यांच्या मराठा या वृतपत्रातही काम केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज पुणे इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

तुळजापूर इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या सुधारित प्रशासकीय प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या मागणीसाठी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. या पुतळ्यासाठी ११ जानेवारीला हा प्रस्ताव पाठवला असून, अद्यापही परवानगी मिळाली नसल्याचं, रोचकरी यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. येत्या ११ फेब्रुवारीला उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.

****

भारताची महिला टेनिसपटू अंकिता रैना हिला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे. आजपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेत अंकिता आपल्या रुमानियन साथीदारासोबत, महिला दुहेरीच्या मुख्य फेरीत खेळेल. कुठल्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत थेट खेळण्याचा मान मिळवणारी अंकिता, तिसरी भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे. या आधी निरुपमा वैद्यनाथन आणि सानिया मिर्झा यांना हा मान मिळाला आहे. अंकिताची महिला एकेरीच्या मुख्य स्पर्धेत प्रवेश करण्याची प्राथमिक संधी थोडक्यात हुकली असून, स्पर्धेच्या पहिल्या फेरीत एखाद्या खेळाडूनं माघार घेतली तर त्या जागी खेळण्याची संधी अंकिताला मिळू शकते.

****

भारत आणि इंग्लंड दरम्यान चेन्नई इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ५७८ धावांवर संपुष्टात आला. काल तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात, सहा बाद २५७ धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत ९१, चेतेश्वर पुजारा ७३, शुभमन गिल २९, कर्णधार विराट कोहली ११ तर अजिंक्य रहाणे अवघ्या एका धावेवर बाद झाला. कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वॉशिंग्टन सुंदर ३३ तर रविचंद्रन अश्विन ८ धावांवर खेळत होते. भारत सध्या ३२१ धावांनी पिछाडीवर आहे. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी भारताला आणखी १२२ धावांची गरज आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने ‘लिंगभावात्मक चर्चाविश्व’ या विषयावर आजपासून १८ फेब्रुवारी पर्यंत दहा दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. केंद्राच्या संचालक डॉ.स्मिता अवचार यांनी ही माहिती दिली. दररोज दुपारी तीन ते साडे चार या वेळेत ही व्याख्यानमाला ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.

****

लातूर इथं भारतीय वैद्यक संघटनेच्या शाखेनं घेतलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला, विजेत्या स्पर्धकाना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र तसंच पदक देऊन गौरवण्यात आलं.

****

मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं. रमाईंनी अर्धांगिनी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भक्कम साथ दिली, ‘महामानव’ म्हणून बाबासाहेबांच्या जडणघडणीत माता रमाईंचं योगदान सर्वाधिक असल्याचं, उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी काल माता रमाईंना अभिवादन केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती लिंबोनीच्या वतीनं घेण्यात आलेल्या अभिवादन सभेत बोलताना कांबळे यांनी, आजच्या स्त्रियांनी जिजाऊसाहेब तसंच रमाईंचा आदर्श घेतला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

****

गरीबीमुळे हताश न होता काटकसरीने वागून संसार सुखाचा करावा, असा सल्ला बौद्धाचार्य केशव कांबळे यांनी दिला आहे. लातूर इथं माता रमाई यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त झालेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते.

****

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे दिवंगत सरचिटणीस र.ग.कर्णिक यांना औरंगाबाद इथं कामगार कर्मचारी संघटनेतर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालय परिसरात कंत्राटी कामगारांच्या उपोषण स्थळी झालेल्या या श्रद्धांजली सभेत, संघटनेचे महासचिव विधीज्ञ अभय टाकसाळ यांनी कर्णिक यांच्या कार्याला उजाळा दिला. कर्णिक यांच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागल्याचं टाकसाळ यांनी सांगितलं

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 21 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...