आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०८ फेब्रुवारी २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
केलेलं भाषण आत्मनिर्भर भारताला मार्ग दाखवणारं असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला
पंतप्रधान उत्तर देत आहेत.
दरम्यान, लोकसभेत आजपासून अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर
चर्चा सुरु होणार आहे.
****
उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यात हिमनदीच्या प्रकोपानंतर आलेल्या
पुरानं प्रभावीत झालेल्या परिसरात, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून बचाव आणि मदत कार्य
वेगानं सुरु आहे. याठिकाणी काल सकाळी भूस्खलन झाल्यानं, धौलीगंगा नदीला अचानक पूर आला,
या पुरामुळे तपोवन परिसरातल्या रैणी गावाजवळच्या ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाचं मोठं
नुकसान झालं आहे. आतापर्यंत आठ जणांचे मृतदेह सापडले असून, १५० जण बेपत्ता आहेत.
****
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे जागतिक पटलावर उदयाला येत
असलेल्या, ‘आत्मनिर्भर’ भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज असल्याचं, माहिती
आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहर परिषदेत
बोलत होते. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, परिवहन, संरक्षणासह, देशाला
अर्थशक्ती बनवण्याचा एक सुदृढ पाया रचला जात असल्याचं, जावडेकर म्हणाले.
****
राज्य नगर परिषद तसंच नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्या गाभा गटाची
काल परभणी इथं बैठक झाली. या बैठकीत कोषागार कार्यालयाकडून वेतन मिळण्यासह अन्य मागण्यांवर
चर्चा करण्यात आली. या मागण्यांवर सरकारनं महिनाभरात विचार न केल्यास आंदोलन छेडण्याचा
निर्णय बैठकीत घेण्यात आला.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी
क्रिकेट सामन्यात, आजच्या चौथ्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या आठ
बाद ३१८ धावा झाल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदर ७० धावांवर खेळत आहे. भारत २५६ धावांनी
पीछाडीवर आहे.
****
जगातील हवामान बदलामुळे पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहनं आता
बंद करावी लागतील, यापुढे फक्त इथेनॉल आणि
सीएनजी वर चालणारी वाहनं वापरात आणावी लागतील, असं मत कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष
पाशा पटेल यांनी व्यक्त केलं आहे. सांगली जिल्ह्यात मीरज इथं बांबू लागवड चर्चासत्रात
ते काल बोलत होते. वातावरणात कार्बन वाढवणाऱ्या बाबी आपण टाळल्या पाहिजेत, असं पटेल
यांनी नमूद केलं.
****
No comments:
Post a Comment