Tuesday, 9 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09 February 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

·      सुधारीत कृषी कायद्यांसंदर्भात आंदोलन करणाऱ्यांनी चर्चेसाठी पुढे यावं, सरकार चर्चेला तयार- पंतप्रधान नरेंद्र मोदी.

·      शेतकरी आंदोलनासंदर्भात आलेल्या ट्वीट संदेशांची, गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश.

·      राज्यात थंडीचा कडाका वाढला.

·      अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे यंदाचे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार जाहीर.

·      राज्यात दोन हजार २१६ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात चार बाधितांचा मृत्यू.

आणि

·      भारत आणि इंग्लंड यांच्यातला चेन्नई कसोटी क्रिकेट सामना रोमांचक स्थितीत.

****

सुधारीत कृषी कायद्यांसंदर्भात आंदोलन करणाऱ्यांनी चर्चेसाठी पुढे यावं, सरकार आजही चर्चेला तयार असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना, ते बोलत होते. राज्यसभेत शेतकरी आंदोलनाबाबत भरपूर चर्चा झाली, मात्र जास्तीत जास्त वेळा जे मुद्दे मांडले गेले, ते आंदोलनासंदर्भातले आहेत. पण, आंदोलन कोणत्या मुद्याविरोधात आहे, यावर मात्र सगळे गप्प आहेत, आंदोलनाच्या मूळ मुद्द्यांवर चर्चा झाली असती, तर चांगलं झालं असतं, असं पंतप्रधान म्हणाले. बाजार समिती व्यवस्था अधिक आधुनिक आणि बळकट करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, किमान हमीभाव व्यवस्थाही कायम राहणार असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –

कोई कमी हो तो उसको ठीक करेंगे और कही ढीलाई है तो उसे कसेंगे। और इसीलिए मै कहता हॅूं, मैं विश्वास दिलाता हॅूं की मंडिया अधिक आधुनिक बने। अधिक प्रतिस्पर्धी होगी। इस साल बजेट मे भी हमने इसका प्रावधान किया है। इतना ही नही एम एस पी है, एम एस पी था, एम एस पी रहेगा।

 

सुधारित कृषी कायदे देशातल्या लहान शेतकऱ्यांच्या विकासाला सुरुवात करतील, १२ कोटीहून अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण करणं, हे या कायद्यांचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान म्हणाले. कोविड प्रादुर्भावाचा सामना करण्यात भारतानं अनन्यसाधारण यश संपादन केलं असून, कठीण परिस्थितीत देशाची एकता दिसून आल्याचं, त्यांनी नमूद केलं. सार्वजनिक धान्यवितरण व्यवस्था, पंतप्रधान विमा योजना, किसान रेल्वे, किसान उडान योजना यासह केंद्र सरकारच्या विविध योजनांचा, पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला.

****

कोविड प्रादुर्भावाच्या काळात देशात एकही मूल शिक्षणापासून वंचित राहिलं नाही, असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. ते काल लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. या काळात मुलांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं गेलं, देशात शिक्षणाशी संबंधित दूरचित्रवाणी वाहिन्यांची संख्या ३४ वर पोहोचली, याशिवाय सामाजिक रेडिओचाही शिक्षणासाठी वापर झाला, अशी माहिती त्यांनी दिली. आता अनेक राज्यांमधे शाळा आणि महाविद्यालयं पुन्हा सुरु होत असल्याचं, जावडेकर यांनी सांगितलं.

****

शेतकरी आंदोलनासंदर्भात केंद्र सरकारच्या समर्थनात करण्यात आलेल्या ट्वीट संदेशांची, गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. काही परदेशी कलाकांरानी शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यादाखल केलेल्या ट्वीटसंदर्भात, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, अक्षयकुमार, आदींनी ट्वीट करत, शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या सर्वांनी या विषयावर एकाच वेळी ट्विट करण्याचं कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? असा प्रश्न विचारत, सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोविडबाधा झाल्यानं, त्यांच्यावर नागपुरातल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेत, काँग्रेस पक्षानं, या चौकशीची मागणी केली.

****

महाविकास आघाडी सरकारनं एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली तयार केली असून, राज्यातल्या उत्तुंग इमारतींच्या परवानगीसाठी, आता जास्त नियम लागू नसतील. या नियमावलीत आता १२० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींसाठी उच्चस्तरीय समितीची मंजुरी घेण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. मात्र मुंबईसाठी हे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. नव्या नियमावलीमुळे चटई क्षेत्र वापरावरील निर्बंध शिथिल झाल्यामुळे, उत्तुंग इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

****

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत राज्य सरकारनं आपले मुद्दे व्यवस्थित मांडावे, या मागणीसाठी, उद्या बुधवारपासून राज्यभरात प्रत्येक गावात चक्री उपोषण केलं जाणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी, काल सोलापूर इथं मराठा समाजातल्या मान्यवरांची बैठक घेतल्यानंतर, पत्रकारांना ही माहिती दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, तसंच सारथी संस्थेबाबत, राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख करत, मराठा समाजासाठी फडणवीस सरकारनं सुरू केलेल्या योजना महाविकास आघाडी सरकार बंद करत असल्याचा आरोप, नरेंद्र पाटील यांनी केला.

****

पंतपधान नरेंद मोदी येत्या २८ तारखेला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रम मालिकेतून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेतला हा ७४ वा भाग असेल, यासाठी नागरिक येत्या २६ तारखेपर्यंत माय गोव्ह आणि नमो अप्लिकेशन किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य क्रमांकाच्या माध्यमातून सूचना, अभिनव कल्पना आणि नवनवीन उपक्रमांबद्दल माहिती पाठवू शकतात.

****

राज्यात मराठवाडा, विदर्भाच्या बऱ्याच भागात, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. परभणी, पुणे, नागपूर, नाशिक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. परभणी इथं काल आठ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे वर्ष २०२० - २१ चे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. डॉ. सुरेश सावंत, अय्यूब पठाण, संजय ऐलवाड, बबन शिंदे, सुनंदा गोरे, विश्वास वसेकर, वीरभद्र मिरेवाड, स्नेहल डांगे आणि गायत्री सूर्यवंशी या मराठवाड्यातल्या साहित्यिकांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. येत्या १४ फेब्रुवारीला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

नागपूर इथं कोविड मृत्यू दर अधिक असण्याची कारणं शोधण्यासाठी, केंद्राचं त्रिसदस्यीय पथक काल नागपुरात दाखल झालं. राज्यात कोविड मृत्यूचा दर दोन पूर्णांक ५० शतांश टक्के असतांना, नागपूरचा कोविड मृत्यू दर तीन टक्क्यांपेक्षा अधिक आहे. नागपूर जिल्ह्यात दररोज अडीचशे ते तीनशे कोविड रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर, या पथकानं काल सकाळी नागपूर विभागीय कार्यालयात, विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकारी यांच्याशी आणि त्यानंतर विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयात, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. पथकानं विदर्भातल्या चार जिल्ह्यांबाबत नोंदवलेल्या निरीक्षणासंदर्भात, नागपूर तसंच अमरावती विभागीय यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना, मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

****

राज्यात काल दोन हजार २१६ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ४६ हजार २८७ झाली आहे. काल १५ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ३२५ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५१ शतांश टक्के झाला आहे. तर काल तीन हजार ४२३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ५८ हजार ९७१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ७३ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ३४ हजार ७२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १३५ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या दोन, तर जालना आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ४३ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात २३, जालना २०, बीड १८, नांदेड १४, परभणी सात, उस्मानाबाद सहा, तर हिंगोली जिल्ह्यात काल चार नवे रुग्ण आढळून आले.

****

नाशिकमध्ये मार्च महिन्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबरोबरच, विद्रोही साहित्य संमेलन देखील भरवण्यात येणार आहे. २० ते २५ मार्च दरम्यान भरवण्यात येणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उदघाटन, येत्या १४ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या वादग्रस्त पर्यावरण नेत्या ग्रेटा थनबर्ग, यांना निमंत्रित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

****

नांदेड इथलं नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि रूपवेध ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमानं, उद्या १० आणि परवा ११ फेब्रुवारीला, नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचं, ‘कैफी आजमी : आयडिया ऑफ इंडियाचा प्रभावी भाष्यकार’ आणि ‘साहिर लुधियानवी प्रेम आणि क्रांतीचा अजोड शायर’ या दोन विषयांवर व्याख्यान होणार आहे. दोन्ही दिवशी सायंकाळी सहा वाजता नांदेड इथल्या कुसुम सभागृहात ही व्याख्यानं होणार असल्याचं, रूपवेध ग्रंथालयाचे प्रमुख दीपनाथ पत्की यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच - उपसरपंच पदांसाठी काल निवडणूक घेण्यात आली. जिल्ह्यातल्या काही ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध तर काही ठिकाणी अटीतटीची लढत झाली. जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचातीच्या सरपंचपदी, शकुंतलाबाई कसुरे यांची, तर उपसरपंचपदी, नागेश कुठारे यांची निवड करण्यात आली आहे. वेरुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी कुसुमबाई मिसाळ आणि उपसरपंचपदी, विजय राठोड यांची निवड करण्यात आली आहे. जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गजानन बोंबले, तर उपसरपंच पदी, प्रवीण दुबिले यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, पैठण तालुक्यातल्या ८० ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवड, येत्या शुक्रवारी १२ फेब्रुवारीला होणार आहे.  

****

पाणी वाचवण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे. जलसंधारण मंत्रालय आणि युवा कार्यक्रम तसंच क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं देशभरात ७०० जिल्ह्यामध्ये ‘कॅच द रेन’ म्हणजेच पावसाचं पाणी साठवा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गावांचाही समावेश आहे. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. ‘कॅच द रेन’च्या बोधचिन्हाचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. या मोहिमेंतर्गत गावातील किमान १०० कुटुंबांना छतावर, शेतात तसंच गावाच्या परिसरात पडणारं पावसाचं पाणी साठवण्याबाबत, जनजागृती करण्यात येत आहे.

****

डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज अंतर्गत परभणी इथल्या सात विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह अवकाशात झेपावले. तामिळनाडूत रामेश्वरम इथं झालेल्या या प्रक्षेपण कार्यक्रमात, परभणीतल्या केएनपी इन्स्टिट्यूटच्या सात बालवैज्ञानिकांनी, सहभाग नोंदवत जागतिक विक्रमाला गवसणी घातली.

****

ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि रसरंगचे माजी संपादक विजय जानोरकर यांचं काल नाशिक इथं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. १९६२ मध्ये ज्येष्ठ चित्रपट समीक्षक इसाक मुजावर यांच्या मार्गदर्शनात, त्यांनी सिनेपत्रकारितेला सुरुवात केली होती. १९६९ मध्ये त्यांनी चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीची स्थापना केली होती.

****

कोविड-19 संसर्गकाळातील टाळेबंदी तसंच निवडणूक आचारसंहिता, यामुळे बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेला विभागीय लोकशाही दिन, काल औरंगाबाद इथं घेण्यात आला. यावेळी प्रलंबित ४१ आणि काल प्राप्त झालेल्या पाच अशा एकूण ४६ अर्जांवर उपायुक्त जगदीश मनियार यांनी सुनावणी घेतली. संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं सुरू असलेला पहिला कसोटी क्रिकेट सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. ही कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला आज अखेरच्या दिवसात भारताचे नऊ गडी बाद करणं आवश्यक आहे, तर भारताला विजयासाठी आणखी ३८१ धावांची गरज आहे. दरम्यान, इंग्लंड संघांचा दुसरा डाव काल १७८ धावांत संपुष्टात आला, रविचंद्रन अश्विननं ६१ धावा देत सहा बळी घेतले, शाहबाज नदीमने दोन, तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी एक बळी घेतला. भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद ३९ धावा झाल्या. रोहित शर्मा १२ धावांवर बाद झाला, काल चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा तर शुभमन गिल १५ आणि चेतेश्वर पुजारा १२ धावांवर खेळत होते. 

****

नंदूरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, पशुसंवर्धन विभागानं परिणामकारक तसंच योग्यरितीने सर्वेक्षण करावं आणि पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांच्या संख्येची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. वन विभागाच्या मदतीने स्थलांतरित पक्ष्यांच्या मार्गांची माहिती घेण्यात यावी, आणि वन विभागाच्या साह्यानं स्थलांतरित तसंच वन्य पक्ष्यांचे नमुने घ्यावे, असे निर्देशही भारूड यांनी दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात काल सुमारे ८८ हजारावर कोंबड्या नष्ट करण्यात आल्या, गेल्या दोन दिवसात ८० पथकांच्या माध्यमातून, जवळपास एक लाख ३० हजारावर कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. नवापूर तालुक्यात आठ पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्यांचे अहवाल बाधित आले आहेत.

****

परभणी इथं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातल्या वाहतुक निरीक्षकांना पार्श्वनाथ ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी काल लेखणी बंद आंदोलन केलं, तर अधिकाऱ्यांनी दिवसभर काळ्याफिती लावून कामकाज केलं. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन, त्यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. संबंधितांना तातडीने अटक करावी, कार्यालयीन कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रशासकीय संरक्षण द्यावं, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...