Wednesday, 10 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.02.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 February 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

ग्रामीण भागात रोजगार वाढवण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत २७ लाख कोटी रुपयांचं पॅकेज दिलं असल्याचं कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी आज राज्यसभेत सांगितलं. देशात चाळीस कोटी असंघटीत तर, दहा कोटी संघटीत क्षेत्रातले कामगार असल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितलं. 

****

देशात काल ११ हजार ६७ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी आठ लाख ५८ हजार ३७१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५५ हजार २५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १३ हजार ८७ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी पाच लाख ६१ हजार ६०८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ४१ हजार ५११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल सात लाख ३६ हजार ९०३ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत २० कोटी ३३ लाख २४ हजार ६५५ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.

दरम्यान, देशभरात आतापर्यंत ६३ लाख ११ हजार ५६१ नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं.

****

राज्यात काल ५१५ लसीकरण केंद्रामधून २३ हजार ७२१ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आलं. त्यापैकी १२ हजार ३४३ आरोग्य कर्मचारी, तर ११ हजार ३७८ आघाडीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २३ हजार ५६८ लाभार्थ्यांना कोविशिल्ड, तर १५३ लाभार्थ्यांना कोवॅक्सिन लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकूण पाच लाख ३६ हजार १२७ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. काल सर्वांत जास्त लसीकरण मुंबई आणि ठाण्यात झालं. अहमदनगर, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, कोल्हापूर, लातूर, नंदुरबार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल लसीकरण झालं नाही.

****

मुंबईतल्या एका पाच महिन्यांच्या बालिकेच्या उपचारासाठी आवश्यक औषधी अमेरिकेतून आयात करण्यासाठी लागणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय त्वरेने घेतल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

तिरा कामत ही पाच महिन्यांची बालिका असून, तिला जीन रिप्लेसमेंट उपचारांची नितांत गरज आहे. पुढील उपचारासाठीचं औषध अमेरिकेतून आयात करावं लागणार होतं. या औषधावरील सर्व करांतून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून विनंती केली होती.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं पानमसाला, गुटखा बंदी कडक करण्यासंदर्भात पोलिस आणि राज्य प्रशासनाला नोटीस जारी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या तांभेरे इथले सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी पानमसाला गुटखा बंदी कडक करण्यासाठी न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे. पानमसाला, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ बंदी बाबतच्या कार्यवाहीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांनी विशेष पथक स्थापन करावं, पोलीस प्रशासनानं अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यवाही करावी, तक्रारीसाठी टोल फ्री नंबर ची सुविधा चालू करावी आणि बोगस कारवाई करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

****

पंतपधान नरेंद मोदी येत्या २८ तारखेला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेतला हा ७४ वा भाग असेल, यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या २६ तारखेपर्यंत, माय गोव्ह, नमो अप्लिकेशन किंवा, एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य, या क्रमांकावर पाठवाव्या, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर तालुक्यात काल तिसऱ्या दिवशी ८४ हजार ७८७ कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. तीन दिवसात दोन लाख २१ हजार ४९२ कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आल्या. प्रशासनानं काल काही कोबड्यांचे नमुने भोपाळ इथल्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. अन्य पोल्ट्री फार्म मध्ये कोंबड्याच्या नैसर्गिक मृत्यूच्या प्रमाणावर देखील प्रशासन लक्ष ठेऊन आहे. 

****

राज्य परिवहन महामंडळातर्फे बुलडाणा जिल्ह्याकरीता लोकभिमुख पर्यटन सेवा सुरु करण्यात आली आहे. पर्यटन सेवा विशेष बस दर रविवारी सुरु राहणार असून ही बस बुलडाणा ते वेरुळ लेणी मार्गे जाळीचा देव, अजिंठा लेणी अशी राहणार आहे. या बसचं प्रवास भाडं ज्येष्ठांकरता ४२० रुपये, लहान मुलांसाठी २१० रुपये असणार आहे. या बससेवेसाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असं आवाहन विभाग नियंत्रण आणि विभागीय वाहतुक अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.

****

परभणी जिल्हा परिषदेतल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी बैठक घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना टाकसाळे यांनी संबंधित विभागांना दिल्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 27 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...