Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 February
2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
११ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
·
सुधारित कृषी कायदे
शेतकऱ्यांचे कोणतेही अधिकार हिरावून घेत नसल्याचं पंतप्रधानांचं स्पष्टीकरण.
·
केंद्रीय अर्थसंकल्पात
राज्यासाठी तीन लाख पाच हजार ६११ कोटी रुपयांच्या प्रकल्पांची तरतूद - विधानसभेचे विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस.
·
ऊर्जा विभागाच्या
नोकर भरतीत सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकांतून आरक्षण देण्याचा ऐच्छिक पर्याय उपलब्ध करून देणारा शासन आदेश जारी.
·
राज्यातील सर्व विभागीय
आयुक्तालयात राज्य महिला आयोगाची कार्यालयं सुरू करण्यास मान्यता.
·
औरंगाबाद जिल्ह्यातील
गंगापूर सहकारी साखर कारख्यान्याच्या १५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी
विशेष तपास पथकाची स्थापना.
·
राज्यात तीन हजार
४५१ नव्या कोविड रुग्णांची नोंद, नांदेड जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू.
आणि
·
एटीएम कार्डचं क्लोनिंग
करुन बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या बिहारच्या टोळीला बीडमध्ये अटक.
****
सुधारित कृषी कायदे शेतकऱ्यांचे कोणतेही अधिकार हिरावून घेत
नसून, त्यांना व्यवसायाचे अधिक पर्याय उपलब्ध करून देत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर
चर्चेच्या उत्तरात बोलत होते. ज्या शेतकऱ्यांना नवे पर्याय नको असतील, त्यांच्यासाठी
बाजार समितीचा पर्याय कायम असल्याचा पुनरुच्चार, पंतप्रधानांनी यावेळी केला. केंद्र
सरकार संवेदनशील असावं, देशातल्या जनतेनं मागणी करण्यापूर्वी त्यांच्या प्रगतीचे निर्णय
सरकारने घेतले पाहिजेत, असं त्यांनी नमूद केलं. सुधारित कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या
पक्षांनी, आपापली सरकारं असलेल्या राज्यांमध्ये काही प्रमाणात असेच निर्णय घेतले असल्याकडे
पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. आंदोलक आणि आंदोलनजीवी या दोन्हीतला फरक लक्षात घेणं आवश्यक
असल्याचं, ते म्हणाले. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचं पावित्र्य आंदोलनजीवी
लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी कलंकित केल्याचं, पंतप्रधान म्हणाले. आत्मनिर्भर भारत
योजना, संरक्षण आणि सीमा सुरक्षा, पायाभूत सुविधा, कोविड लसीकरण, यासह अनेक विषयांवर
पंतप्रधानांनी भाष्य केलं. पंतप्रधानांच्या उत्तरानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा
धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाला.
दरम्यान, लोकसभेत आणि राज्यसभेत काल अर्थसंकल्पावरील चर्चेला
प्रारंभ झाला, तर काल राज्यसभेत बंदर विकास विधेयक मंजूर झालं.
****
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी, तीन लाख
पाच हजार ६११ कोटी रुपयांच्या प्रकल्पांची तरतूद केली असल्याची माहिती, विधानसभेचे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली, ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही, हा विरोधकांचा आरोप फडणवीस यांनी
फेटाळून लावला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतुदींमध्ये एक लाख ३३ हजार २५५ कोटी
रुपयांचे ३२८ रस्त्यांचे प्रकल्प, रेल्वेचे १६ नवे मार्ग, १८ रेल्वे दुहेरीकरण प्रकल्प,
मुंबई-पुणे-नागपूर आणि नाशिक मेट्रो रेल्वे प्रकल्प, घरोघरी पाणी पुरवठा योजनेसाठी
एक हजार १३३ कोटी, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दुष्काळ प्रभावित जिल्ह्यांसाठी १२००
कोटी रुपये आदी प्रकल्पांचा समावेश असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
रेल्वेचे सहा हजार ७२२ किलोमीटरचे ३९ प्रकल्प यंदा अर्थसंकल्पात
प्रस्तावित आहेत, महाराष्ट्रातल्या मनमाड - इंदूर मार्गासाठी नऊ हजार ५४७ कोटी, अहमदनगर
बीड परळी मार्गासाठी ५७२ कोटी, वर्धा नांदेड यवतमाळ ३४७ कोटी, तर सोलापूर तुळजापूर
उस्मानाबाद या मार्गासाठी २० कोटी रुपये प्राथमिक निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात
आली असल्याची माहिती, फडणवीस यांनी दिली.
****
ऊर्जा विभागाच्या नोकर भरतीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या
मागास प्रवर्ग - एसईबीसी उमेदवारांना ऐच्छिक स्वरूपात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
- ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देण्याचा पर्याय उपलब्ध करून देणारा आदेश, ऊर्जा विभागानं
जारी केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे
अध्यक्ष, अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं
या संदर्भात २३ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय जारी केला होता. या शासन निर्णयाच्या
अनुषंगानं ऊर्जा विभागाप्रमाणेच इतर विभागांनीही आदेश जारी करावेत, अशी सूचना आपण कालच्या
मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्याचं, चव्हाण यांनी सांगितलं. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे सकारात्मक असल्याचंही ते म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या
अंतरिम आदेशामुळे प्रभावित झालेल्या उमेदवारांना, सरकारच्या या निर्णयामुळे काही अंशी
दिलासा मिळणार आहे.
****
सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी राज्य महिला
आयोगाची कार्यालयं सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल
जारी करण्यात आला. अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी, यासाठी
हा निर्णय घेण्यात आला आहे. महिला आणि बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त यांनी, राज्य
महिला आयोगाच्या सदस्य सचिवांच्या समन्वयानं, या कार्यालयांचं कामकाज हाताळावं, असे
निर्देश देण्यात आले आहेत. या विभागीय कार्यालयांच्या परिक्षेत्रातील महिलांच्या समस्यांचं
तातडीनं निवारण व्हावं, यासाठी महिलेच्या इच्छेनुसार तज्ज्ञ समुपदेशकाकडून समुपदेशन
केलं जाईल किंवा स्थानिक पोलीस ठाण्यातून सहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल. अतिमहत्वाच्या
गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा आयोगानं स्वाधीकारानं दखल घेण्यासारख्या प्रकरणात
विभागीय कार्यालयांनी राज्य महिला आयोगाच्या सल्ल्यानं कार्यवाही करावी, असंही शासनानं
स्पष्ट केलं आहे.
****
मुंबईतल्या खारघर मधल्या इमारतीत तीन फ्लॅट्स अवैधरित्या
एकत्र केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं सुरु केलेल्या कारवाईविरोधातली याचिका अभिनेत्री
कंगना रनौतनं मागे घेतली आहे. या फ्लॅटमधील बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी पालिकेकडे
रितसर अर्ज करु, अशी माहिती कंगनाच्या वकीलांनी उच्च न्यायालयात दिली. याबाबत पालिकेनं
चार आठवड्यात योग्य तो निर्णय घ्यावा आणि निर्णय विरोधात असल्यास पालिकेनं दोन आठवड्यांपर्यंत
कारवाई करु नये, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
नांदेड इथल्या उर्दू घराचं बांधकाम पूर्ण झालं असून, ते लवकरात
लवकर सुरू करण्याची नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची मागणी, अल्पसंख्याक विकास
मंत्री नवाब मलिक यांनी मान्य केली आहे. या उर्दू घराच्या परिचालनासाठी स्थानिकस्तरावर
उर्दू अकादमी स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही, मलिक यांनी दिली. पंतप्रधान
जन विकास कार्यक्रमाअंतर्गत धनेगाव इथं सद्भावना मंडप बांधकामासाठी प्रस्ताव पाठवण्यात
आला आहे. या कामास चालना देण्यात यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या
१५ कोटी १५ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी औरंगाबाद ग्रामीणच्या
पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. पैठण उपविभागाचे
सहायक पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. याप्रकरणी
तपासात दिरंगाई होत असल्याची तक्रार कृष्णा पाटील डोणगावकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख
यांच्याकडे केली होती.
****
राज्यात काल तीन हजार ४५१ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली,
त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ५२ हजार २५३ झाली आहे. काल
३० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या ५१ हजार ३९० झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५० शतांश टक्के झाला आहे.
तर काल दोन हजार ४२१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ६३
हजार ९४६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ०७ दशांश
टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ३५ हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत
****
मराठवाड्यात काल नांदेड जिल्ह्यात एका कोरोना विषाणू बाधित
रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १७३ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात ४४ नवे रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात
३२, नांदेड आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी २५, लातूर २३, परभणी १२, तर उस्मानाबाद ११,
तर हिंगोली जिल्ह्यात काल एक नवा रुग्ण आढळला.
****
औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल कोविड-19
प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. आरोग्य क्षेत्रात आघाडीवर
काम करणारे आरोग्य अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका, तसंच नोंदणी झालेले इतर सर्व
शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही लस टोचून घ्यावी असं आवाहन, केंद्रेकर यांनी केलं.
****
थोर साहित्यिक, विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त,
नांदेड इथलं नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि रूपवेध ग्रंथालयाच्या नरहर कुरुंदकर दोन
दिवसीय व्याख्यानमालेला कालपासून प्रारंभ झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचं ‘कैफी आझमी : आयडीया ऑफ इंडीयाचा प्रभावी भाष्यकार’
या विषयावर व्याख्यान झालं. त्यापूर्वी लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी
कुरुंदकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. कुरुंदकर यांच्या कन्या
शामल पत्की, साहित्यिक देविदास फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या
पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी, येत्या
मंगळवारी १६ फेब्रुवारीपासून महाविद्यालयं तसंच वसतिगृहे सुरू करण्यास, जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर यांनी परवानगी दिली आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या विनंतीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी
याबाबतचे निर्देश जारी केले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी ताईंनी
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षांना चारा आणि पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. याबाबत
अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –
उस्मानाबाद जिल्ह्यातील
१८९२ अंगणवाडी परिसरातील झाडं झुडपांवर पक्षांना पाण्यासाठी छोटे भांडे, मडके तर खाण्यासाठी
पदार्थ असलेले भांडे लटकवलेले आहेत. पाच वर्ष वयोगटातील बालकांवर निसर्गावर आणि पक्षांवर
प्रेम करण्याचा निसर्गाशी मैत्री करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. उस्मानाबाद
जिल्हा परिषदेचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम इतर जिल्हा परिषदांनी सुध्दा सुरु करण्याची
अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देविदास पाठक,
आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
लातूरमध्ये उभारण्यात येत असलेल्या मराठवाडा रेल्वे बोगी
कारखान्यात, ७० टक्के स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी,
खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी काल लोकसभेत केली. या कारखान्यास लागणारा कच्चा माल,
विशेष कौशल्य याची माहिती दिल्यास, त्यावर आधारित उद्योगांची स्थापना होईल आणि स्थानिक
पातळीवर कुशल कामगार तयार होतील, असं श्रृंगारे यांनी सांगितलं.
****
परभणी शहरात मालमत्ता तसंच पाणी कर थकबाकीदारांना जप्तीच्या
नोटीसा देऊन, उद्यापासून कर वसुली सुरू करण्याचे निर्देश आयुक्त देविदास पवार यांनी
दिले आहेत. ते काल मनपाच्या सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत बोलत होते. आतापर्यंत फक्त
नऊ टक्के वसुली झाली असून, अद्याप ८० कोटी रुपये थकबाकी आहे. मार्च अखेरपर्यंत करवसुलीसाठी
पथकं तयार करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे.
****
दिव्यांग बांधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याची गरज
असून, यासाठी प्रबोधन व्हायला हवं, असं मत आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.
लातूर पंचायत समितीत सामाजिक अधिकारिता शिबिराचं उद्घाटन आमदार देशमुख यांच्या हस्ते
झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग नागरिकांना सायकलसह इतर आवश्यक उपकरणांचं
वाटप करण्यात आलं.
****
एटीएम कार्डचं क्लोनिंग करुन बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या
बिहारच्या टोळीला बीड पोलिसांनी काल अटक केली. या टोळीकडून ७४ एटीएम कार्डसह, सात लाख
१५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बीड शहरातल्या पंचशील नगर भागात राहणाऱ्या
एका इसमाच्या बँक खात्यातून ८० हजार रुपये लंपास करण्यात आले होते, याप्रकरणाचा सायबर
विभागानं तपास केल्यास, या टोळीला पकडण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथल्या नगर परिषदेच्या उद्यानात
काल दुपारी अचानक आग लागली. उद्यानातलं बालकांचं खेळण्याचं साहित्य आणि इतर वस्तू या
आगीत भस्मसात झाल्या.
****
लातूर इथं मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे संस्थापक सेठ
पुरणमलजी लाहोटी यांच्या स्मृतीदिनानिमित्त संस्थेतल्या विद्यार्थ्यांसाठी भव्य मॅरेथॉन
स्पर्धा घेण्यात आली. ५ किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी झाले.
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीसं तसंच प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात
आला.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथले अनिल पडुळकर यांनी शेतमाल
तसंच दूध वाहतुकीसाठी दुचाकीला जोडता येणारी ट्रॉली तयार केली आहे. ही ट्रॉली शेतकरी
तसंच पशुपालकांमध्ये लोकप्रिय होत आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर
–
शेतातील भाजीपाला
अन्य वाहनाने शहरात आणणे शेतकऱ्यांना खर्चिक जाऊ लागले. त्यातच शेतकरी स्वतःच्या दुचाकीला
ट्रॉली जोडून भाजीपाला, दूध शहरात घेऊन आल्यास खर्च कमी होऊ लागला. या संदर्भात अनिल
पडुळकर म्हणाले, “मी मोटरसायकल ॲटॅच असे मोटरसायकल ट्रॉली बनवलेली आहे. त्या टॉलीची
क्षमता ३०० किलोची आहे. आणि सहजरित्या एक माणूस त्या मोटरसायकलच्या द्वारे एका जागेवरून
दुसऱ्या जागेवर माल नेण्यासाठी कमीत कमी खर्चामधे ही ट्रॉली बनलेली आहे. ही कल्पना
शेतकऱ्यांना आवडलेली आहे. आणि शेतकऱ्यांची मागणीपण वाढलेली आहे.” अनिल पडुळकर यांनी
केलेली ही ट्रॉली शेतकऱ्यांना निश्चितच वरदान ठरेल.
आकाशवाणी बातम्यांसाठी,
परभणीहून विनोद कापसीकर
****
लोअर दुधना प्रकल्पातून शेती तसंच पिण्यासाठी पाणी सोडण्याची
मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली आहे. पाण्याअभावी शेतीचे मोठं नुकसान होत असून,
पिण्याच्या पाण्याअभावी नागरिक तसंच जनावरांचे हाल होत असल्याचं, पाटील यांनी काल औरंगाबाद
लाभक्षेत्र विकास विभागाचे मुख्य अभियंता तसंच मुख्य प्रशासकांना दिलेल्या निवेदनात
म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment