आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
दिनांक ३१ मार्च २०२१
****
औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्रीपासून
लागू होणारी टाळेबंदी स्थगित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी ही
घोषणा केली. टाळेबंदीच्या नियमात राज्यस्तरावरुन काही बदल करण्यात आले असून, या बदलाची
सूचना मिळेपर्यंत प्रधान सचिव आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार टाळेबंदी रद्द
करत असल्याचं ते म्हणाले. जिल्ह्यात अंशत: टाळेबंदीचे नियम कायम राहणार आहेत. त्यामुळे
रात्री आठ वाजेपर्यंतच दुकानं सुरु ठेवता येतील.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार २१० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८८ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या
४३, नांदेड जिल्ह्यातल्या २०, परभणी नऊ,
जालना आठ, लातूर पाच, हिंगोली दोन तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार
११६ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९५०,
लातूर ५५७, जालना ४२४, परभणी ३७९, बीड ३१८, उस्मानाबाद २४२, तर हिंगोली
जिल्ह्यात २२४ रुग्ण आढळून आले.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर शहरात हेरिटेज पोल पथदिव्यांसाठी सुमारे ५० लाख रुपये निधीला
प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र
सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत हे पथदिवे बसवण्यात येणार आहेत
****
परभणी महानगरपालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा १२३ कोटी १० लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प
काल मंजूर झाला. महापौर अनिता सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण
सभेनं या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.
****
परभणी इथलं कोषागार कार्यालय तसंच उपकोषागार कार्यालये आज आर्थिक वर्षाच्या अखेरच्या
दिवशी अंतर्गत कामकाजासाठी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, भारतीय स्टेट बँकेच्या
परभणी तसंच शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या सर्व शाखा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असतील.
जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांनी सर्व अधिकाऱ्यांसाठी ही सूचना जारी केली
आहे.
****
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ
भालके, भाजपाचे समाधान आवताडे यांच्यासह ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या अर्जांची
आज छाननी होणार आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकी साठी १७ एप्रिलला मतदान
होणार आहे.
****
No comments:
Post a Comment