Monday, 29 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 March 2021 Time 7.10am to 7.25am Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 March 2021

Time 7.10am to 7.25am

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक२९ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.

****

** कोविड निर्बंधांचं काटेकोर पालन होत नसल्यानं, मर्यादित काळासाठी टाळेबंदीचं नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

** उस्मानाबाद जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत विविध निर्बंध लागू

** राज्यात नवे ४० हजार ४१४ कोविडग्रस्त; मराठवाड्यात ६३ रुग्णांचा मृत्यू तर नव्या चार हजार ९०५ रुग्णांची नोंद

** स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवीन संकल्प पूर्तिचा प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

** ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांचं निधन

आणि

** तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला हरवत भारताचा मालिका विजय

****

राज्यात कोविड निर्बंधांचं काटेकोर पालन होत नसल्यानं, मर्यादित काळासाठी टाळेबंदीबाबत नियोजन करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. कोविड संसर्गा संदर्भातल्या कृती दलाची काल मुंबईत तातडीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं होणाऱ्या वाढीमुळे, रुग्णखाटा आणि इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून, मर्यादित काळासाठी ही टाळेबंदी असावी, असं नमूद केलं. या परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरू राहील याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे, मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्यानं घेत नसल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचं पालन होत नाही, तसंच विवाह समारंभात, बाजारपेठांमध्येही नियमांचं पालन होताना दिसत नसल्याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा, यांचं नियोजन करण्याचे निर्देशही, त्यांनी मुख्य सचिवांना दिले. प्राणवायू उत्पादन ८० टक्के वैद्यकीय, आणि २० टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवावं, रुग्णालयांतल्या खाटांच्या बाबतीत ८०:२० प्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही तसंच रुग्णांची गैरसोय होणार नाही, हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

**** 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धुलिवंदनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, होळीचा सण काल पारंपरिक पद्धतीनं मात्र कोविडचे नियम पाळून साजरा झाला. नागरिकांनी एकत्र येण्याचं टाळून आपापल्या अंगणातच छोट्या होळीचं दहन केल्याचं, अनेक ठिकाणी पहायला मिळालं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोविड सुश्रुषा केंद्रांतल्या सुविधा, ऑक्सिजन उपलब्धता, तसंच, रुग्णखाटांची संख्या तातडीनं वाढवण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्ह्यात टाळेबंदीची अंमलबजावणी तसंच ग्रामीण भागातील सेरो सर्वेक्षणाबाबत, काल दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागात विशेषत: आठवडी बाजार भरणाऱ्या गावांमध्ये लसीकरणावर अधिक भर द्यावा, २५ पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावात सर्वांच्याच तातडीने चाचण्या कराव्यात, संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावं, आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

****

लातूर महापालिकेनं शहरात ज्या भागात कोविड रुग्ण संख्या वाढत आहे त्या ठिकाणी, फिरती चाचणी केंद्रं तयार केली आहेत. बाधित रुग्णांच्या घरी जाऊन रुग्णाच्या कुटुंबातल्या इतरांची तातडीनं तपासणी केली जात आहे. व्यापाऱ्यांसाठी उभारलेल्या कोविड तपासणी केंद्रांची मुदत वाढवून देण्यात येणार असल्याची माहिती, महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली, ते म्हणाले..

 

लातूर शहरातील व्यापारी त्यांचे कर्मचारी आणि त्यांच्या संबंधितांची मोफत कोरोना तपासणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याला उत्तम प्रतिसाद व्यापाऱ्यांनी दिला. परंतू अजूनही व्यापाऱ्यांची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची तपासणी झालेली नाही. माझी आपल्या माध्यमातून विनंती राहणार आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ही तपासणी करावी. आपण चार केंद्र याकरीता उपलब्ध केलेले आहेत. आणि या चारही केंद्रांवर मोफत तपासणी केलेली आहे. प्रत्येक व्यापाराची कोरोना तपासणी होईपर्यंत आपण हा उपक्रम चालू ठेवणार आहोत.

****

नांदेड जिल्ह्यात कोविडबाधितांची संख्या आगामी दहा दिवसात नियंत्रणात आणण्याचं आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असल्याचं, जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी म्हटलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमातून नागरिकांशी बोलत होते. नागरिकांनी कोविडची सौम्य लक्षण दिसून आली तरीही, तत्काळ तपासणी करून घेत, लवकर उपचार सुरू करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

 

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी, कर्मचारी वर्गाला कोविड तपासण्या करून घेण्यास पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. योग्य वेळी निदान झालं, तर कोविड हमखास बरा होतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या...

कोविड पूर्णपणे बरा होतो. स्वानुभावावरुन मी सांगते. फक्त गरज आहे लवकर टेस्ट करण्याची स्वत: प्रती सजग राहण्याची तर चला तर यांच्याशी दोन होत करुया आणि सर्वच जण याबद्दल कटीबद्ध राहुया.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले. जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं, मंगल कार्यालय, आठवडी बाजार, चहाची दुकानं, पान टपऱ्या, खाजगी शिकवण्या, वसतीगृहं, क्रीडांगणे, जिम आणि व्यायामशाळा १५ एप्रिलपर्यंत बंद राहतील. तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिरात दररोज सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत, पाच हजार भाविकांना मास्क घालूनच प्रवेश दिला जाणार आहे. विना मास्क आढळणाऱ्या नागरिकाला पाचशे रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे..

****

राज्यात काल ४० हजार ४१४ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २७ लाख १३ हजार ८७५ झाली आहे. काल १०८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५४ हजार १८१ झाली असून, मृत्यूदर दोन टक्के झाला आहे. काल १७ हजार ८७४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २३ लाख ३२ हजार ४५३ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८५ पूर्णांक ९५ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख २५ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या चार हजार ९०५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ६३ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २३, नांदेड जिल्ह्यातल्या १८, परभणी १०, आणि जालना जिल्ह्यात सहा, बीड जिल्ह्यात तीन, लातूर दोन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल १ हजार ३९९ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ३१०, लातूर ४९०, जालना ४७४, परभणी ६८४, बीड २८४, उस्मानाबाद १८४, तर हिंगोली जिल्ह्यात ८० नवे रुग्ण आढळून आले.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काहीतरी नवीन संकल्प करून तो पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु या, असं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल आकाशवाणीवरुन, `मन की बात` या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत होते. कोविडची लस आली असली तरीही सर्वांनी कोविड प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. शिक्षण, क्रीडा, उद्योजकता, आणि सशस्त्र दलासह, विज्ञान आणि तंत्रज्ञानांपर्यंत सर्व क्षेत्रांमधे, देशातल्या मुली उत्तम कामगिरी करत असल्याबद्दल, पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. १४ एप्रिल, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, आपल्या घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांचं स्मरण करुन देते, आपल्या कर्तव्यांचा संकल्प करून बाबासाहेबांना आदरांजली वाहूया, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं

****

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांचं काल औरंगाबाद इथं हृदयविकाच्या धक्क्यानं निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतलेल्या नाथरावांनी, औरंगाबाद इथं सरस्वती भुवन महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख म्हणून, जबाबदारी सांभाळली, उत्तम शिष्यवर्ग तयार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगीत विभाग उभारण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह, राज्य शासनाचा कलादान पुरस्कार, २००२ सालचा औरंगाबाद भूषण पुरस्कार, अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. काल सायंकाळी औरंगाबाद इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

नाथरावांच्या निधनानं मराठवाड्याच्या संगीत क्षेत्राचा आधारवड हरवल्याची भावना, संगीत रसिकांमधून व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंडित नेरळकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नाथरावांनी मराठवाड्यात संगीत प्रसाराचं केलेलं काम कधीही विसरता येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या शोक संदेशात, मराठवाड्यातला संगीत क्षेत्राचा सूर अबोल झाला, या शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे.

औरंगाबाद इथले शास्त्रीय संगीताचे अभ्यासक गुरु सचिन नेवपूरकर यांनी आपल्या गुरुजींना या शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली.

 

एक उत्तम गायक, उत्तम रचनाकार आणि उत्तम गुरु केवळ शास्त्रीय संगीतच नव्हे तर मराठी नाट्यसंगीत, गझल, अभंग, भजन, ठुमरी अशा विविध गीत प्रकारांवर त्यांचं प्रभुत्व होतं. शास्त्रीय संगतीमध्ये त्यांनी अनेक बंदीशी रचले आहेत.अनेक मराठी, उर्दु गझलांनी त्यांनी चाली रचल्या. अभंग, भजन यांना देखील त्यांनी चाली दिलेल्या आहेत.गुरु म्हणून तर त्यांचं कार्य फार मोठं आहे. अनेक पिढ्यांना त्यांनी संगीताचं केवळ ज्ञानच दिलं नाही तर ते संस्कारीत सुद्धा केलं. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्राची जी काही हानी झालेली आहे. ती भरुन निघने केवळ अशक्य आहे. त्यांना माझी  भावपूर्ण श्रद्धांजली..

****

नांदेड इथल्या प्रतिभानिकेतन महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य हर महेंद्रसिंघ यांच काल निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यात ते नेहमी सक्रीय असत.

****

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला हरवत भारतानं एकदिवसीय सामन्यांची मालिका दोन एक अशा फरकानं जिंकली. काल पुण्यात झालेल्या तिसऱ्या रोमांचक सामन्यात भारतानं इंग्लंडला सात धावांनी पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं दिलेलं ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, इंग्लंड संघ ९ गड्यांच्या बदल्यात ३२२ धावाच करू शकला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात शेवटच्या दोन षटकांत हार्दिक पांड्या आणि टी नटराजनच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताचा विजय साध्य झाला.

****

लातूर जिल्ह्यात महावितरणकडून सक्तीने वीज देयकं वसुली आणि वीज खंडीत केली जात असल्याच्या निषेधार्थ, शेतकरी संघटनेकडून औसा तालुक्यात हिप्परसोगा इथं, वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला स्थानबद्ध केलं. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवला नाही, तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यात अशाच प्रकारचं आंदोलन करण्याचा, इशाराही शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख मदन सोमवंशी यांनी दिला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांप्रमाणे संपूर्ण बाजारपेठेला दुपारी बारा वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सकारात्मकता दर्शवल्याचं, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितलं आहे, काळे यांच्यासह एका शिष्टमंडळानं काल जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन, त्यांना व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे.

//**************//

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments: