Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 March 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा
एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत
आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक
वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ
उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा,
वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** सुधारित कृषी कायद्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने
नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून अहवाल सादर
** राज्यात वाढता कोविड संसर्ग पाहता, निर्बंध अधिक कडक
करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत
** कोविड प्रतिबंधात्मक
नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबादचे
खासदार इम्तियाज जलील यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल
आणि
** औरंगाबाद जिल्ह्यात आज पाच कोविडग्रस्तांचा मृत्यू; बीड जिल्ह्यात नवे ३२५ रुग्ण
****
केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांसंदर्भात सर्वोच्च
न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आपला अहवाल बंद लिफाफ्यामध्ये न्यायालयाला सादर
केला आहे. हे कायदे रद्द करण्याची मागणी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी
केली होती. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने
११ जानेवारी रोजी समिती स्थापन केली होती. या समितीने १८ राज्यांमधल्या शेतकऱ्यांची
मतं जाणून घेत, देशभरातल्या ८५ शेतकरी संघटनांशी चर्चा केल्यानंतर, हा अहवाल न्यायालयाकडे
सादर केला आहे.
****
राज्यात वाढता कोविड संसर्ग पाहता, अधिक कडक निर्बंधांचं
नियोजन करत असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते मुंबईत पत्रकार
परिषदेत बोलत होते. सध्या टाळेबंदी लावण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, नियम पाळा
आणि लॉकडाऊन टाळा, असं आवाहन टोपे यांनी केलं.
लॉकडाऊनच्या बाबतीत असा कुठलाही निर्णय झालेला नाही.आपले
जे निर्बंध जे आहेत ते निश्चितपणाने अधिक कडक होण्याच्या दृष्टीकोनातूनचे पावलं राज्य
शासनान उचलणारच आहे. आणि त्यामुळे गर्दी निर्माण होणारे जे जे ठिकाणे आहेत.त्या सर्व
ठिकाणांमध्ये आपल्याला अधिक कडक निर्बंध लावण्याच्या दृष्टीकोनातून आपण काही नियोजन
करत आहोत. नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा…
****
औरंगाबादचे खासदार
इम्तियाज जलील यांच्यासह ११ जणांविरोधात कोविड प्रतिबंधात्मक
नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. जलील आणि त्यांच्या समर्थकांनी रात्रीच्या टाळेबंदीचं उल्लंघन केलं असून, या सर्व
प्रकरणात त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २६९, आणि १४२ तसंच कोविड
विनिमय कलम ११ अन्वये गुन्हा दाखल केल्याचं पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितलं.
जिल्हाधिकाऱ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात प्रस्तावित टाळेबंदी
रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जलील यांच्या निवासस्थानी त्यांचे समर्थक मोठ्या
संख्येने जमा झाले होते, या समर्थकांनी जलील यांच्यासह मिरवणूक काढल्याच्या चित्रफिती
सामाजिक संपर्क माध्यमावरून प्रसारित झाल्या आहेत.
या प्रकरणी
जलील यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी
आज पोलिस प्रशासनाला याबाबतचं निवेदन सादर केलं.
या जल्लोष मिरवणुकीत रात्री आठ वाजेनंतर लागू संचारबंदीचं आणि कोविड
प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन झालं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी खुलासा करताना, खासदार जलील यांनी,
ही गर्दी आपण बोलावलेली नाही. मात्र तरीही पोलिस प्रशासन जी कारवाई करेल, त्याला सहकार्याची
आपली भूमिका असेल, असं सांगितलं. ते म्हणाले...
मेरे बारे में जो
कहां जा रहां है की, मैने मास्क नहीं लगाया था मैने भीड इकठा किया था. मै साफ बता दूं
मैनें कल कोई अपने तरफसे भीड इकठा नहीं किया था. लोग खुद खुशी का इजहार करने यहां पर
आये थे. लेकिन हां अगर मतलब वो व्हिडियो वायरल हुआ है जिसमें में मास्क नही लगाया हुं
तो पोलीस में जो भी कारवाई होनी चाहीये कानुन के हिसाब से जो दुसरे आम लोगोंपर करते
है. वह मुझपर करना चाहिए ऐसा नहीं है के मुझपर कोई अलग कानून है करके.
****
परभणी जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम युध्दपातळीवर राबवण्याबाबत
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी आज बैठक घेतली. या
बैठकीस आमदार सुरेश वरपुडकर, उपमहापौर भगवान वाघमारे यांच्यासह महापालिका सदस्य उपस्थित
होते. शहरासह जिल्ह्यात प्रशासनाने यापुढे टाळेबंदी लावू नये, अशी मागणी या बैठकीत
उपस्थित सदस्यांनी केली. शहरातल्या खासगी दवाखान्याकडून रुग्णांची लूट होत असल्याच्या
तक्रारीही सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या. जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी या सर्व
प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं
****
विशाखा समितीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी कृती दल नेमणार
असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. कामाच्या ठिकाणी
महिलांची छळवणूक, अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीसंदर्भात आज मंत्रालयात
झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची चौकीशी करण्यासाठी
सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर तक्रार समिती गठित करण्यात आली आहे. प्रत्येक
जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी यांनी या नियोजनासाठी एक समन्वय अधिकारी निवडावा तसंच लैंगिक
छळाच्या तक्रारी प्राप्त करुन संबंधित स्थानिक तक्रार समितीकडे पाठवाव्यात, असे निर्देश
ठाकूर यांनी दिले
****
मराठवाडा विभागाचे
माहिती संचालक गणेश रामदासी यांची माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक म्हणून
पदोन्नती झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २००१ मध्ये उपसंचालकपदी निवड झाल्यानंतर
त्यांची प्रथम नियुक्ती दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राचे प्रमुखपदी झाली होती.
प्रसारभारतीमध्ये संचालक या पदावर त्यांची केंद्रशासनामध्ये सुमारे चार वर्षे प्रतिनियुक्ती
होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यात
आज पाच कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला रुग्णांचा समावेश
आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार ६५७ झाली
आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज ७१ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. त्यामुळे
जिल्ह्यातल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या आता ८१ हजार १३७ झाली आहे.
****
बीड जिल्ह्यात आज
३२५ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. यामध्ये बीड ९८, अंबाजोगाई ५०, परळी ४१, आष्टी
३४, पाटोदा २४, गेवराई आणि केज प्रत्येकी २१, माजलगाव २०, शिरुर सात, वडवणी पाच आणि
धारुर इथल्या चार रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या
आता २५ हजार ५०४ झाली आहे.
****
लातूर शहर अधिक स्वच्छ तसंच सुंदर करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं विविध वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच
एक भाग म्हणून आता बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर पालिकेच्या वतीनं ओला तसंच सुका
कचरा टाकण्यासाठी कचरापेट्या बसवण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती
देत आहेत, आमचे वार्ताहर, अरुण समुद्रे....
शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये
बाजारपेठेत नागरिकांनी कचरा टाकू नये. यासाठी पालिकेकडून जनजागृती केली जात आहे. व्यापारी
व्यावसायिक नागरिकांनी आपल्याकडे जमा झालेला कचरा डस्टबिनमध्ये टाकावा. कचरा टाकतांनी
ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्यासाठी दोन ठिकाणी दोन डस्टबिन उपलब्ध करुन दिल्या
आहेत.त्या डस्टबिनमध्येच कचरा टाकावं असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं
आहे. अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर
****
केंद्र शासनाने जी. एम. - जनुक सुधारित वांग्यांच्या
चाचण्यांवर बंदी घातली आहे. हे तंत्रज्ञान इतके घातक असेल तर औषध उद्योगात या तंत्रज्ञानाच्या वापरावर
बंदी का नाही असा सवाल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे. शासनाने बंदी घातली तरीही लाखो हेक्टरवर तणरोधक कपाशीची लागवड
होत आहे तसंच हजारो हेक्टरवर बी.टी. वांग्याची सुद्धा लागवड झालेली असल्याचं घनवट यांनी सांगितलं
आहे.
****
लातूर इथल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे उप-प्राचार्य तथा वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख सदाशिव शिंदे यांना महात्मा ज्योतिराव
फुले शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय ‘शिक्षकरत्न’पुरस्कार प्रदान करण्यात आला.
//*****************//
No comments:
Post a Comment