Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 March 2021
Time 7.10am to 7.25am
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २७ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा
एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत
आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक
वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ
उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा,
वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर
नियंत्रणासह मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
** राज्यभरात उद्यापासून रात्रीची जमावबंदी
लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना
** राज्यात
नवे ३६ हजार ९०२ कोविडग्रस्त; मराठवाड्यात ५७ रुग्णांचा मृत्यू तर
नव्या चार हजार ५९७ रुग्णांची नोंद
** हिंगोली जिल्ह्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात
पूर्ण निर्बंध; लातूर तसंच बीड जिल्ह्यात चार एप्रिल पर्यंत टाळेबंदी लागू
** कृषी कायद्यांच्या विरोधात पुकारलेल्या
बंदला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद
** लग्नाचा बनाव करून पैसे लुटणाऱ्या चौकडीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून अटक
आणि
** जागतिक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या
तेजस्विनी सावंतला सुवर्णपदक
****
आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्य
तसंच केंद्रशासित प्रदेशांनी गर्दीवर नियंत्रण ठेवावं तसंच कोविड संदर्भात मार्गदर्शक
सूचनांचं पालन करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला
यांनी, राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात होळी-धुलिवंदन, शब-ए-बारात, तसंच
ईस्टर संडे या सणांच्या अनुषंगानं सर्व जिल्हा प्रशासनांनी तसंच पोलिस विभागानं खबरदारी
घ्यावी, तसंच नागरिकांच्या जागरुकतेसाठी अभियान राबवण्यास सांगितलं आहे. नागरिकांनी
मास्कचा योग्य वापर करावा, तसंच शारीरिक अंतराचा नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलं
आहे.
****
संपूर्ण राज्यभरात उद्यापासून रात्रीची जमावबंदी
लावण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सर्व
विभागीय आयुक्त, आणि प्रशासकीय यंत्रणेशी संवाद साधून कोविड स्थितीसंदर्भात आढावा घेतल्यानंतर
हे निर्देश दिले. जनतेने कोविडचे नियम पाळले नाहीत, तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत
अधिक कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान, राज्यात
५२ लाख लोकांना आतापर्यंत कोविड लस देण्यात आली असून, सध्या देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्र
पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
राज्यात काल ३६ हजार ९०२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे
राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २६ लाख ३७ हजार ७३५ झाली आहे. काल ११२ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या,
५३ हजार ९०७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक चार दशांश टक्के झाला आहे. काल १७ हजार
१९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २३ लाख ५६ रुग्ण, कोरोना विषाणू
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८७ पूर्णांक दोन दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
दोन लाख ८२ हजार ४५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार ५९७ कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५७ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६,
नांदेड जिल्ह्यातल्या १४, परभणी सहा, जालना पाच, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ७८७ रुग्ण आढळले.
नांदेड जिल्ह्यात ९७०, लातूर ५३८, जालना ४१५, बीड ३८३, परभणी २६३,
उस्मानाबाद १५५, तर हिंगोली जिल्ह्यात १८६
नवे रुग्ण आढळून आले.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रातली
सर्व दुकानं तसंच नागरिकांच्या व्यवहारांवर पूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत. कळमनुरी
तालुक्यातल्या आखाडा बाळापूर, वारंगा या बाजारपेठेच्या ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात
आला. नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी नियमांचं पालन करण्याचं तसंच लसीकरण
करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केलं आहे.
शासनानी
जे ६० वर्षाच्या वरचे आणि ४५ च्या वरचे जे लोकं ज्यांना काहीतरी पुर्वीपासून काही आजार
असेल अशा लोकांना जे व्हॅक्सीनेशनची जे सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्या सुविधाचा
जास्तीत जास्त वापर करायचा आहे.कारण आतापर्यंतचा आमचा जो अनुभव आहे की जरी व्हॅक्सीनेशन
केल्यानंतर जरी कोविड झाला की कोणाला पण मृत्यू होत नाही. म्हणजे व्हॅक्सीनेशन जर केला
आणि त्याचे दोन्ही डोस घेतले.आणि व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये गॅप ठेवला तर कोविडमुळे
स्वत:च्या जीवाला जो धोका असतो तो जवळपास १०० टक्के खत्म होवून जातो.
****
औरंगाबाद जिल्ह्यात नागरिकांनी आगामी सण उत्सवांच्या
काळात एकत्र न येता, शारीरिक अंतराच्या नियमाचं पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी केलं आहे. चव्हाण यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमातून जनतेशी संवाद
साधला. त्यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले...
हा लढा आपला रोगाशी आहे. मग या रोगाशी लढा देत असतांना चांगल्या प्रकारचे प्रोटोकॉल
म्हणजे लोकांनी नाही एकत्र येणे हे पाळणे गरजेचं आहे. म्हणून आम्ही कुठलेही फेस्टीवल
या काळात होवू नये अशी जिल्हा प्रशासनाची आणि राज्यशासनाची भुमिका राहील.याच्यामुळे
आपण ज्या उपाय योजना करतो आहे. तुम्ही जे आम्हाला साथ देत आहेत. आपल्याला लोकं या कोविडमधून
बाहेर आणयचे आहेत आणि असे फेस्टीवल जर केले आपण तर पुन्हा लोकं एकत्र येतील, संसर्ग
होण्याचं प्रमाण वाढेल आणि म्हणून रिक्वेस्ट करतो आपल्याला की आपण मला टेस्टींगसाठी
मदत करा, माझे माणसं आयएल आणि सारीच्या सर्वेक्षणासाठी आल्यानंतर त्यांना मदत करा,
आणि आपल्या घरात ४५ प्लस कोणी असेल किंवा ६०
प्लस कोणी असेल तर त्यांना व्हॅक्सीनेशन सेंटर पर्यंत घेवून जा
****
लातूर जिल्ह्यात कोविड प्रतिबंधासाठी आजपासून ४ एप्रिलपर्यंत
कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
यांनी याबाबतचे आदेश जारी केले. जिल्ह्यातले सर्व जिम, व्यायामशाळा, क्रीडांगणं, जलतरण तलाव, उद्यानं, पानटपरी, चहाटपरी, मंगल कार्यालये,
चित्रपट तसंच नाट्यगृहं, सभागृहं बंद राहतील. उपाहारगृहांना फक्त पार्सल सुविधा देता
येणार आहे. होळी, धुलीवंदन, रंगपंचमी, हे सण आपल्या कुटुंबात साजरे
करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
****
बीड जिल्ह्यात कालपासून चार एप्रिल पर्यंत
टाळेबंदी लागू झाली. काल पहिल्या दिवशी नागरिकांनी टाळेबंदीचं काटेकोरपणे पालन केल्याचं
दिसून आलं.
****
नांदेड जिल्ह्यात कोविड-19 च्या रुग्णांसाठी
पुरेशा रुग्णखाटा उपलब्ध असल्याचं, जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी स्पष्ट केलं
आहे. काल रुग्णालयांची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सौम्य लक्षणं असलेल्या
रुग्णांनी गृहविलगीकरणात राहून उपचार घ्यावेत, सौम्य लक्षणं आढळून आली तरी कोविड तपासणी
करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.
दरम्यान, डॉ. शंकरराव चव्हाण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण
विभागात “कोविड-19 चौकशी कक्ष” सुरु करण्यात आला आहे. २४ तास कार्यरत राहणाऱ्या
या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02462-22 92 21 असा आहे. रुग्णालयात
कोविड रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत किंवा नाही याची माहिती, या कक्षातून दिली जाईल.
****
जालना जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन लावण्याबाबत
कुठलाही निर्णय झालेला नाही, असं जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केलं आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित अंतराचे नियम पाळावेत, मास्कचा
वापर करावा, असं आवाहन बिनवडे यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढती
संख्या पाहता, जिल्ह्यातल्या ११ खासगी रुग्णालयांचं अधिग्रहण करुन २२३ रुग्णखाटा कोविड
रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल
याबाबतचे आदेश जारी केले.
****
परभणी शहरात स्टेशन रोडवर जिल्हा परिषदेच्या
नूतन इमारतीमध्ये कोविड सुश्रुषा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. काल या केंद्रात पाच
कोविडग्रस्तांवर उपचार सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बाळासाहेब
नागरगोजे यांनी दिली. सर्व सोयींनीयुक्त २०० रुग्ण खाटांच्या या केंद्रात ५०० रुग्णखाटापर्यंत
नियोजन करता येईल, असं डॉ नागरगोजे यांनी सांगितलं.
****
मुंबईतल्या भांडूप इथं कोविड रुग्णालयाला
लागलेल्या आगीत दगावलेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राज्यभरात
ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयं सुरु आहेत,
त्या ठिकाणच्या अग्निसुरक्षेची तत्काळ तपासणी करण्याचे निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. काल पहाटे झालेल्या या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला.
****
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी
पुकारण्यात आलेल्या बंदला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. लातूर इथं काँग्रेस
भवनासमोर पक्षातर्फे एकदिवसीय उपोषण करत केंद्र सरकारच्या निर्णयांचा विरोध करण्यात
आला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे आणि आमदार धीरज देशमुख यांच्या
उपस्थितीत उपोषण करण्यात आलं, तर उस्मानाबाद इथं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी
मंत्री रमेश बागडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात
आलं.
****
लग्नाचा बनाव करून पैसे लुटणाऱ्या चौकडीला औरंगाबाद ग्रामीण
पोलिसांनी अटक केली. या टोळीची मुख्य सूत्रधार आशा खडसे हिच्या चौकशीतून एकाच महिलेचा
अनेकांशी बनावट विवाह केल्याचं समोर आलं. सदर महिलेच्या सात बनावट आधारकार्डसह आरोपींकडून
७ मोबाईल, एक इंडिका कार असा सुमारे साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या टोळीने नाशिक, जळगाव, औरंगाबादसह गुजरात राज्यातही अशी फसवणूक केल्याचं समोर आलं
आहे.
****
जागतिक नेमबाजी क्रीडा महासंघ -आयएसएसएफच्या नवी दिल्लीत सुरू
असलेल्या वर्ल्डकप-२०२१ च्या विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंत हिने सुवर्णपदक पटकावलं आहे. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिक्स्ड टीम इव्हेंट प्रकारात तेजस्विनी सावंत
आणि संजीव राजपूत या दोघांनी सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स टीम इव्हेंटमध्येही
भारतानं सुवर्णपदक पटकावलं. स्पर्धेत १२ सुवर्ण पदकांसह २५ पदकं पटकावत भारत पदकतालिकेत
पहिल्या क्रमांकावर आहे.
****
क्रिकेट
पुणे इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट
सामन्यात इंग्लंड संघानं भारतीय संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी
करत, पाहुण्या संघासमोर ३३७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, इंग्लंड संघानं ४४ व्या षटकांत
चार गड्यांच्या बदल्यात हे लक्ष्य साध्य केलं. मालिकेत दोन्ही संघ आता १-१ ने बरोबरीत
असून, तिसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातल्या
हिप्परगा इथल्या राष्ट्रीय शाळेला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे
नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आठवणी जागवणाऱ्या या शाळेला जिल्हाधिकारी कौस्तुभ
दिवेगावकर यांनी काल भेट देऊन, शाळेच्या परिसरात स्मारक कशा स्वरूपात उभारता येईल,
याबाबत संबंधितांशी चर्चा केली. या स्मारकाबाबत नागरिकांनी सूचना कराव्यात, असं आवाहन
जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केलं आहे.
****
लातूर शहरात प्रमुख रस्ते तसंच चौकांमध्ये
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ही माहिती
दिली. यासाठी ८२ लाख रुपये खर्च येणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत या खर्चाला मान्यता दिली आहे.
****
नांदेड इथले लोककलावंत गणेश वनसागर यांचं
काल पहाटे कोविड संसर्गानं निधन झालं. ते ५० वर्षांचे होते.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या कासारशिरसी
इथले डॉ. मनोहरराव पाटील यांचं काल दुर्धर आजाराने निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते.
//**********//
No comments:
Post a Comment