Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
26 March 2021
Time
1.00pm to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २६ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, नागरीकांनी
नियमांचं पालन केलं नाही तर पूर्णत: टाळेबंदी लागू करावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी
सुनिल चव्हाण यांनी दिला आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधत
होते. नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करुन कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न
करावा, असं आवाहन त्यांनी केलं. आजुबाजुच्या जिल्ह्यांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात
आली असून, औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं मात्र आतापर्यंत टाळेबंदीची वेळ येऊ दिली नाही,
असं ते म्हणाले. मास्क वापरणं, सुरक्षित अंतर राखणं, आणि सॅनिटायझर वापरणं, या कोविड
प्रतिबंधाच्या नियमांचं पालन करावं, जिल्ह्यात लसीकरण योग्य रित्या सुरु असून, नागरीकांनी
लसीकरण करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यातले अनेक रुग्ण
हे लक्षणं नसलेले असल्यानं रुग्णखाटांची कमतरता नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. रुग्णाच्या
तब्येतीनुसार रुग्णालयात भरती करण्याची प्रक्रिया राबवणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी
सांगितलं.
****
नांदेड शहरात महापालिकेच्या शिवाजीनगर, जंगमवाडी, पौर्णिमानगर,
विनायकनगर, हैदरबाग आणि सिडको या सहा रुग्णालयातून, सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळात
कोविड-19 लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. पात्र नागरिकांनी कोविड लस घेऊन सुरक्षीत व्हावं,
असं आवाहन महानगर पालिकेचे आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी केलं आहे.
दरम्यान, नांदेड महापालिकेच्या आरोग्य विभागानं १५ दवाखान्यात
कोरोना तपासणी केंद्रं सुरू केले आहेत.
****
मुंबईत भांडूपमध्ये काल मध्यरात्री सनराईज या खासगी कोविड रुग्णालयाला
आग लागली. यात दहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे.
जखमींची संख्या अजून स्पष्ट झाली नसल्याचं अग्निशमन विभागानं कळवलं आहे. या रुग्णालयातल्या
७३ रुग्णांना जवळच्या खासगी आणि सरकारी कोविड रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अग्निशमन
दलाचे सुमारे २५ बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
सुरू आहेत.
****
देशभरात कोविड लसीच्या आत्तापर्यंत पाच कोटी ४६ लाख मात्रा देण्यात
आल्या आहेत. यामध्ये ८० लाखांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीची पहिली मात्रा
देण्यात आली आहे, तर ५१ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. ८५
लाखांहून जास्त आघाडीवरील कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा तर ३५ लाख कर्मचाऱ्यांना दुसरी
मात्रा देण्यात आली आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या ४२ लाख नागरिकांना तर अन्य
आजार असलेल्या ४५ वर्ष आणि त्यावरील वयोगटाच्या ५४ लाख ३१ हजार नागरीकांचही लसीकरण
झालं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
सैन्य दलातल्या महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या
नियमांचा पुनर्विचार करावा, एका महिन्याच्या आत यावर निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च
न्यायालयानं दिले आहेत. हा आदेश देण्याबरोबरच न्यायालयानं वार्षिक अहवाल आणि मेडिकल
फिटनेसचे मापंदड उशिरानं लागू करण्याबाबतही कानउघाडणी केली. महिलांच्या बाबतीत हे पूर्णपणे
पक्षपाती असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं आहे. स्थायी कमिशन संदर्भात ८० महिलांच्या
याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे.
****
वीज महावितरणच्या महाकृषी ऊर्जा अभियानाला राज्यभरातून सकारात्मक
प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत योजनेत आठ लाख सहा हजार १०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला
असून, त्यापैकी एक लाख ९२ हजार ५२९ शेतकऱ्यांनी मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा
करून, १०० टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या शेतकऱ्यांना वीजबिलांतून तब्बल २५५ कोटी
दोन लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.
या अभियानात सर्व थकबाकीदार कृषी ग्राहकांनी सहभागी
व्हावं, असं आवाहन महावितरणचे अध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केलं
आहे.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग रविवारी २८ तारखेला नियमित सुरु असल्याचं विभागाद्वारे
कळवण्यात आलं आहे. सोमवारी २९ तारखेला धुलिवंदनाची सुटी असल्यामुळे बाह्य रुग्ण विभाग
बंद राहणार आहे.
****
भारताच्या साईना नेहवाल, ईरा शर्मा आणि किदंबी
श्रीकांत यांनी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ऑरलीयन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व
फेरी गाठली आहे. पुरुष एकेरी गटात भारताच्या किदंबी श्रीकांतने स्पर्धेची तिसरी फेरी
गाठली आहे. महिला दुहेरीतही अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांनी उपांत्यपूर्व
फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरीत एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला यांनीही इंग्लडच्या
जोडीवर, तर कृष्ण प्रसाद गर्ग आणि विष्णू वर्धन गौड पंजला यांनी डेन्मार्कच्या जोडीवर
विजय मिळवला. मिश्र दुहेरीत धुव कपिला आणि अश्विनी पोनप्पा यांनीही इंग्लडच्या जोडीचा
पराभव केला.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरा एकदिवसीय
क्रिकेट सामना आज पुणे इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
तीन सामन्यांच्या मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
//********//
No comments:
Post a Comment