Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
24 March 2021
Time
1.00pm to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २४ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.
****
सरन्यायाधीश
शरद बोबडे यांनी देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून, न्यायमूर्ती एन व्ही रमण यांच्या नावाची
शिफारस केली आहे. सरन्यायाधीश बोबडे यांचा कार्यकाळ २३ एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे
केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. केंद्र सरकारने
काही दिवसांपूर्वीच सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केली होती. केंद्रीय
कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात
पत्र पाठवलं होतं. त्यानुसार त्यांनी एन व्ही रमण यांच्या नावाची शिफारस केली आहे.
****
राज्यात सुरु असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार,
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रसाद लोढा, राधाकृष्ण
विखे पाटील आदी नेते उपस्थितीत होते. या भेटीनंतर वार्ताहरांशी बलताना फडणवीस यांनी,
गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यामध्ये घडणाऱ्या घटना या चिंताजनक असल्याचं म्हटलं
आहे. मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणातलं मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट असून, शरद पवार
यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला, असं
फडणवीस म्हणाले. बदली रॅकेटवर सरकारने काय कारवाई केली, हे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून
अहवाल मागवावा, अशी मागणी राज्यपालांकडे केली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शंभरहून
अधिक मुद्दे राज्यपालांच्या निर्दर्शनास आणून दिल्याचं, ते म्हणाले. फोन टॅपिंग प्रकरणावरुन
राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली असल्याची माहिती, भाजपा नेते मुनगंटीवार
यांनी दिली.
****
सर्वोच्च न्यायालयानं मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची याचिका
फेटाळून लावली आहे. सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल का केली नाही, अशी विचारणा
करत सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीस नकार दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणाऱ्या
भ्रष्टाचाराची निःपक्षपाती, आणि
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका
परमबीर सिंग यांनी दाखल केली होती.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीच्या चार कोटी ८४ लाख
मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात काल नव्या ४७ हजार २६२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली, तर २७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची
संख्या एक कोटी १७ लाख ३४ हजार ५८ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ६० हजार
४४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड आणि
तामिळनाडू या सहा राज्यात कोविड रुग्ण संख्येत झपाट्यानं वाढ होत असून, देशभरातल्या
रुग्णसंख्येच्या सुमारे ८१ टक्के रुग्णसंख्या या सहा राज्यातली आहे.
तर काल २३ हजार ९०७ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत
एक कोटी १२ लाख पाच हजार १६० रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचा
दर ९५ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७४वा भाग
आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड बाधित रुग्ण वाढत असल्यानं उस्मानाबाद
शहरातल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात आणि जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या
केंद्रामध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयातल्या पदव्यूत्तर
अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची सेवा घेण्यात आली आहे. याबाबतचे आदेश काढून
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.
****
मांजरा धरणातील कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आल्याबद्दल
लातूर जिल्ह्यातल्या शेतकरी वर्गानं समाधान व्यक्त केलं आहे. शेतकऱ्यांनी या पाण्याचा
शेतीसाठी काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पाणी सोडल्याबद्दल शेतकऱ्यांनी
आमदार धीरज देशमुख तसंच पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत.
****
उस्मानाबाद नगरपालिका कोणतीही थकबाकी नसलेली राज्यातली एकमेव
नगरपालिका ठरली आहे. त्याबद्दल महावितरणचे मुख्य अभियंता भारत जाडकर यांनी नगराध्यक्ष
मकरंद राजेनिंबाळकर आणि मुख्याधिकारी हरिकल्यान येलगट्टे यांचा उस्मानाबाद इथं सत्कार
करुन अभिनंदन केलं.
****
हजरत निझामुद्दीन-नांदेड दरम्यान होळी अतिजलद विशेष
गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. हजरत निझामुद्दीन इथून ही गाडी २५ मार्च आणि एक एप्रिलला,
तर नांदेड इथून ही गाडी २७ मार्च आणि तीन एप्रिलला सुटेल.
बंगळुरू -
नांदेड - बंगळुरू या उत्सव विशेष गाडीलाही ३० मार्च ते एक जुलै पर्यंत, तर रामेश्वर-ओखा
- रामेश्वर या साप्ताहिक उत्सव विशेष गाडीलाही, दोन एप्रिल ते २९ जून दरम्यान १३ फेऱ्यांची
मुदत वाढ देण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment