Wednesday, 31 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 March 2021 Time 7.10am to 7.25am Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2021

Time 7.10am to 7.25am

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक३१ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.

****

** औरंगाबाद जिल्ह्यातली टाळेबंदी स्थगित; विरोधातलं आंदोलनही रद्द

** कोरोना विषाणू संसर्गाचा अधिक उद्रेक असलेल्या औरंगाबाद, नांदेडसह राज्यातल्या आठ शहरांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

** परभणी जिल्ह्यात दहावी - बारावी वगळता इतर सर्व वर्ग १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

** नांदेड जिल्ह्यात नियोजन विकास आराखड्यात ५टक्के निधी कोविड उपचार सुविधांसाठी राखीव ठेवण्याची सूचना

** राज्यात २७ हजार ९१८ कोविड रुग्णांची वाढ, मराठवाड्यात ८८ रुग्णांचा संसर्गानं मृत्यू तर नव्या चार हजार २१० रुग्णांची नोंद

** गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदीवाल यांची नियुक्ती

आणि

** साहित्य क्षेत्रातला प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर

****

औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्रीपासून लागू होणारी टाळेबंदी स्थगित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल रात्री पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. टाळेबंदीच्या नियमात राज्यस्तरावरुन काही बदल करण्यात आले असून, या बदलाची सूचना मिळेपर्यंत प्रधान सचिव आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार टाळेबंदी रद्द करत असल्याचं ते म्हणाले. जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनानं नऊ एप्रिलपर्यंत टाळेबंदी जाहीर केली होती. मात्र या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होत होता. जिल्ह्यात आतापर्यंत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य केलं, यापुढेही असंच सहकार्य मिळावं, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात अंशत: टाळेबंदीचे नियम कायम राहणार आहेत. त्यामुळे रात्री आठ वाजेपर्यंतच दुकानं सुरु ठेवता येतील, जमावबंदीही कायम आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचं खासदार इम्तियाज जलिल यांनी स्वागत केलं आहे. टाळेबंदीमुळे गोरगरीबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत असल्याचं सांगत, त्यांनी टाळेबंदीला विरोध दर्शवला होता. टाळेबंदीविरोधात जलिल यांनी आज पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं सांगितलं. कोरोना विषाणू अजून पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे नागरीकांनी मास्क वापरण्यासह इतर नियमांचं पालन करण्याचं आवाहन खासदार जलिल यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद, नांदेडसह राज्यातल्या आठ शहरांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवून, बाधितांचं तत्काळ विलगीकरण करण्याचे तसंच संपर्कात आलेल्यांचा तपास करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. या शहरांमध्ये औरंगाबाद, नांदेडबरोबरच, अहमदनगर, पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे. देशात संसर्गाचा दर सुमारे साडे पाच टक्के असताना, महाराष्ट्रात मात्र संसर्गाचा दर देशात सर्वाधिक २३ टक्के असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, उद्यापासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना कोविड लसीकरण करता येणार आहे. कोविन संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या किंवा दुपारी तीन वाजेनंतर नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन ओळखपत्र दाखवणाऱ्या नागरिकांना कोविड लस दिली जाणार आहे.

****

परभणी जिल्ह्यात इयत्ता दहावी - बारावीचे वर्ग वगळून इतर सर्व वर्ग १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. सर्व वरिष्ठ महाविद्यालय तसेच शिकवणी वर्ग ४ एप्रिलपर्यंत बंद राहतील. जिल्ह्यातले आठवडी बाजार, प्रवासी वाहतूक, धार्मिक स्थळंही १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

****

बीड जिल्ह्यात कोविड प्रतिबंध तसंच बाधितांवर उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वोतोपरीने उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र गृह विलगीकरणातल्या रुग्णांनी कोविडचे नियम पाळावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केलं आहे. ते म्हणाले...

होम आयसोलेशन आपण देतोय पण होम आयसोलेशनचे लोकं आपले नियम पाळत नाही असे दिसतय त्यांना आम्ही कडक सूचना दिल्या आहेत. त्यांच्यावर लक्ष आहे. पण जर होम आयसोलेशच्या लोकांनी काळजी घेतली तर निदान कुटुंबातल्या लोकांना तरी कोरोनापासून आपल्याला बचाव करता येईल. आणि संख्या आपली वाढणार नाही. तर माझी कळकळीची विनंती आहे जनतेला की, आपल्यातणं जर उस्फुर्तपणे प्रतिसाद आला तर प्रशासनावर विनाकारणचा ताण येणार नाही.

 

दरम्यान, बीड जिल्ह्यात सर्व राष्ट्रीयकृत तसंच खाजगी बँका आणि सर्व खाजगी कार्यालयातल्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी २ एप्रिलपूर्वी आरटीपीसीआर तपासणी करुन घेण्याची सूचना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केली आहे. येत्या पाच एप्रिलनंतर कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी कोविड तपासणी केल्याशिवाय कार्यालयात येणार नाहीत, याची सर्व बँक शाखाप्रमुख तसंच खाजगी कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या यावर्षीच्या नियोजन विकास आराखड्यात ५टक्के निधी कोविड उपचार सुविधांसाठी राखीव ठेवण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी काल नांदेड इथं वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमवर बैठक घेतली, या बैठकीत बोलताना चव्हाण यांनी, कोविड बाधितांवर उपचारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणखी दोनशे रुग्णखाटा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

****

राज्यात काल २७ हजार ९१८ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २७ लाख ७३ हजार ४३६ झाली आहे. काल १३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५४ हजार ४२२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९६ शतांश टक्के झाला आहे. काल २३ हजार ८२० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २३ लाख ७७ हजार १२७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८५ पूर्णांक ७१ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख ४० हजार ५४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या चार हजार २१० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८८ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४३, नांदेड जिल्ह्यातल्या २०, परभणी नऊ, जालना आठ, लातूर पाच, हिंगोली दोन तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ११६ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९५०, लातूर ५५७, जालना ४२४, परभणी ३७९, बीड ३१८, उस्मानाबाद २४२, तर हिंगोली जिल्ह्यात २२४ रुग्ण आढळून आले.

****

राज्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सीजनचा पुरवठा वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने काल अधिसूचना जारी केली असून ती ३० जून पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे. ऑक्सीजनचे उत्पादन अनेक पटीने वाढवण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासल्यास, वाढीव पुरवठा करण्याचे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत.

****

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत

****

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदीवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी रुपये खंडणी जमा करुन देण्याचे निर्देश कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. 

****

साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा सरस्वती सन्मान यंदा ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर झाला आहे. १५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. दिल्लीच्या के. के. बिर्ला फाऊंडेशनचा हा पुरस्कार देशातल्या २२ भाषातल्या पुस्तकांचं अवलोकन करुन दरवर्षी एका साहित्यिकाला दिला जातो. लिंबाळे यांना त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. लिंबाळे यांची ४० हून अधिक पुस्तकं प्रकाशित असून अक्करमाशी हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. उमेदीच्या काळात लिंबाळे यांनी सोलापूर आकाशवाणी केंद्रात उद्घोषक म्हणून काम केलं आहे.

****

नांदेड शहरात धुलीवंदनाच्या दिवशी वजीराबाद भागात पोलिसांवर हल्ला करणाऱ्या १८ समाज कंटकांना पोलिसांनी अटक केली असून, ३०० लोकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी ही माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज पाहून ६० आरोपींचा शोध घेणं सुरू असल्याचं ते म्हणाले.

****

उस्मानाबाद नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी भारतीय जनता पक्षाचे प्रविण पाठक यांची एकमतानं निवड झाली. नगरपालिकेच्या काल झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.

****

परभणी जिल्ह्यात कोविडबाधितांवर उपचारासाठी आवश्यक एच.आर.सिटी चाचणी करता सीटी स्कॅनचं जादा शुल्क आकारणाऱ्यांविरूध्द कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. संबंधित सीटी स्कॅन मशीन सील करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासंदर्भात दाखल तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही सूचना केली आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाळसाळे यांनी काल परभणी शहरात विविध कोविड केंद्रांना भेटी देऊन वैद्यकीय उपचार, सुविधा आणि इतर व्यवस्थेचा आढावा घेऊन, आवश्यक निर्देश दिले. टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण कार्यक्रम टाकसाळे यांच्या मार्गदर्शनात काल घेण्यात आला, ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण करून घेण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन टाकसाळे यांनी यावेळी केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त होणारे धार्मिक विधी फक्त पाच जणांच्या उपस्थितीत करण्याचे निर्देश प्रशासनानं जारी केले आहेत. मात्र, हे विधी करण्यासाठी ५० जणांना आणि सर्व फडकऱ्यांना कमीत कमी २० जणांच्या उपस्थितीची परवानगी द्यावी, अशी मागणी संत एकनाथ महाराजांचे १२ वे वंशज योगेश गोसावी पालखीवाले यांनी केली आहे. देहू इथं काल तुकाराम बीजेनिमित्त ५० भाविकांना परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली.

****

थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज खंडीत करू नये, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र वीज बिलांची होळी करण्यात आली. उस्मानाबाद इथल्या वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर हे आंदोलन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

****

बीड तालुक्यातल्या श्री क्षेत्र रामगडाचे मठाधिपती हरिभक्तपरायण महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांचं काल निधन झालं. आमदार संदीप क्षीरसागर यांनी महाराजांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

//**********//

 

No comments: