Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
27 March 2021
Time
1.00pm to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २७ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.
****
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात
उद्यापासून रात्रीची जमावबंदी लावण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली
आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सर्व विभागीय आयुक्त, आणि प्रशासकीय यंत्रणेशी संवाद साधून
कोविड स्थितीसंदर्भात आढावा घेतल्यानंतर हे निर्देश दिले.
दरम्यान, राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढत असल्यान अनेक निर्बंध
घालण्यात आले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रातली सर्व दुकानं तसंच नागरिकांच्या
व्यवहारांवर पूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत. कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर,
वारंगा या बाजारपेठेच्या ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात आला.
लातूर जिल्ह्यात आजपासून
चार एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. जिल्ह्यातले
सर्व जिम, व्यायामशाळा, क्रीडांगणं, जलतरण
तलाव, उद्यानं, पानटपरी, चहाटपरी, मंगल
कार्यालयं, चित्रपट तसंच नाट्यगृहं,
सभागृहं बंद राहतील. बीड जिल्ह्यातही कालपासून चार एप्रिल
पर्यंत टाळेबंदी लागू झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात लग्न समारंभ आणि धार्मिक समारंभाच्या
आयोजनास संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेण्याचे आदेश
जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. याशिवाय जिल्ह्यातले सर्व
आठवडे बाजार १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात ३१ मार्च ते १५ एप्रिल पर्यंत
पूर्णत: संचारबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.
या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
****
देशात आतापर्यंत पाच कोटी ८१ लाखाहून अधिक नागरीकांना
कोविड लसीकरण करण्यात आलं. काल दिवसभरात जवळपास २६ लाख नागरीकांना लस टोचण्यात आली.
दरम्यान, देशात काल ३० हजार रुग्ण बरे झाले असून,
रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ८४ शतांश टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत एक कोटी
१२ लाख रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. तर काल नव्या ५२ हजार रुग्णांची नोंद
झाली. देशातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या एक कोटी १९ लाखाहून अधिक झाली असून, सध्या
चार लाख ५२ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचे १४ हजार ९३६
रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात काल एक हजार ७८७ नव्या रुग्णांची नोंद झाली,
तर २६ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या ७५ हजार ६३५
झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक हजार ५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात
आतापर्यंत ५९ हजार १६८ रुग्ण बरे झाले आहेत.
****
राज्यातल्या साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी येत्या पाच एप्रिलपर्यंत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत साखर कारखान्यांनी सुमारे साडे आठशे लाख टन उसाचं गाळप केलं असून, कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बिलाची तेवीसशे कोटीहून अधिक रकम थकवली आहे असं ते म्हणाले. ही रक्कम येत्या पाच एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग न झाल्यास पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन आणि उपोषण करण्यात येईल असं राजू शेट्टी यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७५वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
मुंबईत प्रभादेवी इथल्या वीर सावरकर मार्गालगत असलेल्या गॅमन हाऊस या
पाच मजली इमारतीत आज सकाळी आग लागली, या आगीत इमारतीचं नुकसान झालं असून, जीवित हानी
झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलान दिली. दहा अग्निशमन बंबाच्या मदतीनं आग विझविण्याचे
प्रयत्न सुरु आहेत. आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही.
****
पुणे शहरात कॅम्प मधल्या फॅशन स्ट्रीट भागात काल रात्री भीषण आग लागली.
या आगीत अनेक दुकानं जळाली. अग्निशमन दलाचे १४ बंब आणि दोन पाण्याच्या टँकरच्या सहाय्यानं
रात्री एक वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आली.
****
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती
पदासाठी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका संगीता पाटील डख, तर उपसभापती पदासाठी याच पक्षाच्या
नगरसेविका गीतांजली हटकर कापूरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही पदासाठी प्रत्येकी
एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होत आहे. बिनविरोध निवडीची अधिकृत
घोषणा येत्या ३० तारखेला केली जाणार आहे.
****
लातूर शहरात प्रमुख रस्ते तसंच चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात
येणार आहेत. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ही माहिती दिली. यासाठी ८२ लाख रुपये
खर्च येणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत
याला मान्यता दिली आहे.
//********//
No comments:
Post a Comment