Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
30 March 2021
Time
1.00pm to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ३० मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.
****
देशात आतापर्यंत सहा कोटी ११ लाख १३ हजारांहून अधिक नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. ५० लाखाहून अधिक नागरिकांना कोविड लसीची पहिली मात्रा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. राज्यात आतापर्यंय ५२ लाख ३५ हजार ६४६ नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली, तर सात लाख २१ हजार नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली. यासोबतच राज्यात लसीकरण झालेल्या एकूण नागरिकांची संख्या ५९ लाख ५० हजारांहून अधिक झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीच्या आदेशात बदल करण्यात आला असून, जिल्हाभरात आज रात्री बारा वाजेपासून येत्या ९ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू असेल. जिल्ह्यातले सर्व पेट्रोलपंप सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत सर्वांसाठी खुले असतील. त्यानंतर मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतल्या वाहनांनाच इंधन पुरवठा होईल. संचारबंदीच्या काळात सर्व प्रकारचे उद्योग, रुग्णालयं, औषध विक्री आणि वितरण, ई कॉमर्स सेवा, वर्तमानपत्रं, आरक्षित प्रवासी वाहतुक, सर्व बँका तसंच शासकीय कार्यालयं सुरू राहणार आहेत.
बीड जिल्ह्यात आजपासून सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत टाळेबंदी शिथिल केली जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात दिनांक ३० एप्रिल पर्यंत सर्व शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू राहतील, असं जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं नाथषष्टी सोहळ्यानिमित्त होणारे धार्मिक विधी केवळ पाच लोकांच्या उपस्थितीत करण्याचे निर्देश प्रशासनानं जारी केले आहेत. हे विधी करण्यासाठी ५० लोकांना आणि सर्व फडकऱ्यांना कमीत कमी २० लोकांची परवानगी द्यावी, अशी मागणी संत एकनाथ महाराजांचे १२ वे वंशज योगेश गोसावी पालखीवाले यांनी केली आहे. देहू इथं आज तुकाराम बीज निमित्त ५० भाविकांना परवागी दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली. प्रशासनानं ही मागणी मान्य न केल्यास वारकर्याच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा योगेश गोसावी पालखीवाले यांनी दिला आहे.
दरम्यान, तुकाराम बीज सोहळा केवळ ५० भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतल्यानंतर वारकरी संप्रदायातले नेते बंडातात्या कराडकर यांनी, भजन सत्याग्रहाचा पवित्रा घेतला असून, देहूगावच्या वेशीवर काल दोनशेच्या जवळपास वारकऱ्यांनी भजन आंदोलन केलं. बीज सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांनी देहूत यावं असं आवाहन बंडातात्यांनी नुकतंच केलं होतं. त्यानुसार काल देहूच्या वेशीवर महाराष्ट्राच्या काही भागातून वारकरी आले. भजन करत शांततेच्या मार्गाने त्यांनी आंदोलनाद्वारे आपलं म्हणणं मांडलं. या आंदोलनात वारकाऱ्यांकडून कोरोना संदर्भातील सुरक्षित अंतर आणि मुखपट्टी वापरण्याच्या नियमांचं पालन होत असल्याचं दिसून आलं.
****
थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज तोडणी तात्काळ
थांबवावी या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज उस्मानाबाद जिल्ह्यात
सर्वत्र वीज बिलांची होळी करण्यात आली. उस्मानाबाद इथल्या वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर
हे आंदोलन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणा
दिल्या.
****
केंद्र सरकारनं लसीकरणासाठी ठेवलेली वयाची अट काढून टाकून सर्व नागरिकांसाठी लसीकरण उपलब्ध करून द्यावं अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ज्यांना विकत घेणं शक्य नसेल त्यांच्यासाठी सरकारी दवाखान्यात लस मोफत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी काल अहमदनगर इथं कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली.
****
भारत सरकारच्या व्हॅक्सिन मैत्री या अभियानाअंतर्गत काल फिजी, झिम्बाब्वे, नायजर आणि पॅराग्वे या चार देशांना कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा प्राप्त झाला असून, या देशांनी भारताचे आभार मानले आहेत. व्हॅक्सिन मैत्री या अभियानाअंतर्गत भारतानं आतापर्यंत ७० हून अधिक देशांना कोरोना प्रतिबंधक लस पाठवली आहे.
****
सुएझ कालव्यात कंटेनर जहाजांची झालेली कोंडी सुटण्यास थोडी सुरवात झाल्याचं काल अधिकृतरीत्या सांगण्यात आलं. दरम्यान, सुएझ कालव्यातून पुन्हा वाहतूक सुरु झाली की भारतातल्या मुंद्रा, हाजिरा आणि मुंबईजवळच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएजपीटी या कंटेनर बंदरांवर येणाऱ्या जहाजांची गर्दी अपेक्षित असून, या जहाजांना जागा मिळण्यास अडचण होऊ नये, या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना जहाज बांधणी मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.
****
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या विश्वचषक सुपर लीग क्रमवारीत भारत सातव्या स्थानावर आला आहे. या क्रमवारीत ४० गुणांसह इंग्लंड प्रथम स्थानावर असून, भारताचे २९ गुण झाले आहेत. या लीगमध्ये १२ संघांचा समावेश असून, पहिल्या आठ क्रमांकावरील संघांचा २०२३ मध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत थेट प्रवेश होणार आहेत. ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment