Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
28 March 2021
Time
1.00pm to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २८ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.
****
भारतात जगातला सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम
राबवला जात असून सर्वांनी लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे. आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमात देशवासयियांशी संवाद
साधताना ते आज बोलत होते. लसीकरण करुन घेण्याऱ्या ज्येष्ठ नागरिकांचं अभिनंदन करत त्यांनी इतरांना प्रेरणा दिली असल्यामुळे
त्यांचं आभारही
पंतप्रधानांनी मानले. गेल्या वर्षीची भारतातली जनता संचारबंदी संपुर्ण जगासाठी शिस्तीचं उदाहरण बनली होती याची आठवण करत संसर्गाच्या या काळात सर्वांनी सावधानता बाळगणं गरजेचं असून औषधं घेणं आणि निबर्धांचं
पालन करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या महिन्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी
वर्षाला सुरुवात झाली असून अशा वेळी `मन की बात` कार्यक्रमाच्या ७५व्या भागात देशवासियांशी संवाद साधण्याची
संधी मिळत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आज
साजरा होत असलेला होळी हा
वसंत रुतूच्या आमनाचा सण असून हा सण नक्कीच आपल्या सगळ्यांना आनंद आणि नवी उर्जा देईल
असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेतीत नवनवीन प्रयोग होत असून सध्या मधमाशी पालन
हा उत्तम पर्याय समोर आला आहे असं सांगत मधमाशी पालन देशात `मधुर क्रांतीचा` पाया रचत असून यात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत आणि नवसंशोधन करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. महिला क्रिकेटपटू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्याचा
विक्रम केला तसंच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत सात हजार धावा करणारी ती एकमेव
महिला क्रिकेटपटू ठऱली असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत तिनं लाखो लोकांना प्रेरणा दिली
असल्याचं पतंप्रधान मोदी यांनी सांगितलं. येत्या काही दिवसांत आपल्या
घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांचं स्मरण करून देणारं पर्व येत असल्याचं
नमुद करत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा यावेळी उल्लेख केला. बाबासाहेबांची ही जन्म जयंती आपण नक्कीच संस्मरणीय बनवू, आपल्या कर्तव्यांचा
संकल्प करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू, असं पंतप्रधान म्हणाले.
****
राज्यात लसीकरणाला
चांगला प्रतिसाद मिळत असून काल दोन लाख ३१ हजार २७७ लोकांनी कोविडची लस घेतली. राज्यात
आतापर्यंत ५७ लाख ६२ हजार ६०१ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. मराठवाड्यात काल
२४ हजार १०२ लोकांनी लस घेतली. यात औरंगाबाद इथं पाच हजार ४९४, बीड पाच हजार ४४६, परभणी
एक हजार ७०३, जालना ६४४, नांदेड सात हजार ४१९, हिंगोली ८४७, उस्मानाबाद दोन हजार ५४९
नागरिकांनी लस घेतली. मराठवाड्यात आतापर्यंत
६ लाख ४८ हजार ७९१ लोकांनी लस घेतली आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरातली लसीकरण केंद्रं आज आणि उद्या
सोमवारी धुलिवंदनाच्या दिवशीही सुरु राहणार आहेत. महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार
पांडेय यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
****
कोविड प्रतिबंधासाठी राज्यभरात लागू निर्बंधांची मुदत १५ एप्रिल
पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यभरात आजपासून रात्रीची जमावबंदी लावण्याची सूचना मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जमावबंदी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये,
तर मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येईल. आज साजरा होणारा होलिकोत्सव,
आणि उद्यापासून पुढे आठवडाभर येणारे शब ए बारात, धुलिवंदन, गुडफ्रायडे, रंगपंचमी, ईस्टर
संडे, आदी सण उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे १६६ रुग्णांचा काल
मृत्यू झाला तर नवे ३५ हजार ७२६ रुग्ण आढळले आहेत. राज्यात या संसर्गावर तीन लाख तीन
हजार ४७५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. मृत्यूदर दोन पूर्णांक दोन दशांश टक्के आहे.
राज्यात या संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८६ पूर्णांक ५८ शतांश टक्के आहे.
****
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं काल देशभरात अकरा लाख
८१ हजार २८९ नमुन्यांची कोरोना विषाणू संसर्गासाठी तपासणी केली. देशात आतापर्यंत २४
कोटी नऊ लाख ५० हजार ८४२ चाचण्या घेण्यात आल्या असल्याचं संशोधन परिषदेनं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात लागू सप्ताहांत संपूर्ण टाळेबंदीला
दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या
वाहनधारकांना आज काही पेट्रोलपंपांवर इंधन मिळत नव्हतं तर काही ठिकाणी वाहन धारकांच्या
लांबच लांब रांगा होत्या. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना ओळखपत्र दाखवून इंधन देण्याचे
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश असतांनाही काही पेट्रोलपंप चालक इंधन देण्यास नकार देत असल्याचं
दिसून आलं.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या
तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना, आज पुण्यात होत आहे. थोड्या
वेळातच या सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत दोन्ही संघ एक एक असे बरोबरीत असल्यानं
ही लढत निर्णायक ठरणार आहे.
//***************//
No comments:
Post a Comment