आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
दिनांक २९ मार्च २०२१
****
धुळवड आज साजरी
होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा
दिल्या आहेत. आनंद आणि हर्षोल्हासाचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात नवीन ऊर्जा घेऊन येवो,
असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. औरंगाबाद शहरात कोविड प्रतिबंधात्मक
नियमांचं पालन करत धुळवड साजरी होत असल्याचं दिसून येत आहे.
****
राष्ट्रीय राजधानी
क्षेत्र सुधारणा विधेयकावर काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. या
विधेयकामुळं दिल्ली सरकार हे नायब राज्यपालांना जबाबदार राहणार आहे. राष्ट्रपतींनी
यावर शिक्कामोर्तब केल्यानं हे विधेयक कायद्यात रुपांतरीत झालं आहे.
****
देशात कोणकोणता
माल आयात केला जातो, याची माहिती घेऊन आयातीला भारतीय पर्याय निर्माण करून आयात रोखण्यानं
आणि निर्यात वाढवण्यानंच आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार होईल, असं प्रतिपादन केंद्रीय
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. त्यांनी काल अनिवासी
भारतीय उद्योजकांसोबत दूरदृष्य पद्धतीनं संवाद साधला. कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागात
उद्योगांचा विकास झाला तरच रोजगार निर्मिती होईल आणि दरडोई राष्ट्रीय उत्पन्नात वाढ
होईल, असं ते म्हणाले. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रत्येक गावात उद्योग
सुरु करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार ९०५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ६३ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २३,
नांदेड १८, परभणी १०, जालना सहा, बीड तीन,
लातूर दोन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल १ हजार ३९९
रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार
३१०, लातूर ४९०, जालना ४७४, परभणी ६८४, बीड २८४, उस्मानाबाद
१८४, तर हिंगोली जिल्ह्यात ८० नवे
रुग्ण आढळून आले.
****
नांदेड जिल्ह्यात प्रत्येक गावात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडे
परवानगी मागण्यात आली असून, शासनाकडून अशी परवानगी मिळताच प्रत्येक गावातल्या शाळेमधून
कोविड लसीकरण करण्यात येईल अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी
दिली. ते सामाजिक संपर्क माध्यमातून नागरीकांशी संवाद साधत होते.
//***********//
No comments:
Post a Comment