आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
दिनांक २७ मार्च २०२१
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज बांग्लादेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक ठिकाणांना आणि मंदीरांना भेट
देणार आहेत. आज सकाळी त्यांनी ढाका इथल्या जोगेश्वरी काली मंदीराला भेट दिली.
पंतप्रधान काल
बांगलादेशाच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. दहशतवादी
कारवाया मोडून काढण्यासाठी चौकस राहून एकजुटीनं काम करावं लागेल, असं ते यावेळी म्हणाले.
दिवंगत शेख मुजीबुर्रहमान यांना यावेळी गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या
कन्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
****
पश्चिम बंगाल
आणि आसाममधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला
सुरुवात झाली. आसाममध्ये या टप्प्यात १२ जिल्ह्यांतल्या ४७ मतदारसंघांचा समावेश आहे.
तर पश्चिम बंगालमध्ये ३० जागांसाठी मतदान होत आहे.
****
पुणे शहरात कॅम्प
मधल्या फॅशन स्ट्रीट भागात काल रात्री भीषण आग लागली. या आगीत अनेक दुकानं जळाली. अग्निशमन
दलाचे १४ बंब आणि दोन पाण्याच्या टँकरच्या सहाय्यानं रात्री एक वाजेच्या सुमारास आग
आटोक्यात आली.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार ५९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५७ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६,
नांदेड जिल्ह्यातल्या १४, परभणी सहा, जालना पाच, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार
७८७ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९७०,
लातूर ५३८, जालना ४१५, बीड ३८३, परभणी २६३, उस्मानाबाद १५५,
तर हिंगोली जिल्ह्यात १८६ नवे रुग्ण आढळून आले.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं, अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या टिप्पर चालकाने पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला, जीवे मारण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याच्या तक्रारीवरून
पूर्णा पोलिस ठाण्यात चारजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
जागतिक नेमबाजी क्रीडा महासंघ -आयएसएसएफच्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या वर्ल्डकप-२०२१ च्या
विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंत
हिनं सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत १२ सुवर्ण पदकांसह २५ पदकं पटकावत भारत
पहिल्या क्रमांकावर आहे.
No comments:
Post a Comment