Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 27 March 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मार्च २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू
रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन
श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं
आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित
रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** कोविड रुग्णांच्या
संख्येत मोठ्या प्रमाणात होणारी वाढ पाहता, होळीसह पुढच्या आठवड्यात येणारे सण उत्सव
साधेपणानं साजरे करण्याचं राज्य शासनाचं आवाहन
** ठाणे इथं औद्योगिक वसाहतीतल्या
रासायनिक कंपनीत तीन कामगारांचा मृत्यू
** बीड जिल्ह्यात नवे ३७५कोविडग्रस्त; औरंगाबाद जिल्ह्यात ११ रुग्णांचा मृत्यू
आणि
** लोकशाही शासन
व्यवस्थेत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक लाभ पोहोचणं आवश्यक - ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ जे एफ
पाटील यांचं मत
****
राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ पाहता, उद्या
साजरा होणारा होलिकोत्सव, आणि पुढच्या आठवड्यात येणारे शब ए बारात, धुलिवंदन, गुडफ्रायडे,
रंगपंचमी, ईस्टर संडे, वगैरे सण उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन राज्य शासनानं
केलं आहे. गृहविभागाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करून, मार्गदर्शक सूचना जारी केल्या
आहेत. कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, शारीरिक अंतराच्या नियमाचं तंतोतंत पालन
होईल याकडे लक्ष द्यावं, मोठ्या स्वरुपाचे धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित
करु नयेत. पोलिस प्रशासन, तसंच स्थानिक प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचं काटेकोर पालन
करावे, असं या पत्रकात म्हटलं आहे.
****
ठाणे जिल्ह्यातल्या
अंबरनाथ औद्योगिक वासाहतीत असलेल्या रासायनिक कंपनीत भुयारी टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा
आज गुदमरून मृत्यू झाला. या भुयारी रासायनिक टाकीचं रंगकाम करण्यासाठी तीन कामगारांना बोलावण्यात आलं होतं. टाकीत काम करत असतांना
त्रास झाल्यावर कामगारांनी बाहेर पडण्याचा
प्रयत्न केला, मात्र ते बाहेर पडू
शकले नाहीत. अग्निशमन दल ताबडतोब घटनास्थळी
दाखल झाले. त्यांनी या टाकीतून तीनही कामगारांचे मृतदेह बाहेर काढल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती आता ठीक असल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या
डॉक्टरांनी सांगितलं आहे. राष्ट्रपतींना काल छातीत दुखण्याच्या तक्रारीनंतर दिल्लीतल्या
सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तपासणी आणि उपचारानंतर राष्ट्रपतींना निरीक्षणाखाली
ठेवण्यात आलं आहे. प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे राष्ट्रपतींनी
एका ट्विटच्या माध्यमातून आभार मानले आहेत.
****
सार्वजनिक जीवनात मूल्यं जपण्याची आवश्यकता उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी
व्यक्त केली आहे. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ एन नरोत्तम रेड्डी यांच्या जन्मशताब्दी निमित्त
हैदराबाद इथं झालेल्या कार्यक्रमात नायडू बोलत होते. संसदेच्या कामकाजात वारंवार व्यत्यय
आणणं आणि चर्चेचा स्तर खालावणं, यावर नायडू यांनी खंत व्यक्त केली. लोकप्रतिनिधींच्या
कार्यातून जनतेच्या अपेक्षा प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत, असं उपराष्ट्रपतींनी नमूद
केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७५ वा
भाग आहे.
****
बीड जिल्ह्यात आज
३७५ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये बीड तालुक्यात सार्वाधिक ११२, अंबाजोगाई
७५, परळी ३८, आष्टी ३०, केज २७, माजलगाव २५, गेवराई २४, पाटोदा २३, वडवणी पाच आणि शिरुर
इथल्या चार रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
११ कोविड बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं दगावलेल्या
रुग्णांची संख्या आता एक हजार ५४२ झाली आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज ६७ नवे
रुग्ण दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ७५ हजार ७०२ झाली
आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग
रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये आज आणि उद्या सप्ताहांत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात शहरी भागात काही प्रमाणात रस्त्यावर वाहतूक दिसून येत
असली तरी ग्रामीण भागात टाळेबंदीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद होती.
वैजापूर इथं काही दुकानदार तसंच विनाकारण फिरणाऱ्या काही नागरिकांवर पोलिसांनी
दंडात्मक कारवाई केली.
औरंगाबादमध्ये अनेक
पेट्रोलपंपावर वाहनधारकांनी सकाळपासून गर्दी केली. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनधारकांचे
ओळखपत्र पाहून त्यांना इंधन देण्यात आलं. वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा दिसून
आल्या.
****
नांदेड शहरात लागू
करण्यात आलेल्या टाळेबंदाला आज तिसऱ्या दिवशीही
नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद
दिला. शहरातल्या मुख्य वसाहतींसह सर्वत्र शुकशुकाट पसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. टाळेबंदीच्या काळात औषधी दुकानं,
वृतपत्र, दूध, भाजीपाला, किराणा सामान,
गॅस, जीवनावशक वस्तुचं घरपोच वितरण
आदी सेवांना सकाळी काही वेळ सूट देण्यात आली होती
****
लातूर महानगरपालिकेच्या
वतीनं आज शहरातल्या ९३१ दिव्यांग लाभार्थ्यांना सहायता उपकरणांचं वाटप घरपोच करण्यात
आलं. मूक-बधीर, अंध, शारीरिक अपंगत्व असणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या
आवश्यकतेनुसार लागणारी सहायता उपकरणं अलिमको या संस्थेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अत्याधुनिक श्रवण यंत्र, तीन चाकी सायकल, स्वयंचलित
तीन चाकी सायकल, मोबाईल फोन, अत्याधुनिक काठी अशा प्रकारच्या साहित्याचा यात समावेश
आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सर्व साहित्य मनपाच्या वतीने घरपोच वितरित करण्याचा
सूचना देत, साहित्य उपलब्ध
करून दिल्याबद्दल आलिमको संस्थेचे
आभार व्यक्त केले.
****
लोकशाही शासन व्यवस्थेत
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक लाभ पोहोचले पाहिजेत, असं ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ जे एफ पाटील यांनी म्हटलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय
ऑनलाइन चर्चासत्रात 'डिस्ट्रिक्ट प्लानिंग फॉर टॅपिंग डेव्हलपमेंट पोटेन्शियल' या विषयावर डॉ पाटील बोलत होते. सामाजिक सम न्याय आणि आर्थिक सुबत्तेसाठी अधिक
प्रभावी जिल्हा नियोजनाची आवश्यकता असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
या चर्चासत्राचा आज समारोप झाला. मुंबई विद्यापीठातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या
संचालक प्राध्यापक मनीषा कारणे समारोप सत्रात
सहभागी झाल्या.
****
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या दिग्रस इथली पूजा बालाजी किवंदे हिची
सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे. नांदेड जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस संजय भोसीकर
तसंच सामाजिक कार्यकर्त्या वर्षा भोसीकर यांच्या हस्ते पूजाचा सत्कार करण्यात आला.
मुलींनी देशसेवेसाठी पुढे येणं आवश्यक असल्याचं मत, भोसीकर यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
यंदा कोविड प्रार्दुभावामुळे
होळी सण साजरा करण्यावर
मर्यादा आल्या आहेत. होळीसाठी साखरगाठ्या तसंच साखर कडे तयार केले जातात. मात्र, यंदा
साध्या पद्धतीनं होळी सण साजरा करण्याचे शासनानं निर्देशित केल्यामुळे साखर गाठ्या
कमी प्रमाणात बनवण्यात आल्या असल्याचं
औरंगाबाद इथल्या विक्रेत्यांनी सांगितलं.
यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याची खंतही विक्रेत्यांनी व्यक्त केली.
****
परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुंढे यांच्यासह कर्मचारी
संजय भेंडेकर, आणि प्रेमदास पवार या तीन जणांना औरंगाबाद इथले रेल्वेचे पोलिस अधीक्षक
वैभव कलबुर्मे यांनी निलंबित केलं आहे. या तिघांनी ॲट्रोसिटीचा अर्ज मागे घेण्यासाठी
तसंच गंगाखेड रेल्वे स्थानकात उपाहारगृह चालवू देण्यासाठी एक लाख रुपये लाच मागितली
होती. त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची
कारवाई करण्यात आली.
//*************//
No comments:
Post a Comment