Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 March 2021
Time 7.10am to 7.25am
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २६ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा
एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत
आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक
वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ
उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा,
वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** राज्य शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार,
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर
** संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप;
लोकसभेत १८ तर राज्यसभेत १९ विधेयकं संमत
** मराठा आरक्षण प्रकरणात केंद्र सरकार आणि
सर्वच राज्य सरकारांची भूमिका अनुकूल
** राज्यात नवे ३५ हजार ९५२ कोविडग्रस्त;
मराठवाड्यात काल ४४ रुग्णांचा मृत्यू तर
नव्या चार हजार ५६१ रुग्णांची नोंद
** औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदीबाबत लवकरच
निर्णय; पालकमंत्र्यांचा इशारा
आणि
** नांदेड तसंच परभणीत टाळेबंदीला नागरिकांचा
उत्स्फुर्त प्रतिसाद
****
महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येणारा
२०२० या वर्षीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार, प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर
झाला आहे. दहा लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्कारचं स्वरुप आहे. महाराष्ट्र
भूषण हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असून, १९९७ पासून हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आशा भोसले यांनी आनंद
व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल समारोप
करण्यात आला. अनेक राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, संसदेचं
कामकाज निर्धारित तारखेपूर्वी संस्थगित करण्यात आल्याचं, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद
जोशी यांनी सांगितलं. अधिवेशनाचा समारोप आठ एप्रिलला होणार होता. या अधिवेशनात आगामी
आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पासह, लोकसभेत १८ विधेयकं तर राज्यसभेत १९ विधेयकं संमत
झाली. तर दोन्ही सदनात २० विधेयकं सादर करण्यात आली. दोन्ही सदनांचं कामकाज सुरळीत
झाल्याबद्दल जोशी यांनी समाधान व्यक्त केलं
****
महाराष्ट्रातलं सरकार
त्वरीत बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी,’ अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तसंच
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून आठवले यांनी याबाबतचं निवेदन सादर केलं.
दरम्यान, नागपूर इथल्या दीक्षाभूमीसाठी केंद्र
शासनानं १७ कोटी रूपये मंजूर केल्याची माहिती आठवले यांनी दिली. ते नागपूर इथं पत्रकार
परिषदेत बोलत होते.
****
मराठा आरक्षण प्रकरणात केंद्र सरकार आणि
सर्वच राज्यांनी अनुकूल भूमिका घेतली असल्याचं, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे
अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. आरक्षणाबाबत राज्यांचे अधिकार सुरक्षित
रहावेत, आणि ५० टक्के मर्यादेचा फेरविचार व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील होतं, असं
चव्हाण यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. मराठा आरक्षणाबाबत लवकरच निर्णय होईल, असं
चव्हाण म्हणाले.
****
मुंबईत भांडूप इथं खासगी कोविड रुग्णालयाला काल मध्यरात्रीच्या
सुमारास आग लागली, या दुर्घटनेत एका रुग्णाचा होरपळून मृत्यू झाला, तर सात रुग्ण बेशुद्ध
पडले. रुग्णालयात दाखल ७३ जणांना इतरत्र हलवण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७४वा भाग
आहे.
****
राज्यात काल ३५ हजार ९५२ कोविड रुग्णांची
नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २६ लाख ८३३ झाली आहे.
काल १११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या, ५३ हजार ७९५ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे.
काल २० हजार ४४४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २२ लाख ८३ हजार
३७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८७ पूर्णांक ७८ शतांश टक्के
झाला आहे. सध्या राज्यभरात दोन लाख ६२ हजार ६८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार ५६१ कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४४ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १८,
नांदेड जिल्ह्यातल्या नऊ, जालना सात, परभणी पाच, बीड तीन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या दोन
रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार
५९५ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ५३, लातूर ५२५, जालना ४५०, परभणी ३७३, बीड ३३५,
उस्मानाबाद १७४ तर हिंगोली जिल्ह्यात ५६
नवे रुग्ण आढळून आले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात तुर्तास पूर्ण टाळेबंदी
लावलेली नसली, तरीही लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे संकेत, जिल्ह्याचे पालकमंत्री
सुभाष देसाई यांनी दिले आहेत. ते काल औरंगाबाद इथं कोविड परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर
पत्रकार परिषदेत बोलत होते. टाळेबंदीबाबत देसाई म्हणाले...
रुग्णसंख्येची झपाट्याने
होणारी वाढ लक्षात घेऊन, आपल्या आरोग्य विभागाने संपूर्ण लॉकडाऊन करा, अशा प्रकारची
सूचना केली आहे. आम्ही मात्र आटोक्यात येईल असा प्रयत्न करत आहोत. पूर्ण लॉकडाऊन न
करता, बंधन घालून किंवा आठवड्याच्या अखेरीला लॉकडाऊन करुन, रात्रीचं लॉकडाऊन करुन,
कशा रितीनं कोरोनाचा संसर्ग रोखता येईल, असेच आपण प्रयत्न करत आहोत. परंतु आरोग्य विभागाच्या
मात्र एकंदर याचा जो वेग आहे, रुग्ण दुप्पट होण्याचा तो लक्षात घेऊन परिस्थिती हाताबाहेर
जाण्यापूर्वीच तुम्ही अशा प्रकारचं पाऊल उचला अशा प्रकारची त्यांनी सूचना केली आहे.
त्याच्यावर सर्व जण आम्ही विचार करत आहोत. योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल.
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड चाचणी केंद्रांची
संख्या ५०० पर्यंत, तसंच चाचण्यांच्या संख्येत प्रतिदिन १० हजारांपर्यंत वाढ करावी,
आणि सर्व यंत्रणांनी वाढत्या रूग्णसंख्येच्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधांसह सज्ज
रहाण्याचे निर्देश, पालकमंत्र्यांनी दिले. नागरिकांना कोविड नियमांचं पालन करण्याचं
आवाहनही देसाई यांनी केलं.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात होळी आणि धुलिवंदनाचा
सण सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रशासनानं
जारी केले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व बाजारपेठा आणि आस्थापना काल बंद असल्याचं दिसून
आलं.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात टाळेबंदी मागे
घ्यावी, अशी मागणी लॉकडाऊन अत्याचार विरोधी कृती समितीनं जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
यांच्याकडे केली आहे. छोटे व्यापारी तसंच दैनंदिन मजूरीवर पोट अवलंबून असणाऱ्यांची
आर्थिक स्थिती टाळेबंदीमुळे बिकट होत असल्याचं याबाबतच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीलाही
जिल्ह्यातल्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळालं. लहान-मोठ्या सर्वच
व्यापाऱ्यांनी आपली दुकानं काल बंद ठेवली होती.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील सकाळी १० ते
सायंकाळी ५ या वेळेत व्यापारी आस्थापनांना व्यवसायाची मुभा द्यावी, अशी मागणी जिल्हा
व्यापारी महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन
महासंघानं जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं व्यापारी
काटेकोर पालन करतील, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या २१ कोटी ४१
लाख ६८ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने काल मंजुरी
दिली. १९ कोटी ९९ लाख २० हजार सत्तावीस रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. जिल्ह्यात
नावीन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात
आली आहे.
****
परभणी जिल्ह्यात सिंगणापूर परिसरातून पोलिसांनी
डिटोनेटर्स - स्फोटकांचा मोठा साठा काल जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीस पोलिसांनी
ताब्यात घेतलं, तर दुसरा पसार झाला. सुभाष चव्हाण असं या आरोपीचं नाव असून, त्याच्याविरोधात
दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्याचे ओबीसी संघटनेचे प्रमुख
राजेश भिमराव रापते यांचे काल सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते
६३ वर्षांचे होते. राजेश रापते हे सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते
होते.
****
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा टाळेबंदीच्या काळातही
पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरु राहतील. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नसल्याचं
परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी कळवलं आहे.
****
ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यामध्ये मदत करून अर्ज
मागे घेण्यासाठी तसंच उपाहारगृहं चालवू देण्यासाठी परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं एका
नागरिकाकडून एक लाख रुपये लाच घेऊन पसार झालेल्या रेल्वे पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक
पथकानं सापळा रचून अटक केली. परळी रेल्वे पोलिस ठाण्यातील तिघांविरोधात या प्रकरणी
कारवाई करण्यात आली. संजय भेंडेकर, प्रेमदास पवार, आणि माधुरी मुंढे अशी या तिघांची
नावं आहेत.
****
लातूर जिल्हा विधीसेवा प्राधिकरण आणि अखिल
भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं तृतीय पंथीयांना चार तासात शिधापत्रिका तयार करून
प्रदान करण्यात आल्या. तृतीयपंथीयांना आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र आणि जनधन
बॅंक खातेही काढून देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती विधी-सेवा
प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश सुनिता कंकणवाडी यांनी दिली.
****
परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात केरवाडी
ते सिरपूर या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी कालपासून बेमुदत उपोषण सुरू केलं
आहे. रस्ता तसंच स्मशानभूमीची मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार
उपोषणकर्त्यांनी केला आहे.
//**********//
No comments:
Post a Comment