Friday, 26 March 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र दिनांक २६ मार्च २०२१

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

दिनांक २६ मार्च २०२१

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, नियमांचं पालन केलं नाही तर पूर्णत: टाळेबंदी लागू करावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिला आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधत होते. नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करुन कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन त्यांनी केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आहेत. गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या, कोविड 19 आजाराच्या साथीनंतरचा पंतप्रधानांचा हा पहिला परदेश दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान ते बांग्लादेश स्थापनेचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान बांग्लादेशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद आणि पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेणार असून, उभय नेत्यांदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

****

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच्या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे.

****

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाराष्ट्राविरोधात कुभांड रचत आहेत, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वेळ पडली तर सरकारनं फडणवीस यांचीही चौकशी करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

****

दिल्ली इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत, २५ मीटर पिस्तुलाच्या सांघिक प्रकारात भारताच्या तीन महिला खेळाडूंना सुवर्ण पदक मिळालं. यात महाराष्ट्राच्या राही सरनोबत हिच्यासह चिंकी यादव आणि मनू भाकेर यांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारतीय संघ २१ पदकांसह पदकतालिकेत आघाडीवर आहे.

****

मराठवाड्यात काल नव्या चार हजार ५६१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४४ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १८, नांदेड जिल्ह्यातल्या नऊ, जालना सात, परभणी पाच, बीड तीन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

****

 

 

No comments: