Wednesday, 31 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 March 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.

****

४५ वर्षांवरील सर्व नागरीकांना उद्यापासून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. कोविन ॲप वर किंवा लसीकरण केंद्रावर जाऊन नागरीकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत सहा कोटी ३० लाख नागरीकांना कोविड लस देण्यात आली. 

****

देशाचा कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. काल दिवसभरात ४१ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत, जवळपास एक कोटी १४ लाख रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. देशात काल नव्या ५३ हजार रुग्णांची नोंद झाली, तर ३३५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे देशभरातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या, एक कोटी दहा लाख झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, एक लाख ६२ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये, देशातल्या एकूण रुग्णसंख्येच्या ७९ टक्के रुग्ण आहेत. देशभरात सध्या पाच लाख ५२ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

केंद्र सरकारनं वर्तमान वित्त वर्षासाठी ग्राह्य भरपाई म्हणून, राज्यांना वस्तू आणि सेवा कराची ३० हजार कोटी रुपयांची भरपाई दिली आहे. त्यामुळे वर्तमान वर्षात आतापर्यंत ७० हजार कोटी रुपये भरपाईची रक्कम राज्यांना देण्यात आली आहे. या वर्षात जीएसटी भरपाई मंजूर करण्यातली दरी भरुन काढण्यासाठी, एक लाख दहा हजार २०८ कोटी रुपयांचे आधार कर्ज देखील, जीएसटी परिषदेच्या निर्णयानुसार मंजूर करण्यात आले आहेत.

****

ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागणाऱ्या आवश्यक त्या परवानग्यांची सवलत, केंद्र सरकारनं आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली. कोविड १९ महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, राज्यांमध्ये ऑक्सिजनची वाहतूक करणं यामुळे सुलभ होणार असून, कोविड विरुद्धचा लढा आणखी मजबूत करता येईल, असं गडकरी म्हणाले.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातल्या महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रभावी उपाययोजना राबवल्याबद्दल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे कांस्य पदक आणि दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे.  जिल्ह्याच्या क्षयरुग्णांच्या संख्येत २०१५ नंतर २० टक्के घट झाल्याबाबद्दल, या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी देशातून ७२ जिल्हे आणि  महाराष्ट्रातून ११ जिल्हे नामांकित झाले होते.

****

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आणखी ५३ खेळाडूंना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला आहे. यामध्ये प्रार्थना ठोंबरे, राहुल आवारे, हिना सिद्धु, मधुरिमा पाटकर, किसन तडवी, मोनिका आथरे आदी खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना प्रत्येकी सुमारे ७७ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. मिशन ऑलिम्पिक २०२० अंतर्गत राज्यातल्या खेळाडूंना किमान २० पदकं मिळावी यासाठी राज्य सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

****

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या "स्मार्ट कार्ड" योजनेला ३० सष्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

****

राज्यातल्या सुमारे ६० टक्क्याहून अधिक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकबाकीची रक्कम अदा केली असल्याची माहिती, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. प्रमाणापेक्षा अधिक थकबाकी ठेवणाऱ्या १३ कारखान्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी सर्वाधिक रक्कम दिली असून, काही कारखाने अजूनही चालू आहेत, त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांना ठरलेल्या करारानुसार उसाची रक्कम दिली जात असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

****

लातूर जिल्ह्यात रमाई घरकुल निर्माण समितीअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला असून, याबाबतचा विस्तृत तपशील तातडीनं पाठवण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. लातूर जिल्हा रमाई घरकुल निर्माण समितीची आढावा बैठक मंत्रालयात झाली, या बैठकीत सन २०१९ - २० या वर्षातील शिल्लक उद्दिष्टानुसार, दोन हजार ९१५ प्रस्तावांना, तर २०२० - २१ मधल्या सहा हजार ८२७ उद्दिष्टापैकी एक हजार ६४५ प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली.

//********//

 

No comments: