Thursday, 25 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 March 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 March 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.

****

केंद्र सरकार आणि सर्वच राज्यांनी मराठा आरक्षण प्रकरणात अनुकूल भुमिका घेतली असल्याचं मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. आरक्षणाबाबत राज्यांचे अधिकार सुरक्षित रहावेत आणि ५० टक्के मर्यादेचा फेरविचार व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील होतं, असं त्यांनी ट्विट संदेशात सांगितलं. मराठा आरक्षणाबाबत लवकरच निर्णय होईल, असं चव्हाण म्हणाले.

****

मुंबई - दिल्ली या तेराशे किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाला ईलेक्ट्रीक महामार्ग करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते आज लोकसभेत प्रश्नोतराच्या तासात बोलत होते. या महामार्गावर ट्रक आणि बसेस या १२० किलोमीटर प्रतितास वेगानं वीजेवर धावू शकतील. या ई - महामार्गामुळे वेळ वाचून वाहतुकीचा खर्च ७० टक्के कमी होणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रांमधलं अंतर वाढवण्यात आलं असून, कोवॅक्सीन लसीच्या मात्रांमधलं अंतर वाढवलेलं नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत देशातल्या कोविड परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर ९५ पूर्णांक ४९ शतांश टक्के असून, आतापर्यंत एक कोटी १२ लाख पाच हजार १६० रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसात महाराष्ट्र आणि पंजाबमधली होत असलेली रुग्ण वाढ चिंताजनक असल्याचं, भूषण यांनी सांगितलं. देशातली उपचाराधीन रुग्णांची संख्या तीन लाख ६८ हजारांवर गेली असून, यात दोन लाख ३१ हजार ९४२ रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत. सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण असलेल्या देशातल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले नऊ जिल्हे आहेत. यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दरम्यान, ५० लाख कोविड प्रतिबंधात्मक लसीचे मात्रा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक लोकांना लसीकरण करण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांची संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आजपासून चार एप्रिल पर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. मध्यरात्री पासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीला नागरिकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबादचे पालक मंत्री सुभाष देसाई जिल्ह्याचा कोरोना विषाणू संसर्ग आणि महापालिका विकास कामांचा आज आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.

****

राज्यातले वृद्ध कलाकार आणि साहित्यिक मानधन योजनेतल्या सुमारे २८ हजार पात्र मानधन धारकांच्या खात्यात येत्या आठ दिवसांत मार्च अखेर पर्यंतचं मानधन जमा होईल, असं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या कलाकारांच्या पाठीशी सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

नांदेड शहरातल्या शिवाजी नगर औद्योगिक वसाहतीत असलेल्या पालदेवार ऑईल मील मध्ये आज सकाळी आग लागली. अग्निशमक दलानं वेळीच आग नियंत्रणात आणली, आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही.

****

नांदेड जिल्ह्यात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांच्या फिरत्या वाहनाद्वारे प्रचार - प्रसिद्धीच्या उपक्रमाचं काल जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं. जिल्ह्यातल्या १६ तालुक्यात दोन वाहनांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

****

मध्य रेल्वेमधल्या स्थानकांवर यांत्रिक सिग्नलिंग यंत्रणा काढून त्या ऐवजी इलेक्ट्रोनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे नांदेड - पनवेल - नांदेड रेल्वे आज आणि उद्या रद्द करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयाच्या तीन दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प ज्येष्ठ साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर हे आज गुंफणार आहेत. ‘फुले - शाहू- आंबेडकरांना अभिप्रेत महाराष्ट्र’ या विषयावर ते आपले विचार मांडतील. दररोज सायंकाळी साडे पाच वाजता देवगिरी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर या व्याख्यानमालेत नागरिकांना सहभागी होता येणार आहे.

****

वाईनरी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं राबवलेल्या धेारणानुसार मुल्यवर्धीत कराच्या अनुषंगाने थकीत असलेला ४० कोटी रूपयांचा परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील विविध वायनरींना होणार असून त्यांनाही शेतकऱ्यांची थकीत रक्कम देणं सुलभ हेाणार आहे.

****

सांगली जिल्ह्यात नागजफाटा इथं दहा लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात यासंबंधीचा गुन्हा दाखल झाला.

//**************//

No comments: