Monday, 29 March 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.03.2021 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 March 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मार्च २०२१ सायंकाळी .१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.

****

·      देशभरात आतापर्यंत सहा कोटी पाच लाख ३० हजार नागरिकांचं कोविड लसीकरण

·      एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट या चित्रकला परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      कोविडवर नियंत्रणाच्या नावाखाली टाळेबंदीला भाजपचा विरोध

·      औरंगाबाद इथं आज घाटी रुग्णालयात दहा कोविडग्रस्तांचा मृत्यू

आणि

·      नांदेड जिल्ह्यात वाढता कोविडसंसर्ग पाहता गृह विलगीकरणाची सुविधा बंद

****

देशभरात आतापर्यंत सहा कोटी पाच लाख ३० हजार नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. देशात सध्या कोविड बाधितांची एकूण संख्या एक कोटी २० लाख ३९ हजार ६४४ झाली आहे. यापैकी एक कोटी १३ लाख ५५ हजार ९९३ रुग्ण पूर्ण बरे झाले असून, ५ लाख २१ हजार ८०८ सक्रीय रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ६१ हजार ८४३ वर पोहोचली आहे. सध्या कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ३२ शतांश टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, देशातल्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ८५ टक्के रुग्ण महाराष्ट्रासह एकूण आठ राज्यातले असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्रात काल सर्वाधिक ४० हजार ४१४ नवे रुग्ण आढळले, त्याखालोखाल केरळमध्ये तीन हजार ८२ तर पंजाबमध्ये दोन हजार ८७० रुग्ण आढळले असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट या चित्रकला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात या परीक्षांचे अतिरिक्त गुण मिळणार नाहीत. तसंच विविध सामायिक प्रवेश परीक्षा- सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल मिळणारे अतिरिक्त गुण दिले जाणार नाहीत. पुढच्या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट ठेवू नये असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्यातल्या एक हजार २४ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वास्तुकला, वैद्यकीय, कृषी, विधि अशा विविध पदवी, पदविका तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचं शुल्क ठरवण्यात आलं असून, त्याची माहिती शुल्क नियामक प्राधिकरणानं संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना पोटात वेदनेच्या तक्रारीनंतर मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. परवा ३१ मार्चला त्यांच्यावर एण्डोस्कोपी केल्यानंतर पुढे शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती मलिक यांनी दिली. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पवार प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

****

पालघर जिल्ह्यात एकाच घरातल्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोन मुलं गंभीर जखमी झाले. मोखाडा तालुक्यात ब्राम्हणगाव इथं आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना झाली. घराला लागून असलेल्या दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यानं, दुकान आणि घरात आग पसरली. मृतांमध्ये तीन महिलांसह एका मुलाचा समावेश आहे. दुर्घटनेत जखमी दोन मुलांवर नाशिकच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी नक्षलविरोधी अभियानादरम्यान झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी मारले गेले. कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा-हेटळकसा जंगलात ही कारवाई झाली, मृतांमध्ये ३ पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

****

कोविडच्या वाढत्या संख्येवर टाळेबंदी हे उत्तर नाही, मात्र कोविडवर नियंत्रणाच्या नावाखाली राज्य सरकार टाळेबंदी लागू करणार असेल, तर त्याला कडवा विरोध असेल, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे‌. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास, मातोश्रीवर बसून कसा कळणार? अशी टीकाही पाटील यांनी केली. टाळेबंदीनंतरच्या गेल्या वर्षभरात राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी एक रुपयाचीही मदत महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलेली नाही. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना, राज्य सरकार पुन्हा टाळेबंदी लावण्याच्या मानसिकतेत असेल, तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. कोरोना संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणं, सतत हात सॅनिटायझर आणि साबणानं हात सतत स्वच्छ ठेवणं, तसंच सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराचं पालन करणं आवश्यक आहे. त्यामुळे रात्रीच्या संचारबंदीसारखे उपाय चालू शकतात. मात्र, पूर्णतः लॉकडाऊन करून काहीही साध्य होणार नाही, असं पाटील यांनी नमूद केलं.

****

धुलिवंदन - धुळवडीचा सण आज कोविडचे निर्बंध पाळत मर्यादित रुपात साजरा झाला. परभणी इथं अनेक भागातील नागरिक, महिला तसंच लहानग्यांनीही आपल्या कुटूंबातच रंग खेळून धुळवडीचा सण साजरा केला.

*****

औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात एका कोविड रुग्णाचा शौचालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुलाबराव ढवळे असं रुग्णाचं नाव असून ते सुमारे साडेचार तास शौचालयात पडून होते. रात्रीच्या सुमारास शौचालयात गेलेले ढवळे, बराच वेळ होऊनही बाहेर न आल्यानं, इतर रुग्णांनी तक्रार केल्यानंतर शौचालयाचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आलं. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. चक्कर येऊन बेशुद्ध झाल्यावर, प्राणवायूची पातळी कमी झाल्यानं, त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज दहा कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा स्त्रिया तर चार पुरुषांचा समावेश आहे. एक पुरुष जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव इथला असून, उर्वरित नऊ मृत रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत.

दरम्यान, घाटी रुग्णालयात आज सकाळच्या सत्रात ७६ नवे कोविड रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याचं, रुग्णालयाकडून जारी पत्रकात सांगण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात येत्या ८ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. आज रात्री बारा वाजेनंतर संचारबंदी सुरू होईल, ती आठ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असेल. याकाळात सर्व सार्वजनिक ठिकाणं, उपाहारगृहं, शॉपिंग मॉल्स बंद राहतील. किराणा दुकानं, मांस तसंच अंडी विक्री सकाळी ८ ते दुपारी १२, तर दूध, फळं आणि भाजीपाला विक्री सकाळी ६ ते ११, सुपर मार्केट तसंच मॉल्स फक्त किराणा आणि भाजी तसंच फळविक्रीसाठी सकाळी ८ ते १२ यावेळेत खुली राहतील.

या संचारबंदीच्या काळात सर्व प्रकारचे उद्योग, रुग्णालयं, औषध विक्री आणि वितरण, ई कॉमर्स सेवा, वर्तमानपत्रं, आरक्षित प्रवासी वाहतुक, एसटी तसंच खासगी बस द्वारे रात्रीची वाहतुक, सर्व बँका तसंच शासकीय कार्यालयं सुरू राहणार आहेत. वाहन दुरुस्तीची दुकानं आणि वाहनांचे सुटे भाग पुरवणारी दुकानं सकाळी ८ ते १२ या वेळेत सुरू राहतील. पेट्रोल तसंच डीझेल विक्री फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठीच सुरू असेल, असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कोविड रुग्णांचं गृह विलगीकरणाची सुविधा बंद करण्यात येत असून, बाधित रूग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी ही माहिती दिली. बाधित रुग्णांना गृहविलगीकरणात उपचार घेण्यास परवानगी दिल्यामुळे, संबंधित कुटुंबातल्या अन्य व्यक्ती कोविड बाधित होण्याचं प्रमाण वाढलं आहे, यामुळे हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. यासाठी महापालिकेनं नांदेड शहरात चार ठिकाणी विलगीकरण केंद्र सुरु केली आहेत. याशिवाय शहरातली हॉटेल्स आणि लॉज मालकांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी दर्शवली, तर त्यांना तत्काळ परवानगी देण्यात येईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

सोलापूर शहरातल्या भाजी मंडईतले १८ भाजी विक्रेते कोविड बाधित असल्याचं निष्पन्न झालं आहे. सर्व भाजी विक्रेत्यांनी कोविड तपासणी करून घेण्यासाठी ७ दिवसाची मुदत देण्यात आली होती, त्या सुमारे साडे तीनशे भाजी विक्रेत्यांच्या तपासणीतून ही बाब समोर आली आहे. कोविड तपासणी केल्याशिवाय भाजी विक्रेत्यांनी व्यवसाय करून नये, कोविड संसर्ग नसल्याचा अहवाल सोबत बाळगावा, असे निर्देश आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.

****

परभणी जिल्ह्याच्या पाथरी शहरात सुमारे पाच लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असून एकाला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे सेलू कॉर्नर परिसरातल्या एका गोदामातून गुटख्याची पोती जप्त केली. बाजारभावानुसार या गुटख्याची किंमत चार लाख ८० हजार २४० रुपये असल्याचं समजतं. पोलिसांनी या प्रकरणी अवेस खान नावाच्या इसमाला अटक केली असून, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

****

No comments: