Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 24 March 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मार्च २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांची संख्या पुन्हा एकदा
वाढू लागली आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे.
प्रत्येक नागरीकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय
असलेल्या नागरीकांनी न घाबरता लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा
अवलंब करा. नाका -तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा.
****
** कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शब ए बारात,
बिहू, ईस्टर आणि ईद उल फित्रच्या सणानिमित्त मोठ्या संख्येनं लोकांना एकत्रित येण्यावर बंदी घालण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
** बीड जिल्ह्यात उद्या मध्यरात्रीपासून चार
एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत टाळेबंदी घोषित तर नांदेड जिल्ह्यात उद्यापासून
अकरा दिवस टाळेबंदी
** औरंगाबाद जिल्ह्यात आज
उपचारादरम्यान १९ कोविड बाधितांचा मृत्यू
** मनसुख हिरेन हत्या
प्रकरणाचा तपास राष्ट्रीय
तपास यंत्रणेकडे सोपवण्याचे ठाणे सत्र न्यायालयाचे आदेश
आणि
** मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर
सिंह यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला
****
केंद्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
शब ए बारात, बिहू, ईस्टर आणि ईद उल फित्रच्या सणानिमित्त लोकांना मोठ्या संख्येनं एकत्रित
येण्यावर बंदी घालण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे. यासंदर्भात कोणताही हलगर्जीपणा
केला जाऊ नये, अन्यथा कोविडची साथ रोखण्यासाठी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांवर पाणी
फेरले जाईल, असं या पत्रात म्हटलं आहे.
****
वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाला
रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात दहा दिवसांची टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. उद्या मध्यरात्रीपासून चार
एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत ही टाळेबंदी राहणार असल्याचं जिल्हाधिकारी रविंद्र
जगताप यांनी सांगितलं. ते म्हणाले…
त्याच्यामध्ये सगळ्या अस्थापना हे पूर्णपणे बंद राहतील.
सकाळचे नऊ वाजल्या पासून दुध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, यांच्यासाठी वेगवेगळा वेळ
नेमून दिला आहे. लसीकरण आणि आपली जी तपासणी आहे ती व्यवस्थित चालू राहील.आरोग्य सेवा
सगळ्या चालू राहतील.त्याच्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी आपण एक एक पेट्रोलपंप चालू ठेवणारे
आहे.बीडला गावामध्ये आपले दोन पेट्रोल पंप हे चालू राहतील. आत्यावश्यक ज्या सेवा आहेत
त्यासर्व सुरु राहतील. शासकीय सर्व कार्यालये सुरु राहतील. शासकीय बांधकामं जी आहेत
ती चालु राहतील.ज्या ठिकाणी कारखान्यांमध्ये आतामध्ये कर्मचारी असून त्यांच्या जेवनाची,
राहण्याची व्यवस्था असेल त्याठिकाणी ते कारखाने चालू राहतील. अशा पद्धतीनं हा आपला
लॉकडाऊन असेल.
जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या या टाळेबंदीला वंचित बहुजन आघाडीनं विरोध केला असून जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर टाळेबंदीच्या विराधोत घोषणाबाजी केली.
टाळेबंदीमुळे गोर-गरिबांचे हाल होणार असून त्यांच्या दोन वेळेच्या अन्नाची
व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या प्राध्यापक
शिवराज बांगर, मोहन जाधव,
राजेंद्र कोरडे यांच्या सह काही कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतलं.
दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभरात
२९९ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये बीड
१०४, अंबाजोगाई ८०, केज ३०, माजलगाव १९, गेवराई १६, आष्टी
१५, परळी १४, पाटोदा सात, वडवणी चार तसंच धारुर आणि शिरुर इथल्या प्रत्येकी चार रुग्णांचा समावेश
आहे. याबरोबर जिल्ह्यातली एकूण रुग्ण
संख्या आता २३ हजार ९८ झाली आहे.
****
परभणी जिल्ह्यातही आज सायंकाळी सात वाजल्यापासून ते एक एप्रिलच्या सकाळी
सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीतून काही आवश्यक
सेवा आणि कामांना सवलत देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर यांनी दिली. यात शासकीय - निमशासकीय कार्यालयं अधिकारी, कर्मचारी आणि
त्यांची वाहनं, आरोग्य सेवा, पेट्रोलपंप
- गॅस वितरक, किराणा
दुकानातून होणारी घरपोच सेवा, दुध विक्रेत्यांचं सकाळी सहा ते नऊ या कालावधीत दूध वाटप, स्पर्धा परीक्षेसाठीच्या अभ्यासिका, वाचनालय यातील
विद्यार्थी - कर्मचारी, जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांचे अंतर्गत कामकाज आदींचा
समावेश आहे.
****
नांदेड जिल्ह्यातही उद्यापासून अकरा
दिवस टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. या काळात जीवनावशक
वस्तूचा तुटवडा भासू नये म्हणून नागरीकांनी आज बाजारपेठेत गर्दी केली. दरम्यान टाळेबंदीच्या काळात मेडीकल, वृतपत्र, दुध,
भाजीपाला, किराणा सामान, गॅस, खाण्याचे तयार पदार्थ, जीवनावशक
वस्तूचे घरपोच वितरण सेवांना सकाळी काही वेळ सुट देण्यात आली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या १९ कोविड बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे
जिल्ह्यात एक हजार ४८३ रुग्ण या विषाणू संसर्गानं दगावले आहेत. शासकीय वैद्यकीय
रुग्णालयात आज ७४ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची
संख्या ७० हजार ६२५ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात अधिक प्रमाणात रूग्ण आढळणारा भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करुन त्या ठिकाणी नियमांचं अधिक कडक पालन
करण्याचे निर्देश महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी आज दिले. कोराना संसर्ग आणि
प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा शिंदे यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
बाधिताच्या संपर्कातील व्यक्ती, अति जोखीम तसंच कमी
जोखमीच्या व्यक्ती या सर्वांच्या आरपीटीसीआर चाचण्या करण्याचे
निर्देशही शिंदे यांनी यावेळी दिले. रूग्ण संख्येच्या प्रमाणात उपचार सुविधा सज्ज
ठेवाव्यात. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची कंत्राटी पद्धतीनं
भरती करावी, असं शिंदे यांनी यावेळी सूचित केलं.
****
लातूर शहरात कोरोना विषाणू संसर्गाची आरटीपीसीआर
चाचणी केलेल्यांनी अहवाल येईपर्यंत घरातच विलगीकरणात रहावं अन्यथा कारवाई करण्यात
येईल असा इशारा महापालिकेनं दिला आहे. हा
अहवाल येण्यासाठी एक दिवस लागतो. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे
तपासणीसाठी आलेल्या संशयितांकडून कोरोना विषाणू संसर्ग फैलावाचा धोका आहे.
****
देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून, न्यायमूर्ती एन व्ही रमण यांच्या
नावाची शिफारस करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ येत्या
२३ एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरु केली होती. केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे
यांना यासंदर्भात पत्र पाठवलं होतं. त्यानुसार त्यांनी एन व्ही रमण यांच्या नावाची
शिफारस केली आहे.
****
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा -
एनआयएला सोपवण्याचे आदेश ठाणे सत्र न्यायालयानं आज दिले. केंद्र सरकारनं हे प्रकरण एनआयएकड़े सोपवण्याचे
आदेश यापूर्वीच दिले होते. मात्र दहशतवाद विरोधी पथक- एटीएसनं हा तपास एन आय ए कडे सोपविला नव्हता. एनआयएने हा तपास आपल्याकडे हस्तांतरीत करण्याची मागणी ठाणे न्यायालयात केली होती. एनआयएची मागणी मान्य करत
न्यायालयानं या प्रकरणाची सर्व कागदपत्रं एनआयएकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर
याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या विनायक सुर्वे आणि क्रिकेट
बुकी नरेश गोर या दोघांचाही ताबा एनआयएकडे देण्याचे निर्देश न्यायालयाने
दिले आहेत.
****
सर्वोच्च न्यायालयानं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर
सिंह यांची याचिका दाखल करुन घेण्यास नकार देत त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या गैरव्यवहारांची केंद्रीय
गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी. मुंबईच्या
पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेली बदली रद्द करण्यात यावी आणि पुढील
कारवायांपासून संरक्षण मिळावं, अशा मागण्या सिंह यांनी याचिकेत
केल्या होत्या. त्यांच्या या याचिकेवर आज सर्वोच्च
न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी
झाली. याचिकेत गृहमंत्र्यांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर
असल्याचं सांगत न्यायालयानं या प्रकरणी मुंबई उच्च
न्यायालयात जाण्यासाठी याचिका मागे घेण्यास अनुमती दिली.
****
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील
भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांची भेट घेऊन गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यात घडलेल्या विविध घटनांची माहिती दिली. या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलतांना
फडणवीस यांनी या सर्व प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं
मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट असल्याचं सांगितलं. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली रॅकेटवर सरकारनं काय कारवाई केली, याचा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी
मागणी केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. शंभरहून अधिक
मुद्दे राज्यपालांच्या निर्दर्शनास आणून दिल्याचं, फडणवीस
म्हणाले.
//*************//
No comments:
Post a Comment