Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 March 2021
Time 7.10am to 7.25am
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २८ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा
एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत
आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक
वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ
उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा,
वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** कोविड प्रतिबंधासाठी राज्यभरात लागू निर्बंधांना १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ
** हिंगोली जिल्ह्यात उद्यापासून तर औरंगाबाद
जिल्ह्यात परवापासून संचारबंदी
** नांदेड शहरात लागू टाळेबंदीला तिसऱ्या दिवशीही नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
** राज्यात नवे ३५ हजार ७२६ कोविडग्रस्त;
मराठवाड्यात ६७ रुग्णांचा मृत्यू तर नव्या चार हजार ६६९ रुग्णांची नोंद
आणि
** वीज देयकं वसुलीत अडथळे निर्माण केल्यास कठोर कारवाई
- उर्जा मंत्री नितीन राऊत यांचा इशारा
****
कोविड प्रतिबंधासाठी राज्यभरात लागू निर्बंधांची मुदत १५ एप्रिल
पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यभरात आजपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याची सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जमावबंदी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना एक
हजार रुपये, तर मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येईल. आज साजरा होणारा होलिकोत्सव,
आणि उद्यापासून पुढे आठवडाभर येणारे शब ए बारात, धुलिवंदन, गुडफ्रायडे, रंगपंचमी, ईस्टर
संडे, वगैरे सण साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे. गृहविभागाने
यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करून, मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोणत्याही
प्रकारे गर्दी होणार नाही, शारीरिक अंतराच्या नियमाचं तंतोतंत पालन होईल याकडे लक्ष
द्यावं, मोठ्या स्वरुपाचे धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. पोलिस
प्रशासन, तसंच स्थानिक प्रशासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याची सूचना, या पत्रकातून
केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच धुलिवंदनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत हे सण साधेपणाने साजरे करावेत. कोरोना विषाणू
प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी धुलीवंदनाच्या
शुभेच्छा दिल्या आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात उद्या सोमवारपासून ४ एप्रिलपर्यंत
संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबतचे आदेश
काल जारी केले. या कालावधीत सर्व प्रकारच्या हालचाली, आस्थापना, दुकानं, सर्व धार्मिक
स्थळं बंद राहतील. दूध विक्री आणि वितरण सकाळी ७ ते १० दरम्यान फक्त घरपोच सेवेसाठी
सुरू राहील. रुग्णालयं तसंच औषधी दुकानं आणि सर्व शासकीय कार्यालयं तसंच बँका सुरू
राहणार आहेत. पेट्रोल पंपांवरून फक्त शासकीय वाहनं तसंच अत्यावश्यक सेवेतल्या वाहनांनाच
इंधन पुरवठा होणार आहे. जिल्ह्यांतर्गत बस वाहतुक बंद असेल. बाहेरगावचे विद्यार्थी,
परजिल्ह्यातले अडकलेले नागरिक यांच्यासाठी परवानाधारक खानावळी तसंच उपाहारगृहांची पार्सल
सुविधा सकाळी ९ ते सायंकाळी ७ यावेळेत सुरू असेल, असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात परवा मंगळवारपासून येत्या ८ एप्रिलपर्यंत
संचारबंदी लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जारी केले आहेत. सोमवारी
मध्यरात्री बारा वाजेनंतर संचारबंदी आदेश लागू होईल, तो आठ एप्रिलच्या मध्यरात्री १२
वाजेपर्यंत लागू असेल. याकाळात सर्व सार्वजनिक ठिकाणं, उपाहारगृहं, शॉपिंग मॉल्स बंद
राहतील. किराणा दुकानं, मांस तसंच अंडी विक्री सकाळी ८ ते दुपारी १२, तर दूध, फळं आणि
भाजीपाला विक्री सकाळी ६ ते ११, सुपर मार्केट तसंच मॉल्स फक्त किराणा आणि भाजी तसंच
फळविक्रीसाठी सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत खुली राहतील.
या संचारबंदीच्या काळात सर्व प्रकारचे उद्योग, रुग्णालयं,
औषध विक्री आणि वितरण, ई कॉमर्स सेवा, वर्तमानपत्रं, आरक्षित प्रवासी वाहतुक, एसटी
तसंच खासगी बस द्वारे रात्रीची वाहतुक, सर्व बँका तसंच शासकीय कार्यालयं, सुरू राहणार
आहेत. वाहन दुरुस्तीची दुकानं आणि वाहनांचे सुटे भाग पुरवणारी दुकानं सकाळी ८ ते १२
या वेळेत सुरू राहतील. पेट्रोल तसंच डीझेल विक्री फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठीच
सुरू असेल, असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.
****
नांदेड शहरात लागू
करण्यात आलेल्या टाळेबंदीला काल तिसऱ्या दिवशीही
नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद
दिला. शहरातल्या मुख्य वसाहतींसह सर्वत्र शुकशुकाट पसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. टाळेबंदीच्या काळात औषधी दुकानं,
वृतपत्र, दूध, भाजीपाला, किराणा सामान,
गॅस, जीवनावशक वस्तुचं घरपोच वितरण
आदी सेवांना सकाळी काही वेळ सूट दिली जात आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात कालपासून एकूण
३७९ आरोग्य उपकेंद्रातून कोविड-19 लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ
विपिन ईटनकर यांनी ही माहिती दिली. काल ६ हजार ५०० लाभार्थींचं लसीकरण करण्यात आल्याचं,
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. लोहा तालुक्यातील किवळा आणि ढकणी आरोग्य उपकेंद्रातही
लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
****
बीड जिल्हा रुग्णालयातल्या
परिचारिका वसतीगृह तसंच आणि डोळ्याच्या रुग्णांच्या कक्षात कोविड कक्ष तयार करण्यात येणार आहे. अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राठोड यांनी ही माहिती दिली. बीड शहरातल्या १२ खासगी
रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी रुग्णखाटा आरक्षित करण्यात येणार आहेत.
****
राज्यात काल ३५ हजार ७२६ नव्या कोविड रुग्णांची
नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २६ लाख ७३ हजार ४६१
झाली आहे. काल १६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या
रुग्णांची एकूण संख्या, ५४ हजार ७३ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक दोन दशांश टक्के
झाला आहे. काल १४ हजार ५२३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २३ लाख
१४ हजार ५७९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८६
पूर्णांक ५८ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख तीन हजार ४७५ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार ६६९ कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ६७ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २८,
नांदेड जिल्ह्यातल्या १६, परभणी आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी आठ, लातूर तीन, तर बीड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ७१५ नवे रुग्ण
आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ७३, लातूर
४८३, जालना ४४०, बीड ३७५, परभणी २४६, उस्मानाबाद २२४, तर
हिंगोली जिल्ह्यात काल ११३ नवे रुग्ण आढळून आले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा
हा ७५ वा भाग आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना काल नवी दिल्लीत एम्स
रुग्णालयात काल दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून बाय पास शस्त्रक्रियेचा
सल्ला दिला आहे. परवा ३० तारखेला ही शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींची
प्रकृती स्थिर असून, प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे राष्ट्रपतींनी
एका ट्विटच्या माध्यमातून आभार मानले आहेत.
****
प्रसारभारतीच्या
डीटीएचअंतर्गत दूरदर्शन ‘फ्री डिश’च्या ग्राहकांची
संख्या ४ कोटीच्या पुढे गेली आहे. २०२०-२०२१ च्या यासंबधीच्या वार्षिक अहवालात ही बाब
स्पष्ट झाली आहे. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी हा टप्पा गाठल्याबद्दल आनंद व्यक्त
केला आहे.
****
महावितरण कंपनीच्या कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांना मारहाण
किंवा वीज देयकं वसुलीच्या कामात अडथळे निर्माण केल्यास, कठोर कारवाईचा इशारा उर्जा
मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगावचे आमदार मंगेश
चव्हाण यांनी जळगावचे अधिक्षक अभियंता यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाच्या पार्श्वभूमीवर
राऊत काल बोलत होते. कायदा हातात घेण्याऐवजी वीज देयकं भरून महावितरणला सहकार्य करण्याचं
आवाहन डॉ. राऊत यांनी केलं.
आमदार चव्हाण आणि अन्य कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर जाऊन अधीक्षक अभियंत्यांना दोरीनं खुर्चीला बांधलं होतं. या प्रकरणी आमदार चव्हाण यांच्यासह ३१ जणांना काल न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं सर्वांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या थकित वीज बिलापोटी कृषी पंपांची वीज तोडणी
तत्काळ थांबवावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. ते काल उस्मानाबाद
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या
नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणीही पाटील यांनी
केली, मंगळवारपर्यंत या दोन्ही मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास न्यायालयात दाद मागणार
असल्याचं राणा जगजीतसिंग पाटील यांनी सांगितलं.
****
लातूर महानगरपालिकेच्या वतीनं काल
शहरातल्या ९३१ दिव्यांग लाभार्थ्यांना
सहायता उपकरणांचं वाटप घरपोच करण्यात आलं. मूक-बधीर, अंध, शारीरिक अपंगत्व असणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार
लागणारी सहायता उपकरणं अलिमको या संस्थेतर्फे उपलब्ध करून
देण्यात आली आहेत. हे साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल, महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी संस्थेचे आभार व्यक्त
केले.
****
लोकशाही शासन व्यवस्थेत समाजातील शेवटच्या
घटकापर्यंत आर्थिक लाभ पोहोचले पाहिजेत, असं मत, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ जे एफ पाटील यांनी व्यक्त
केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठात झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन चर्चासत्रात 'डिस्ट्रिक्ट प्लानिंग फॉर टॅपिंग डेव्हलपमेंट पोटेन्शियल' या विषयावर
डॉ पाटील बोलत होते. सामाजिक
सम न्याय आणि आर्थिक सुबत्तेसाठी अधिक प्रभावी जिल्हा नियोजनाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
या चर्चासत्राचा काल समारोप झाला. मुंबई विद्यापीठातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर
संशोधन केंद्राच्या संचालक प्राध्यापक मनीषा कारणे समारोप सत्रात सहभागी झाल्या.
****
जागतिक रंगभूमी दिन काल
साजरा झाला. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालूक्यात सेलगाव इथं गेल्या शंभर वर्षापासूनची
नाट्यपरंपरा जोपासली जाते. शेतकरी, कामगार, तसंच विद्यार्थी दरवर्षी वेगवेगळी नाटकं
बसवून सादर करतात, असं सेलगावातले नागरिक आत्माराम राजेगोरे यांनी सांगितलं
****
परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुंढे यांच्यासह
कर्मचारी संजय भेंडेकर, आणि प्रेमदास पवार या तीन जणांना औरंगाबाद इथले रेल्वेचे पोलिस
अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी निलंबित केलं आहे. या तिघांनी ॲट्रोसिटीचा अर्ज मागे घेण्यासाठी
तसंच गंगाखेड रेल्वे स्थानकात उपाहारगृह चालवू देण्यासाठी एक लाख रुपये लाच मागितली
होती. त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची
कारवाई करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या दिग्रस इथली पूजा बालाजी किवंदे हिची
सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे. नांदेड जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस संजय भोसीकर
तसंच सामाजिक कार्यकर्त्या वर्षा भोसीकर यांच्या हस्ते पूजाचा सत्कार करण्यात आला.
****
नांदेड - अमृतसर विशेष एक्स्प्रेस आज नांदेड इथून सकाळी साडे नऊ
या नियमित वेळेऐवजी सुमारे अडीच तास उशीरा म्हणजे, दुपारी १२ वाजता सुटेल. दक्षिण मध्य
रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली.
****
दिल्ली इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज विजयवीर सिंधू आणि तेजस्विनी यांनी २५
मीटर रॅपिड फायर पिस्टल मिश्र गटात काल सुवर्णपदक पटकावलं.
//***************//
No comments:
Post a Comment