Sunday, 28 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 March 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 March 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मार्च २०२१ सायंकाळी .१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.

****

** राज्यात टाळेबंदीबाबत नियोजन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

** कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबादमध्ये १७ रुग्णांचा मृत्यू

** प्रसिद्ध गायक पंडित नाथराव नेरळकर यांचं निधन

आणि

** स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नव्या संकल्पपूर्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं `मन की बात`मध्ये आवाहन

****

राज्यातल्या कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्यान होणाऱ्या वाढीमुळे खाटा आणि इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून निर्बंधांच काटेकोर पालन होत नसल्यानं मर्यादित काळासाठी टाळेबंदीबाबत नियोजन करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. संसर्गासंदर्भातल्या कृती दलाची आज मुंबईत तातडीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसच मुख्य सचिव सीताराम कुंटे, कृती दलाचे डॉक्टर आणि प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी उपस्थीत होते. मर्यादित काळासाठी ही टाळेबदी असावी असं त्यांनी यावेळी नमुद केलं. ंसर्ग परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्यान घेत नाहीत. खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांच पालन होत नाही तसच विवाह समारंभात, बाजारपेठांमध्येही नियमांच पालन होताना दिसत नाही, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. लोकांच्या आरोग्याच संरक्षण करण याला आपलं प्राधान्य आहे, त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांच पालन कराव अन्यथा टाळेबंदी करावी लागेल हे लक्षात घेवून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांच नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर खूप ताण येत असून अशीच परिस्थीत कायम राहिल्यास सर्वसामान्य रुग्णांना उपचाराच्या अडचणी निर्माण होवू शकतात, असंही मुख्यमंत्री म्हणाले. कृत्रिम श्वासोश्वास प्रणाली पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील तसच प्राणवायू उत्पादन ८० टक्के वैद्यकीय आणि २० टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवाव, रुग्णालयांतल्या खाटांच्या बाबतीत ८०:२० प्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही तसच रुग्णांची गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.

****

राज्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून असून काल दोन लाख ३१ हजार २७७ लोकांनी कोविडची लस घेतली. राज्यात आतापर्यंत ५७ लाख ६२ हजार ६०१ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. मराठवाड्यात काल २४ हजार १०२ लोकांनी लस घेतली. यात औरंगाबाद इथं ५ हजार ४९४, बीड ५ हजार ४४६, परभणी १हजार ७०३, जालना ६४४, नांदेड ७ हजार ४१९, हिंगोली ८४७, उस्मानाबाद २ हजार ५४९ नागरिकांनी लस घेतली. मराठवाड्यात आतापर्यंत ६ लाख ४८ हजार ७९१ लोकांनी लस घेतली आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरातली लसीकरण केंद्रं आज सुरू होती आणि उद्या सोमवारी धुलिवंदनाच्या दिवशीही सुरु ठेवण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज १७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात लागू सप्ताहांत संपूर्ण टाळेबंदीला दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनधारकांना आज काही पेट्रोलपंपांवर इंधन मिळत नव्हतं तर काही ठिकाणी वाहन धारकांच्या लांबच लांब रांगा होत्या. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना ओळखपत्र दाखवून इंधन देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश असतांनाही काही पेट्रोलपंप चालक इंधन देण्यास नकार देत असल्याचं दिसून आलं.

****

ीड जिल्ह्यात आज दुपारपर्यंत २८४ नव्या कोरोना विषाणू बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ७३, आष्टी ३०, बीड ५९, धारुर ८, गेवराई ५, केज १३, माजलगाव ३२, परळी ३७, पाटोदा १७, शिरुर ६ तर वडवणी तालुक्यातील ४ बाधितांचा समावेश आहे.

****

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांचं आज औरंगाबाद इथं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतलेल्या नाथरावांनी औरंगाबाद इथं सरस्वती भूवन महाविद्यालय तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संगीत विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली, उत्तम शिष्यवर्ग त्यांनी तयार केला. संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना संगीत नाटक अकादमीसह राज्य शासनाचा कलादान पुरस्कार, मुंबई राज्य नाट्य महोत्सव श्रेष्ठ अभिनेता पुरस्कार तसंच २००२ सालच्या औरंगाबाद भूषण पुरस्कार, अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नाथरावांच्या निधनानं मराठवाड्याच्या संगीत क्षेत्राचा आधारवड हरवल्याची भावना संगीत रसिकांमधून व्यक्त होत आहे.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काहीतरी नवीन संकल्प करून तो पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज आकाशवाणीवरुन, `मन की बात` या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधताना बोलत होते. या मालिकेतला हा पंच्च्याहत्तरावा भाग असल्याचंही त्यांनी या निमित्त आवर्जुन सांगितलं. आता कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लस आली आहे. मात्र तरीही कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे, याची आठवण त्यांनी करून दिली. ही लस सर्वांनी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. एकंदरच क्रीडा, शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंत, सशस्त्र दलांपासून विज्ञान आणि तंत्रज्ञानांपर्यंत सर्व क्षेत्रांमधे देशाच्या कन्या उत्तम कामगिरी करत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. होळी तसंच आगामी गुढीपाडवा, बैसाखी, रामनवमी, ईस्टर इत्यादी सणांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. १४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, हा दिवस आपल्या घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांचं स्मरण करुन देतो, यावेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा दिवस आणखी खास बनला आहे. बाबासाहेबांची जयंती आपण संस्मरणीय बनवूया, आपल्या कर्तव्यांचा संकल्प करून त्यांना आदरांजली वाहूया, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

****

देशात कोणकोणता माल, उत्पादन आयात केला जातो, याची माहिती घेऊन आयातीला भारतीय पर्याय निर्माण करून आयात रोखणं आणि निर्यात वाढवणं तसंच कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातली अर्थव्यवस्था अधिक मजबूत करणं म्हणजे आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार होईल, असं प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. अनिवासी भारतीय उद्योजकांशी दूर दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात दोन ते तीन उद्योग सुरु करण्याचा आपला प्रयत्न असून गायीच्या शेणापासून निर्माण होणाऱ्या पेंटचा उद्योग प्रत्येक गावात सुरु व्हावा असं त्यांनी नमुद केलं. इथेनॉलच्या पंपालाही आता मान्यता आहे. लवकरच चार चाकी वाहनांना फ्लेक्स इंजिन आणण्याचा आपला प्रयत्न असून या इंजिनामुळे इथेनॉल आणि पेट्रोल दोन्हीवर वाहन चालणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होळी आणि धुलिवंदनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा कोरोनाचे सावट कायम असल्यानं सर्वांनी आपल्या घरीच हा सण साजरा करावा आणि पर्यावरणाचं रक्षण करावं, असं आवाहन राज्यपालांनी शुभेच्छा संदेशात केलं आहे. परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणानं साजरे करावेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला होळीचा सण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना विषाणू संसर्ग तपासण्या करून घेण्यास पुढं यावं, असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही नांदेड शहरा लगतच्या गंगाबेट, भणगी, वाहेगाव, बेटसावंगी, पिंपळगाव निमजी या परिसरात गोदावरी नदी पात्रातून दिवस रात्र वाळू उपसा करण्यात येत आहे. याकडे जिल्हा प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी या भागातील नागरीकांनी केली आहे.

****

भारतानं पुण्यामध्ये सुरू असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी ३३० धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं तीन षटकांत दोन बाद २८ धावा केल्या आहेत. फलंदाजी लादण्यात आलेल्या भारतीया संगाचा डाव ४८ षटकं आणि दोन चेंडुंमध्ये ३२९ धावांमध्ये संपुष्टात आला. ऋषभ पंतच्या ६२ चेंडुंमधील ७८, शिखर धवनच्या ५६ चेंडुंमधल्या ६७, हार्दिक पंड्याच्या ४४ चेंडुंमधे ६४ धावांचा यात समावेश होता. मार्क वूडनं तीन आणि आदील रशीदनं दोन गडी बाद केले.

****

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युसूफ पठाणला कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाली आहे. त्यानं सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे ही माहिती दिली आहे.

//*********//

 

No comments: