Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
29 March 2021
Time
1.00pm to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २९ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.
****
राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एलिमेंटरी
आणि इंटरमीडिएट या चित्रकला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात या परीक्षांचे अतिरीक्त गुण
मिळणार नाहीत. तसंच विविध सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या परीक्षा उत्तीर्ण
केल्याबद्दल मिळणारे अतिरीक्त गुण दिले जाणार नाहीत. २०२० - २१ या शैक्षणिक वर्षात
कला शिक्षण प्रशिक्षण पदविका - एटीडी आणि मूलभूत अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही,
इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीतून सूट देण्यात आली आहे. केवळ याच वर्षाकरता
ही सूट देण्यात आली आहे. तसंच पुढच्या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी या परीक्षा उत्तीर्ण अट ठेवू नये असं सरकारनं स्पष्ट
केलं आहे.
****
देशभरात आतापर्यंत सहा कोटी पाच लाख ३० हजार ४३५ जणांना कोरोना
प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून ७१ दिवसांत
लसीकरणाची संख्या सहा कोटींच्या पुढे गेली आहे.
दरम्यान, देशात काल नव्या ६८ हजाराहून अधिक कोविड बाधितांची नोंद
झाली, तर २९१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण रुग्णांची संख्या
एक कोटी २० लाख ३९ हजार ६४४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ६१ हजार ८४३
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ३२ हजार २३१ रुग्ण बरे झाले, रुग्ण बरे होण्याचा
दर ९४ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. देशात सध्या पाच लाख २१ हजार ८०८ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश
आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये दररोज मोठ्या संख्येनं कोरोना विषाणू बाधितांची नोंद
होत आहे.
गेल्या २४ तासांत ८१ पुर्णांक ४६ शतांश टक्के नव्या बाधितांची
नोंद या सात राज्यात झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिवांनी काल १२ राज्यातल्या आरोग्य
आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव, आणि आरोग्य विभागातल्या इतर सचिवांबरोबर
आढावा बैठक घेतली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या १५ हजार ६६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात काल नव्या एक हजार ३९९ रुग्णांची नोंद झाली, तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातली एकूण कोविड बाधितांची संख्या ७८ हजार ७४९ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत
एक हजार ५८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एक हजार २७० रुग्ण बरे झाले असून, जिल्ह्यात
आतापर्यंत ६१ हजार ४९८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोनाविषाणू बाधित रुग्णांना गृहविलगीकरणात
उपचार घेण्यास परवानगी दिल्यामुळे त्या रूग्णाच्या कुटुंबातल्या व्यक्ती कोरोना बाधित
होण्याचं प्रमाण वाढलं आहे. या कारणाने नांदेड जिल्ह्यातल्या बाधित रूग्णांची संख्या
वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे, अशी माहिती, जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर
यांनी दिली आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद करण्यात येत असून, कोरोना विषाणू संसर्ग
बाधित रूग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
यासाठी महापालिकेनं नांदेड शहरात चार ठिकाणी विलगीकरण केंद्र सुरु केलं आहे. याशिवाय
शहरातल्या हॉटेल्स आणि लॉज मालकांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी दर्शवली
तर त्यांना तात्काळ परवानगी देण्यात येईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा बलाच्या जवानांनी
काल मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारुगोळा जप्त केला. सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीच्या
आधारे शोधमोहीम राबवण्यात आली, यावेळी पाच एके ४७, सात पिस्तुलं, आणि दारुगोळा सापडला.
लीपा खोऱ्यात सीमा रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याच्या चौकीजवळ ही साठा सापडला.
****
बालताल आणि चंदनबाडीमार्गे होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी
एक एप्रिलपासून सुरु होणार आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट श्री अमरनाथजी श्राईन
डॉट कॉम या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ५६ दिन चालणारी ही यात्रा २८ जून ला
सुरु होणार असून, २२ ऑगस्टला संपणार आहे.
****
राज्यातल्या एक हजार २४ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी
येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. काल शुल्क नियामक प्राधिकरणाकडून
ही माहिती देण्यात आली. शुल्क नियामक प्राधिकरणाद्वारे उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग,
वैद्यकीय शिक्षण विभाग आणि कृषी विभागातल्या अभ्यासक्रमांचं शैक्षणिक शुल्क निश्चित
केलं जातं. त्याअंतर्गत आगामी २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, व्यवस्थापन,
वास्तुकला, वैद्यकीय, कृषी, विधि अशा विविध पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे
शुल्क ठरवण्यात आलं असून, त्याची माहिती शुल्क नियामक प्राधिकरणानं संकेतस्थळावर प्रकाशित
केली आहे.
//**************//
No comments:
Post a Comment