Tuesday, 30 March 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.03.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

दिनांक ३० मार्च २०२१

****

ग्रामीण भागातल्या चार कोटी कुटुंबांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत जलजीवन मिशननं नवीन टप्पा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट आहे. सध्या सात कोटी २४ लाख, म्हणजे एक तृतीयांशहून अधिक घरांना नळजोड पुरवण्यात आले आहेत. प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात गोव्याला सर्व प्रथम यासह आलं असून, त्यानंतर तेलंगण आणि अंदमान-निकोबार प्रशासनानंही हे लक्ष्य साध्य केलं आहे.  

****

आज तुकाराम बीज. संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुकाराम महाराजांना अभिवादन करुन त्यांचं स्मरण केलं आहे.

****

मराठवाड्यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये काल नव्या तीन हजार ४९१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५५ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६, नांदेड जिल्ह्यातल्या १९, परभणी सहा, लातूर तीन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार २७२ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ९८, लातूर ३९३, परभणी ३९२, उस्मानाबाद २३९, तर हिंगोली जिल्ह्यात ९७ नवे रुग्ण आढळून आले.

****

सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातल्या मल्हारपेठ इथल्या लॅब मालक आणि डॉक्टरवर कोविड रक्त चाचणीची कायदेशीर परवानगी नसताना चाचणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लॅब मालक अनिल इनामदार याला पोलिसांनी अटक केली असून, डॉ. उदय राजाराम वनारसे पसार आहे.

****

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या विश्वचषक सुपर लीग क्रमवारीत भारत सातव्या स्थानावर आला आहे. या क्रमवारीत ४० गुणांसह इंग्लंड प्रथम स्थानावर असून, भारताचे २९ गुण झाले आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेनं सुपर लीगला सुरुवात झाली होती. या लीगमध्ये १२ संघांचा समावेश असून, पहिल्या आठ क्रमांकावरील संघांचा २०२३ मध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत थेट प्रवेश होणार आहेत. ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे. 

****

No comments: