Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 March 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा
एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत
आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक
वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ
उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा,
वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** राज्यात ऑक्सीजनचा
पुरवठा वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के करण्याचे आरोग्य
विभागाचे निर्देश
** ज्येष्ठ साहित्यिक
शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान जाहीर
** औरंगाबाद इथं
आज २७ कोविड रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
आणि
** बीड जिल्ह्यात
सर्व बँका आणि खाजगी कार्यालयातल्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी २ एप्रिलपूर्वी आरटीपीसीआर
तपासणी करुन घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
****
राज्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सीजनचा पुरवठा वैद्यकीय वापरासाठी
८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.
या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना जारी केली असून ती ३० जून पर्यंत राज्यभर
लागू राहणार आहे. कोविड रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत
असून, दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता ऑक्सीजनचे उत्पादन अनेक पटीने वाढवण्याचे
निर्दैश उत्पादकांना देण्यात आले आहेत. वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यांपेक्षा जास्त
प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासल्यास, वाढीव पुरवठा करण्याचे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत
देण्यात आले आहेत.
****
एका बाजूला नक्षलवाद आणि दुसऱ्या बाजूला कोविडचा सामना करणाऱ्या पोलिसांचं शौर्य
आणि धैर्य गौरवास्पद असल्याचंख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नाशिक इथल्या
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या ११८ व्या तुकडीतल्या ६६८ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा
दीक्षांत सोहोळा आज झाला. या सोहळ्याला दूरदृश्य
प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना, मुख्यमंत्री बोलत होते. कोरोना सारख्या न दिसणाऱ्या
शत्रूच्या विरोधातल्या लढाईचं आव्हान पोलिसांनी स्वीकारलं आहे. कोविड काळातही ते चोख
कर्तव्य बजावत आहेत, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचं कौतुक केलं.
****
कोविड प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीच्या नियोजनाचे निर्देश
दिलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र, टाळेबंदीला विरोध दर्शवला आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी, जनता टाळेबंदीला कंटाळलेली असताना, पुन्हा
टाळेबंदी लावणं हा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. राज्याला पुन्हा टाळेबंदी परवडणार नाही,
त्यामुळेच अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा, असं पटेल यांनी नमूद केलं. लोकांनी नियम
पाळले तर टाळेबंदी टाळता येऊ शकते, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
****
ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान जाहीर
झाला आहे. दिल्लीच्या के. के. बिर्ला फाऊंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो.१५ लाख रुपये,
प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. देशभरातल्या २२ भाषामधल्या
पुस्तकांचं अवलोकन करुन दरवर्षी एका साहित्यिकाला हा पुरस्कार दिला जातो. लिंबाळे यांना
‘सनातन’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
राज्य शासनाने काही जिल्हयांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बांधण्यास
परवानगी दिलेली आहे. ही महाविद्यालये कोणत्या पध्दतीने बांधण्यात यावीत, तसंच हे काम
किती काळात पूर्ण होईल याबाबत एक आराखडा तयार करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री
अमित देशमुख यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीमध्ये याबाबत सादरीकरण करण्याची सूचना देशमुख यांनी केली.
राज्यात उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, नाशिक, अलिबाग आणि सातारा इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन
करण्यास राज्यमंत्रीमंडळानं मान्यता दिली
आहे.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज २७ कोविड रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये २१ पुरुष तर सहा महिला रुग्णांचा समावेश आहे. एकूण
मृतांपैकी ३ रुग्ण जालना जिल्ह्यातले असून, उर्वरित सर्व रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातले
आहेत. दरम्यान आज सकाळच्या सत्रात घाटी रुग्णालयात ४८ नवीन कोविड बाधित रुग्ण दाखल
झाले.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात आठ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे
जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ४८५ झाली आहे. दरम्यान, आज
३७० नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता २५हजार ४४५ झाली आहे. उपचारानंतर
कोरोना विषाणूमुक्त झालेल्या १३५ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले
२१ हजार ८७२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३०८८ रुग्णांवर उपचार
सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज ३१८ नवे कोविडग्रस्त आढळले. यापैकी सर्वाधिक ८८ रुग्ण बीड तालुक्यात,
त्या खालोखाल अंबाजोगाई तालुक्यात ५९, आष्टी ४२, परळी ३८, माजलगाव ३१, केज २५, पाटोदा
१८, गेवराई ९, धारूर ७, तर वडवणी तालुक्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात कोविड प्रतिबंध तसंच बाधितांवर उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून
सर्वोतोपरीने उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र गृहविलगीकरणातल्या रुग्णांनी कोविडचे
नियम पाळावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केलं आहे. ते म्हणाले...
होम आयसोलेशन आपण देतोय पण होम आयसोलेशनचे लोकं आपले
नियम पाळत नाही असे दिसतय त्यांना आम्ही कडक सूचना दिल्या आहेत. त्यांच्यावर लक्ष आहे.
पण जर होम आयसोलेशच्या लोकांनी काळजी घेतली तर निदान कुटुंबातल्या लोकांना तरी कोरोनापासून
आपल्याला बचाव करता येईल. आणि संख्या आपली वाढणार नाही. तर माझी कळकळीची विनंती आहे
जनतेला की, आपल्यातणं जर उस्फुर्तपणे प्रतिसाद आला तर प्रशासनावर विनाकारणचा ताण येणार
नाही.
दरम्यान, बीड जिल्ह्यात सर्व राष्ट्रीयकृत तसंच खाजगी बँका आणि सर्व खाजगी कार्यालयातल्या
अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी २ एप्रिलपूर्वी आरटीपीसीआर तपासणी करुन घेण्याची सूचना
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केली आहे. येत्या पाच एप्रिलनंतर कोणतेही अधिकारी
किंवा कर्मचारी कोविड तपासणी केल्याशिवाय कार्यालयात येणार नाहीत, याची सर्व बँक शाखाप्रमुख
तसंच खाजगी कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या यावर्षीच्या नियोजन विकास आराखड्यात ५ % निधी कोविड उपचार
सुविधांसाठी राखीव ठेवण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
चव्हाण यांनी आज नांदेड इथं वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली,
या बैठकीत बोलताना चव्हाण यांनी, कोविड बाधितांवर उपचारासाठी निधी कमी पडू दिला जाणार
नाही, अशी ग्वाही दिली.
****
परभणी जिल्ह्यात कोविडबाधितांवर उपचारासाठी आवश्यक एच.आर.सिटी चाचणी करता सीटी
स्कॅनचं जादा शुल्क आकारणाऱ्यांविरूध्द कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
यांनी दिले आहेत. संबंधित सीटी स्कॅन मशीन सील करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी
दिले आहेत. यासंदर्भात दाखल तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही सूचना केली आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाळसाळे यांनी आज परभणी
शहरात विविध कोविड केंद्रांना भेटी देऊन वैद्यकीय उपचार, सुविधा आणि इतर व्यवस्थेचा
आढावा घेऊन, आवश्यक निर्देश दिले.
टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण कार्यक्रम टाकसाळे
यांच्या मार्गदर्शनात आज घेण्यात आला, ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण करून घेण्यासाठी युवकांनी
पुढाकार घेण्याचं आवाहन टाकसाळे यांनी केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त
होणारे धार्मिक विधी फक्त पाच जणांच्या उपस्थितीत करण्याचे निर्देश प्रशासनानं जारी
केले आहेत. मात्र, हे विधी करण्यासाठी ५० जणांना आणि सर्व फडकऱ्यांना कमीत कमी २० जणांच्या
उपस्थितीची परवानगी द्यावी, अशी मागणी संत एकनाथ महाराजांचे १२ वे वंशज योगेश गोसावी
पालखीवाले यांनी केली आहे. देहू इथं आज तुकाराम बीजेनिमित्त ५० भाविकांना परवानगी दिल्याच्या
पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली.
****
लातूर जिल्ह्यात रमाई घरकुल निर्माण समितीअंतर्गत निधी मंजूर करण्यात
आला असून याबाबतचा विस्तृत तपशील तातडीने पाठवण्याची सूचना लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. लातूर जिल्हा
रमाई घरकुल निर्माण समितीची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली, या बैठकीत सन २०१९-२०
या वर्षातील शिल्लक उद्दिष्टानुसार दोन हजार
९१५ प्रस्तावांना तर २०२०-२१
मधील सहा हजार ८२७ उद्दिष्टापैकी एक हजार ६४५ प्रस्तावांना मंजूरी देण्यात
आली.
****
थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची
वीज खंडीत करू नये, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज उस्मानाबाद
जिल्ह्यात सर्वत्र वीज बिलांची होळी करण्यात आली. उस्मानाबाद इथल्या वीज वितरण कंपनी
कार्यालयासमोर हे आंदोलन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ
घोषणा दिल्या.
//**********//
No comments:
Post a Comment