Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 March 2021
Time 7.10am to 7.25am
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २५ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे,
त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं
सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी,
न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक
आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा.
हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** आगामी सण उत्सव काळात
नागरिकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येण्यावर प्रतिबंध
** बीड-परभणी-नांदेड जिल्ह्यात
टाळेबंदी लागू ; अनेक पक्ष संघटनांकडून टाळेबंदीला विरोध
** औरंगाबाद
जिल्ह्यातल्या बाधित क्षेत्रात नियमांचं
अधिक कडक पालन करण्याचे निर्देश,
** राज्यात नवे ३१ हजार
८५५ कोविडग्रस्त; मराठवाड्यात काल ५२
रुग्णांचा मृत्यू तर नव्या चार हजार ६७२ रुग्णांची नोंद
** राज्यात शासकीय अधिकाऱ्यांना
सरळसेवेनं नियुक्ती तसंच पदोन्नतीसाठी नवी अधिसूचना मंजूर
आणि
** मनसुख
हिरेन हत्या प्रकरणाचा तपास, एनआयएकडे
सोपवण्याचे ठाणे सत्र न्यायालयाचे एटीएसला आदेश
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर शब ए बारात, बिहू, ईस्टर आणि ईद उल फित्रच्या सणानिमित्त, लोकांना मोठ्या
संख्येनं एकत्रित येण्यावर बंदी घालण्याचे निर्देश, केंद्र सरकारनं राज्यांना दिले
आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं
आहे. यासंदर्भात कोणताही हलगर्जीपणा केला जाऊ नये, अन्यथा कोविडची साथ रोखण्यासाठी
आतापर्यंत केलेले प्रयत्न निष्फळ ठरतील, असं या पत्रात म्हटलं आहे.
आगामी होळी, धुलिवंदन आणि
रंगपंचमी हे सण अत्यंत साधेपणानं साजरे करण्याच्या सूचना, राज्य सरकारनं दिल्या आहेत.
गर्दी न करता, शारीरिक अंतराचा नियम पाळून हे सण साजरे करावेत, असं याबाबत जारी केलेल्या
शासननिर्णयात म्हटलं आहे.
****
वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मराठवाड्यात काही ठिकाणी
पुढचे काही दिवस टाळेबंदी लागू करण्यात आली आहे, तर उर्वरित भागात कडक निर्बंध लागू
करण्यात येत आहेत.
बीड जिल्ह्यात येत्या चार एप्रिलपर्यंत
दहा दिवसांची टाळेबंदी घोषित करण्यात आली
आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी याबाबत
अधिक माहिती दिली, ते म्हणाले…
त्याच्यामध्ये
सगळ्या अस्थापना ह्या पूर्णपणे बंद राहतील. सकाळचे नऊ वाजल्या पासून दुध विक्रेते,
भाजीपाला विक्रेते, यांच्यासाठी वेगवेगळा वेळ नेमून दिला आहे. लसीकरण आणि आपली जी तपासणी
आहे ती व्यवस्थित चालू राहील. आरोग्य सेवा सगळ्या चालू राहतील.त्याच्यानंतर तालुक्याच्या
ठिकाणी आपण एक एक पेट्रोलपंप चालू ठेवणारे आहे. बीडला गावामध्ये आपले दोन पेट्रोल पंप
हे चालू राहतील. आत्यावश्यक ज्या सेवा आहेत त्यासर्व सुरु राहतील. शासकीय सर्व कार्यालये
सुरु राहतील. शासकीय बांधकामं जी आहेत ती चालु राहतील. ज्या ठिकाणी कारखान्यांमध्ये
आतामध्ये कर्मचारी असून त्यांच्या जेवनाची, राहण्याची व्यवस्था असेल त्याठिकाणी ते
कारखाने चालू राहतील. अशा पद्धतीनं हा आपला लॉकडाऊन असेल.
या कालावधीत सक्षम अधिकारी
यांच्या परवानगी शिवाय बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यातही
एक एप्रिलच्या सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या
संचारबंदीतून काही आवश्यक सेवा आणि कामांना सवलत देण्यात आली
असल्याची माहिती, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. यात
शासकीय- निमशासकीय कार्यालयातले अधिकारी, कर्मचारी आणि
त्यांची वाहनं, आरोग्य सेवा, पेट्रोलपंप
- गॅस वितरक, किराणा दुकानातून होणारी घरपोच सेवा, सकाळी सहा ते नऊ दरम्यान दूध वाटप, स्पर्धा परीक्षेसाठीच्या अभ्यासिका, वाचनालयं तसंच राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांचं, अंतर्गत कामकाज सुरू असेल.
****
नांदेड
जिल्ह्यातही अकरा दिवस टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जीवनावशक वस्तूचा तुटवडा भासू नये, म्हणून
नागरीकांनी काल बाजारपेठेत गर्दी केली होती. दरम्यान टाळेबंदीच्या काळात औषधी दुकानं, वृतपत्र, दूध, भाजीपाला,
किराणा सामान, घरगुती वापराचा गॅस, खाद्यपदार्थांच्या
घरपोच वितरण सेवांना सकाळच्या सत्रात काही वेळ
सूट देण्यात आली आहे.
****
दरम्यान, या तीनही जिल्ह्यात
लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीला, काही पक्ष संघटनांनी विरोध दर्शवला आहे. बीड जिल्ह्यात
वंचित बहुजन आघाडीनं काल जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर टाळेबंदीच्या विराधोत घोषणाबाजी केली.
टाळेबंदीच्या काळात गोर-गरीबांच्या दोन वेळेच्या अन्नाची व्यवस्था प्रशासनाच्या
वतीनं करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
परभणी इथं शहरातील छोट्या-मोठ्या
व्यापाऱ्यांसह अनेक उद्योजकांनी संचारबंदीला विरोध दर्शवून, हा निर्णय मागे घेण्याची
मागणी केली. व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळानं काल सायंकाळी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे
सादर केलं.
नांदेड जिल्ह्यात रयत क्रांती
संघटनेच्या वतीनं काल नायगाव इथं नांदेड - हैदराबाद रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात
आलं. जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी काढलेल्या टाळेबंदी आदेशाची होळी करत, विरोध
दर्शवण्यात आला. टाळेबंदीमुळे शेतमालाचं मोठं नुकसान होत असल्याचं, संघटनेचं म्हणणं
आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात अधिक प्रमाणात रुग्ण आढळणारा भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करुन, त्या ठिकाणी
नियमांचं अधिक कडक पालन करण्याचे निर्देश, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी, सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. कोरोना संसर्ग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा शिंदे यांनी काल
घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती, अतिजोखीम
तसंच कमी जोखमीच्या व्यक्ती, या सर्वांच्या आरपीटीसीआर
चाचण्या करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रुग्ण संख्येच्या प्रमाणात उपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात, त्यासाठी आवश्यक
मनुष्यबळाची कंत्राटी पद्धतीनं भरती करावी, अशी सूचना
शिंदे यांनी केली.
दरम्यान, औरंगाबाद शहरात
वाढती रुग्णसंख्या पाहता, महानगरपालिकेने शहरातल्या ३१ मंगल कार्यालयांमध्ये कोविड
केंद्र उभारण्यास सुरवात केली आहे. याठिकाणी सुमारे दोन हजार रुग्णखाटांचं नियोजन करण्याचा
महापालिकेचा प्रयत्न आहे.
****
लातूर शहरात
आरटीपीसीआर चाचणी केलेल्या संशयित रुग्णांनी,
अहवाल येईपर्यंत घरातच विलगीकरणात रहावं अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेनं दिला आहे. हा अहवाल येण्यासाठी एक दिवसाचा
कालावधी लागतो. सध्या कोविड रुग्णसंख्या वाढत
आहे. यामुळे तपासणीसाठी आलेल्या संशयितांकडून कोरोना विषाणू संसर्गाचा धोका आहे.
****
उस्मानाबाद शहरातल्या शासकीय
आयुर्वेद महाविद्यालयात आणि जिल्हा रुग्णालयातल्या कोविड उपचार केंद्रामध्ये आयुर्वेद
महाविद्यालयातल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची सेवा घेण्यात
आली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबतचे आदेश काढून या डॉक्टरांची
नियुक्ती केली आहे.
****
राज्यात काल ३१ हजार ८५५
कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २५
लाख ६४ हजार ८८१ झाली आहे. काल ९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५३ हजार ६८४ झाली असून, मृत्यूदर दोन
पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे. काल १५ हजार ९८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले.
राज्यात आतापर्यंत २२ लाख ६२ हजार ५९३ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ८८ पूर्णांक २१ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात दोन लाख ४७ हजार २९९ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल नव्या चार हजार ६७२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५२ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये
औरंगाबाद जिल्ह्यातल्या २३, जालना जिल्ह्यातल्या आठ, बीड,
नांदेड तसंच परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी सहा, लातूर जिल्ह्यातल्या
दोन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल एक हजार ७०२ रुग्ण आढळले, तर
नांदेड जिल्ह्यात एक हजार १६५, जालना जिल्ह्यात ४५३, लातूर ३९७, परभणी ३४१, बीड २९९,
उस्मानाबाद १७६ तर हिंगोली जिल्ह्यात १३९
नवे रुग्ण आढळून आले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या मालिकेचा हा ७४वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प
संसदेनं मंजूर केला आहे. काल राज्यसभेत अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा झाली. लोकसभेनं
गेल्या मंगळवारीच काही सुधारणांसह अर्थसंकल्प संमत केला आहे.
****
राज्यातल्या शासकीय अधिकाऱ्यांना
सरळसेवेनं नियुक्ती तसंच पदोन्नतीसाठी, महसुली विभाग वाटप नियम २०१५ रद्द करण्यास,
तसंच नवीन महसूल विभाग वाटप नियम २०२१ ची अधिसूचना लागू करण्यास, राज्य मंत्रिमंडळानं
मान्यता दिली आहे. अ आणि ब गटातल्या सर्व राजपत्रित तसंच अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी
हा नियम लागू असेल.
राज्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयात
सरळ सेवेनं किंवा थेट नियुक्त झालेल्या प्राचार्यांची वेतन निश्चिती करण्याचा निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी ४२ कोटी ८९ लाख ९६ हजार ८७६ रुपयांच्या खर्चासही,
मान्यता देण्यात आली. वैद्यकीय तसंच आरोग्य सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या वेतनातील तफावत
दूर करत त्यांना प्रोत्साहन वेतनवाढ देण्याचा निर्णयही काल घेण्यात आला.
****
मनसुख हिरेन
हत्या प्रकरणाचा तपास, राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएकडे सोपवण्याचे आदेश, ठाणे सत्र न्यायालयानं दिले आहेत. केंद्र सरकारनं हे
प्रकरण एनआयएकड़े सोपवण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते. मात्र
दहशतवाद विरोधी पथक - एटीएसनं
हा तपास एन आय ए कडे सोपवला नव्हता. एनआयएनं हा तपास आपल्याकडे हस्तांतरीत करण्याची मागणी ठाणे न्यायालयात केली होती. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या विनायक सुर्वे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर
या दोघांचाही ताबा एनआयएकडे देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
****
गृहमंत्री
अनिल देशमुख यांनी केलेल्या कथित गैरव्यवहारांची केंद्रीय
गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची
याचिका दाखल करुन घेण्यास, सर्वोच्च न्यायालयानं
नकार दिला आहे. न्यायालयानं सिंग यांना यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, आपल्यावर लावलेल्या
आरोपांची चौकशी करावी, अशी विनंती अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
****
दरम्यान, विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन गेल्या काही
आठवड्यांमध्ये राज्यात घडलेल्या विविध घटनांची माहिती
दिली. या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलतांना फडणवीस यांनी, या सर्व
प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट असल्याचं
सांगितलं. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून यासंदर्भात अहवाल मागवावा, अशी मागणी केली असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.
****
टुरींग
टॉकीजला वस्तू आणि सेवा
करातून सूट मिळावी यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं,
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. ते काल यासंदर्भातल्या
बैठकीत बोलत होते. राज्यभरात जवळपास ५० हून अधिक टुरींग टॉकीज सुरु
असून, यामध्ये ९० टक्के मराठी आणि १० टक्के हिंदी सिनेमे दाखवले
जातात. टुरींग टॉकीजसाठी सांस्कृतिक कार्य
विभागामार्फत नव्यानं कोणती योजना लागू करता येईल, याचा
अभ्यास केला जावा, असे निर्देशही देशमुख यांनी यावेळी
दिले.
//****************//
No comments:
Post a Comment