Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 August 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा.
****
पावसाळ्याच्या पूर्वार्धात राज्यात सरासरीपेक्षा २४ टक्के जास्त पाऊस झाल्याचं भारतीय हवामान शास्त्र विभागानं प्रसिद्ध केलं.
निम्मा पावसाळा आता संपला. मराठवाड्यात पावसाळ्याच्या पूर्वार्धातला पाऊस सरासरी
पेक्षा ३४ टक्के जास्त आहे. जून-जुलै
मध्ये मराठवाड्यात सरासरी ३१७ पुर्णांक एक दशांश मिलिमिटर पाऊस पडतो. सध्या इथं, ४२३ पुर्णांक सात मिलिमिटर पाऊस झाला आहे. विभागनिहाय विचार करता कोकणात
सर्वाधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही या काळात नेहमीपेक्षा यंदा जास्त पाऊस
झाला.
दरम्यान, पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यातलं
विदर्भातलं पाऊसमान तुलनेत कमी असलं तरी तिथंही सरासरीपेक्षा चार टक्के जास्त पाऊस
झाला आहे.
जिल्हा निहाय विचार करता जालना, परभणी, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सातारा,
जिल्ह्यात अतिजास्त म्हणता येईल असा सरासरीपेक्षा ६० टक्क्यांहून
अधिक पाऊस झाला. तर, औरंगाबाद, बीड,
लातूर, उस्मानाबाद, नांदेड,
हिंगोली, मुंबई शहर, ठाणे,
रायगड, सिंधुदुर्ग, पुणे,
कोल्हापूर, सांगली, सोलापूर,
अहमदनगर, वाशिम, पालघर,
नाशिक, यवतमाळ, वर्धा,
नागपूर, आणि भंडारा तसंच चंद्रपूर जिल्ह्यातला
पाऊसही सरासरीपेक्षा २० ते ६० टक्के जास्त आहे. मात्र, याच वेळी राज्यातील धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला,
अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात
सरासरी पेक्षा वीस टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. राज्यातला नंदुरबार हा एकमेव
जिल्हा सध्या अवर्षणाच्या छायेत असून राज्याच्या उत्तर सीमेवरील दुर्गम भाग
असलेल्या या आदिवासी जिल्ह्यातलं पावसाळ्याच्या पूर्वार्धातलं पाऊसमान
सरासरीपेक्षा ४३ टक्के कमी आहे.
****
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बेलसर गावात झिका विषाणूचा रुग्ण आढळून आला
आहे. त्यामुळे परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला
आहे. मात्र,
परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरुन जाण्याचं काहीही कारण नाही असं आरोग्य
यंत्रणेनं आवाहन केलं आहे. हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया,
चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
बेलसरमध्ये मागील एक ते दिड महिन्यांपासून डेंग्यू,
चिकनगुनिया आणि इतर साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विषाणूजन्य रोगशास्त्र
संस्थेद्वारे या भागातील ५१ रक्त नमुने गोळा करून ते तपासणीसाठी घेतले होते.
त्यामध्ये प्रामुख्याने झिका विषाणूचा एक रुग्ण असल्याचं आढळून आले आणि
चिकनगुनियाचे २५ तर डेंग्यूचे तीन रुग्ण आढळून आले.
****
नाटककार, नाट्यरूपांतरकार,
नाट्यानुवादक, नाट्यसंपादक आणि नाट्यकलेचे अध्यापक
प्राध्यापक त्र्यंबक महाजन यांचं काल मध्यरात्री निधन
झालं. ते ९१ वर्षांचे होते. 'नाट्यधर्मी
मराठवाडा, कृष्णवर्णीय नाट्यत्रयी या पुस्तकांचं लेखन
तर 'अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन पाच
अध्यक्षीय भाषणे या पुस्तकाचं त्यांनी संपादन केलं होतं. याशिवाय अन्य ग्रंथसंपदाही
त्यांच्या नावावर आहे. नाटक आणि रंगभूमीविषयी
अपार प्रेम असलेले महाजन यांनी या विषयांवर केलेलं संशोधन आणि लेखन अभ्यासकांसाठी एक
ऐतिहासिक ठेवा म्हणून ओळखलं जातं. औरंगाबादमधील नागसेनवनातील
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग
प्रमुख म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलं. मराठवाडा विद्यापीठात
नाट्यशास्त्र विभाग सुरू व्हावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
****
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत आज नवव्या दिवशी, मुष्टियुद्ध
प्रकारात ९१ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व
फेरीत भारताचा सतीशकुमार पराभूत झाला आहे. तर, घोडेस्वारी
प्रकारात भारताचा फौआद मिर्झा चौथ्या फेरीअखेर २२व्या
स्थानावर खेळत आहे.
बॅडमिंटनमध्ये
महिला एकेरीत पी व्ही सिंधू आज कांस्यपदकासाठी
चीनच्या बिंग जिआओ बरोबर लढत देणार आहे तर भारतीय पुरुष हॉकी
संघाचा उपांत्यपूर्व फेरीत आज इंग्लंडविरुद्ध सामना होणार आहे.
****
आतापर्यंत देशात ४७ कोटी दोन लाख नागरिकांचं कोरोना विषाणू
प्रतिबंधक लसीकरण झालं आहे. गेल्या २४ तासांत लसीच्या ६० लाख मात्रा
दिल्या गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. तर ३९ हजार
रुग्ण विषाणू मुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९७
पूर्णांक ३६ शतांश टक्के झाला आहे.
****
देशभरात आज एक ऑगस्ट हा दिवस "मुस्लीम महिला हक्क दिवस" म्हणून
पाळला जात आहे. तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू झाल्याचं स्मरण म्हणून हा दिवस पाळला
जात आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी काल नवी दिल्लीत
ही घोषणा केली. हा कायदा लागू झाल्यापासून देशात, तिहेरी
तलाकच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
****
भारताच्या सेवा निर्यातीत सध्या मोठी वाढ झाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग
मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या भारत - अमेरिका सेवा परिषदेला संबोधित करताना
ते काल बोलत होते. गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत देशाच्या सेवा निर्यातीत १२
पटींनी वाढ झाल्याचं त्यांनी अधोरेखीत केलं आहे. भारताच्या सेवाक्षेत्रातली
कौशल्यं, स्टार्टअप्स आणि सॉफ्टवेअर उपाय यांमुळे
रोजगारनिर्मिती आणि व्यवसायाच्या संधी वाढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
//****************//
No comments:
Post a Comment