Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 24 August 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध
शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** मुख्यमंत्र्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी केंद्रीय
मंत्री नारायण राणे पोलिसांच्या ताब्यात
** राणे यांच्या विरोधात शिवसेनेचं मराठवाड्यासह राज्यभरात आंदोलन
** राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत
विविध उपक्रमांना आजपासून प्रारंभ
आणि
** ईईएल या खाजगी
कंपनीने तयार केलेल्या मल्टी मोड हँड ग्रेनेडचं लष्कराला
हस्तातंरण
****
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज रत्नागिरी जिल्ह्यात जन
आशीर्वाद यात्रेदरम्यान संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राणे यांच्याविरोधात नाशिक इथं पोलिसांत
तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारनंतर ही कारवाई करण्यात आली. सायंकाळी
राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी महाड पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. राणे यांचा अटकपूर्व जामीन रत्नागिरीच्या सत्र न्यायालयानं फेटाळून लावला
आहे.
दरम्यान, राणे यांनी मुख्यमंत्र्याविषयी केलेल्या वक्तव्याचा
राज्यभरात शिवसैनिकांनी निषेध केला. औरंगाबाद इथं आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी
क्रांतीचौकात आंदोलन केलं. युवा सेनेच्या वतीनंही राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं
दहन करण्यात आलं. परभणी इथं आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर निदर्शनं केली. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं राणे यांच्या प्रतिकात्मक
पुतळ्याचं दहन करण्यात आलं. जालना इथं युवासेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांच्या
नेतृत्त्वात अंबड चौफुली इथं आंदोलन करण्यात आलं. युवासैनिकांनी राणे यांच्या प्रतिमेला
जोडे मारून हातात कोंबड्या घेत, राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. उस्मानाबाद जिल्ह्यात
कळंब इथं खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थित रस्ता रोको आंदोलन
करून कार्यकर्त्यांनी राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
सोलापूर इथं राणे यांच्या छायाचित्राला पादत्राणांचा हार घालण्यात आला.
नाशिक इथं युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या वसंत स्मृती
कार्यालयावर दगडफेक करून राणे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही
शिवसेना भवनावर दगडफेकीचा प्रयत्न केला, यावेळी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये
धुमश्चक्री उडाली.
नवी मुंबई, धुळे, नंदूरबार, बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम,
गडचिरोली, सांगली, सिंधुदूर्ग, पालघर, आदी जिल्ह्यातही राणे यांच्यानिषेधात शिवसैनिकांनी
निदर्शनं केली.
****
दरम्यान, राणे यांच्यावर केलेली कारवाई हे घटनात्मक मूल्यांचं
हनन असल्याचं, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. जन आशीर्वाद
यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून, विरोधक हैराण झाले आहेत. मात्र या कारवाईनंतरही
जन आशीर्वाद यात्रा सुरूच राहील, असं नड्डा यांनी म्हटलं आहे.
****
शिक्षण अधिकाधिक समावेशक करण्यासाठी, तसंच विद्यार्थ्यांना
२१ व्या शतकातील आव्हानं पेलण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं राष्ट्रीय
शिक्षण धोरण २०२० अंतर्गत विविध उपक्रमांना आजपासून प्रारंभ केला. केंद्रीय शिक्षण
मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार
यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय शिक्षण
धोरण अंमलबजावणीच्या वर्षपूर्तीच्या कामगिरीवरील पुस्तिकेचं प्रकाशन यावेळी करण्यात
आलं. शिक्षणाचं डिजिटायझेशन करण्याचं आणि शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्याचं काम सरकार
करत असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. सर्वसमावेशक शिक्षणाला प्रोत्साहन देणं
आणि दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणं हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचं डॉक्टर
वीरेंद्र कुमार यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय शिक्षण धोरण देशाच्या विकासाला चालना
देणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
****
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत २३ ते २९ ऑगस्ट दरम्यान
नवी मुंबईत बेलापूर इथं विशेष सप्ताहाचं
आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत प्रादेशिक
लोक संपर्क ब्युरो यांच्या चित्र प्रदर्शनाला आजपासून
प्रारंभ झाला. या प्रदर्शनात स्वातंत्र्य
लढ्यात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींची माहिती त्यांच्या फोटोंसह
देण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या निमित्तानं आजच्या तरूणांना, लहान मुलांना
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य विरांचा इतिहास, लढ्यातल्या महत्त्वाच्या घटना
यांची माहिती होण्याची ही एक चांगली संधी मिळाली असल्याचं मत पोलीस आयुक्त
बिपीनकुमार सिंह यांनी यावेळी व्यक्त केलं. हे प्रदर्शन येत्या २७ ऑगस्ट पर्यंत
सुरू राहणार आहे.
****
नागपूर इथल्या इकोनॉमिक इक्सप्लोजीव लिमिटेड - ईईएल या खाजगी कंपनीने
तयार केलेल्या मल्टी मोड हँड ग्रेनेडचं आज नागपूर इथं
भारतीय लष्कराला हस्तांतरण करण्यात आलं. ईईएल कंपनीच्या
प्रांगणात हा कार्यक्रम झाला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लष्करप्रमुख एम.एम. नरवणे, डीआरडीओचे अध्यक्ष
डॉ. जी. सतीश रेड्डी यावेळी उपस्थित होते.लष्करासाठी हातगोळे बनवणारी भारतातील ही पहिलीच खाजगी
कंपनी आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेअंतर्गत
शंभर अनाथ निराधार मतिमंद विकलांग बालकांचं लसीकरण करण्यात आलं. लसीकरण केलेल्या एकाही
बालकाला कुठलाही दुष्परिणाम दिसून आला नाही. जिल्ह्यात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तसंच
दुर्धर आजारी नागरिकांसाठी विशेष लसीकरण सत्रांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती
जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर कुलदीप मिटकरी यांनी दिली आहे.
****
औरंगाबाद शहरातील व्यापारी आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांसाठी
आजपासून शहरातल्या शहागंज इथल्या बालाजी धर्मशाळेत लसीकरण शिबीर सुरू करण्यात आलं आहे.
व्यापारी आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांचं जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावं यासाठी
हे शिबीर महानगरपालिका आणि जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलं आहे.
आज पहिल्याच दिवशी जवळपास १०० जणांचं लसीकरण झाल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा व्यापारी
महासंघाच्या वतीनं देण्यात आली. शहरातल्या विविध भागात लवकरच लसीकरण शिबीर घेण्यात
येणार असून जास्तीत जास्त व्यापारी आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांनी लसीकरण करुन घेण्याचं
आवाहन करण्यात आलं आहे.
****
शेतमजूर आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेतमजूर युनियनच्यावतीनं
जालना जिल्हा परिषद कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. ग्रामीण भागात
घरकुलांसाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावं आणि गावात मनरेगाअंतर्गत काम उपलब्ध करून द्यावं,
या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात
आला. या मागण्यांचं निवेदन जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात
आलं.
//***************//
No comments:
Post a Comment